ठाकरे सरकार पडणार की वाचणार?

Editorial
Spread the love

शिवसेना नेते एकनाथ शिंदे नावाच्या वादळाने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. शिंदे गटाचं संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुमतासाठी लागणारे ३७ आमदार आपल्याकडे आहेत असे एकनाथ शिंदे म्हणतात. गुवाहटीमधल्या ४६ आमदारांच्या फोटोचे सेशनही त्यांनी आज  दाखवले. आम्हीच ‘खरी शिवसेना’ आहे असा दावा ते करतात. पण मग तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना का पाठवत नाहीत?  याचा अर्थ  सेनेचे ३७ आमदार त्यांच्याकडे नाहीत का? असतील तर शिंदे कशाची वाट पाहत आहेत?

             तीन दिवसांपासून महाराष्ट्र राजकीय संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातून बाहेर केव्हा पडणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना समोर येऊन बोलायला सांगितले.  समोर याल तर लगेच राजीनामा  देतो असे सांगून ठाकरे ‘वर्षा’ हा सरकारी बंगला  सोडून  ‘मातोश्री’ ह्या आपल्या घरी परतले.  पण आमदारांचे काय? बंडखोर  हॉटेलात बंद आहेत. ‘हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे’ असे सांगून  दोन्ही कॉन्ग्रेसने हात वर केले आहेत. उद्धव यांना करोना झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यानाही करोना  झाला असून ते रुग्णालयात आहेत. मग हा गुंता कोण सोडवणार?

              विचित्र  राजकीय स्थिती असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. मीडियाशी बोलताना  संजय म्हणाले,  आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहोत. “महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व आमदारांची असेल. तर त्याआधी त्यांनी  मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे, ती त्यांनी  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल.”

       संजय राउत यांच्या ह्या विधानाने  महाआघाडीत खळबळ आहे.  कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  बाहेर पडणार म्हणजे शिवसेना भाजपसोबत बसणार आहे काय?  एकूणच सारा गोंधळात गोंधळ सुरु आहे. उद्या बंडखोरांनी ३७ आमदार जमवले तरीही   सत्तास्थापनेचा फॉर्म्युला काय?   भाजपचा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे गणित राहणार का?   सत्ता घ्यायची की निवडणुका घ्यायच्या?  कारण जो कोणी मुख्यमंत्री येईल त्याला दोनच वर्षे  मिळणार आहेत. त्या पेक्षा  निवडणुका घेऊन पाच वर्षे  मुख्यमंत्री होणे देवेंद्र केव्हाही पसंत करतील.  अर्थात हा निर्णय  मोदी-शहा यांनी घ्यायचा आहे.

 184 Total Likes and Views

0 Comments

No Comment.