वाढतोय करोना, स्वतःला सांभाळा

Analysis
Spread the love

राज्यपाल कोश्यारी करोनाने  रुग्णालयात आहेत. खुद्द मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना करोना झाला म्हणून ते घरी आहेत. करोना  वाढतच आहे. बाधितांचे प्रमाण सुमारे ११ टक्क्यांवर गेले आहे. मागील आठवडाभरात रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर हे जिल्हे वगळता राज्यभरात अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ जवळपास दुपटीने वाढली आहे. त्यामुळे आता केवळ मुंबई आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. परंतु रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रमाणात मात्र फारशी वाढ झालेली नाही.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार ८ ते १४ जून या काळात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये १८ हजार ५२५ रुग्णांची नव्याने भर पडली. आठवडाभरातच म्हणजे  १५ ते २१ जून या काळात या जिल्ह्यांमध्ये नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३४ टक्क्यांनी वाढ झाली असून रुग्णसंख्येत ५० टक्क्यांहूनही अधिक वाढ ठाणे, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.

           खेडोपाडी  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अन्य जिल्ह्यांमधील बाधितांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे आढळले आहे. जूनमध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात सरासरी दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून ४० हजारांवर गेली आहे.

राज्यात ५ जूनला ६ हजार ७६७ रुग्ण उपचाराधीन होते. परंतु मागील १५ दिवसांत प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णांचा आलेख आता सुमारे २५ हजारांवर गेला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण मात्र उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत साडेचार टक्केच राहिले आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येतही किंचित वाढ झाली आहे. परंतु हे प्रमाणही अजून सुमारे एक टक्काच आहे. डॉक्टरांचे सांगणे आहे,  जीव धोक्यात  घालू नका.  मास्क घाला. अंतर पाळा. तो गेलेला नाही.

 876 Total Likes and Views

0 Comments

No Comment.