एकनाथ शिंदे यांचे बंड, ठाकरे सरकार पडणार?

Editorial
Spread the love

शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य, सध्याच्या ठाकरे सरकारमधील ज्येष्ठ  मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड  पुकारले आहे.  विधान परिषद निवडणुकीचे मतदान संपल्यावर शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुपचूप  मुंबईबाहेर पडले. रात्री ते नॉट रिचेबल असल्याचे लक्षात येताच खळबळ उडाली.  शिंदे सध्या गुजरातमधील सुरत शहरातल्या एका पंचतारांकित हॉटेलात आपल्या  आमदारांसह मुक्कामाने आहेत. शिंदे यांचे मन वळवण्यासाठी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या माणसांना रवाना केले आहे.  शिंदे झुकले नाही तर काय करायचे याची रणनीती ठरवण्यासाठी   शरद पवार मुंबईला यायला निघाले आहेत. पण आता काही होणे नाही. बाण  सुटला आहे.

                 उद्धव ठाकरे यांनी अडगळीत टाकल्याने शिंदे दुखावले होते. ह्या दोघांमध्ये पटत नसल्याची चर्चा  दबक्या आवाजात ऐकू यायची. देवेंद्र फडणवीस यांनी हे हेरून जाळे  फेकले. त्यातून हा भूकंप आहे.  देवेंद्र दिल्लीला  सकाळीच रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री   अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांच्यात  बैठक झाली असून  दोन दिवसात  सरकार बदललेले दिसेल असे भाजपच्या  एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.  शिंदे  यांच्या मदतीने  सरकार बनवायचे की शिंदेंना बाहेरून पाठिंबा द्यायचा ह्या मुद्यावर खल सुरु आहे.  फक्त अडीच वर्षे उरली असल्याने भाजपने  सरकार बनवू नये, शिंदे यांना बाहेरून पाठिंबा द्यावा  असाही एक विचार प्रवाह आहे. पण उद्या देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री असे  समीकरण  दिसले तर  आश्चर्य नको. भाजपचा निर्णय झाल्यावर शिंदे  समोर येऊन आपली भूमिका जाहीर करतील.  त्यामुळे  आणखी काही तास तरी  महाराष्ट्र  अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे.

            दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाआधी किमान   ३७ आमदारांचं पाठबळ लागेल. शिंदे यांच्या पाठीशी नेमके किती आमदार आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपाचे १०६ आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे २५ आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा १४५ चा आकडा गाठू शकतो.

            यापूर्वीही शिवसेनेमध्ये बंड झाली आहेत. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांचे बंड  गाजले. मात्र मुख्य ठाणे शहरामध्ये शिंदेसारख्या मोठ्या नेत्याने बंड करणे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. ह्या घडामोडीने  विधान परिषद निवडणुकीत   महाआघाडीला  बसलेला धक्का कळलाच नाही. गेल्या १० दिवसात  दोन निवडणुकीत  महाआघाडीला दोन मोठे धक्के बसले.  राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार  पडले.  आता  विधान परिषदेत  भाजपने आपला पाचवा उमेदवार निवडून  आणला.   कॉंग्रेसचे भाई जगताप विरुध्द  भाजपचे प्रसाद लाड अशी टक्कर व्हायची होती. पण आमदारांची मते फुटल्याने लाड निवडून आले. त्यामुळे कॉंग्रेसच्या दोन उमेदवारांमध्ये आपसात टक्कर होऊन भाई जगताप  विजयी झाले. चंद्रकांत हंडोरे पडले.   देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवला.  देवेंद्र यांनी असे पत्ते पिसले, की की महाआघाडी  एकदम महाबिघाडी बनली.     राज्यसभा निवडणुकीत भाजपला १२३ मते मिळाली होती.  परिषद निवडणुकीत   ती  १३४ झाली.   देवेंद्र यांनी यावेळी महाआघाडीचे       तब्बल २१ आमदार फोडले.  शिवसेनेची ती  मतं कुठे गेली हे अजूनही लक्षात येत नाही.   कॉन्ग्रेसचीही तीन मते फुटली. या उलट राष्ट्रवादीची  ५ मते वाढली.   अजितदादा पवार यांचा प्रभाव वाढलेला  दिसतो. या उलट  उद्धव ठाकरे यांना आपले आमदार सांभाळता आले नाहीत.  कॉन्ग्रेसच्या  काही आमदारांनी    बाळासाहेब थोरात यांचाही आदेश झुगारला.  एकूणच  ह्या निकालाचे  बरेवाईट पडसाद बराच काळ धुमाकूळ घालत राहणार आहेत.

 179 Total Likes and Views

0 Comments

No Comment.