ठाकरे सरकार आता वाचणे अवघड

Editorial
Spread the love

राज्यातले शिवसेनाप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या  नेतृत्वातले महाआघाडी सरकार कोसळते आहे काय?  संजय राऊत यांना विचारलं तर   ते म्हणतील, अजिबात नाही.   बंडखोर आमदारांचे  प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारलं तर ते म्हणतील, लवकरच तुम्हाला मोठी बातमी देऊ.  भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं तर ते म्हणतील, थोडे थांबा आणि वाट पहा. पण ‘बिटवीन द लाइन्स’ बऱ्याच  बोलक्या आहेत. ठाकरे सरकार वाचणे आता अवघड आहे.                ठाकरे यांनी आज बंडखोरांना अखेरचे आव्हान केले. ‘अजूनही वेळ गेलेली नाही’ असे म्हणाले. पण त्याचा बंडखोरांवर परिणाम झालेला दिसत नाही.

               वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज   दिल्लीत दाखल झाले.  अमित शहा यांच्याशी त्यांची चर्चा आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सायंकाळी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक  बोलावली आहे.  तिकडे  आसाममधील गुवाहाटीमध्ये  शिवसेना बंडखोरांचे नेते  एकनाथ शिंदे  यांनी मीडियाशी संवाद साधला. ८ दिवसात प्रथमच शिंदे हॉटेलबाहेर आले होते.  त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट  झळकत होते, की  मामला फिट्ट आहे. ‘आम्ही शिवसेनेतच आहोत, बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत’ असे ते म्हणाले.   काही बंडखोर  आमच्या संपर्कात आहेत असे  शिवसेनेचे नेते  सांगतात. त्याबद्दल छेडले असता,  शिंदे म्हणाले,   असे असेल तर त्यांची नावं सांगा.  सर्व ५० आमदार खुशीने इथे आले आहेत. मी लवकरच  मुंबईत जातो आहे असेही त्यांनी जाहीर केले.     मुंबईचे  आमदार सदा सरवणकर म्हणाले,   राष्ट्रवादीवाले शिवसेनेला संपवायला निघाले आहेत म्हणून हे बंड आहे.

               येत्या १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. सारे सुरळीत पार पडले तर त्या दिवशी विठोबाची पूजा   नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील. शिंदे आपला गट बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात विलीन करतील. सारे ठरले आहे.  नवे सरकार स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटात जवळपास समझोता झाल्याचे सांगितले जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. आतली माहिती अशी आहे, की नव्या सरकारमध्ये भाजपचे २९ आणि एकनाथ शिंदे गटाचे १३  मंत्री असतील. शिंदे गटाला आठ कॅबिनेट मंत्रीपदे तर  पाच आमदारांना राज्यमंत्री केले जाईल. ह्या आमदारांची लॉटरी लागणार आहे….एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, राजेंद्र पाटील, बच्चू कडू, संदीपान भुमरे, प्रकाश आबिटकर, उदय सामंत, संजय रैमुलकर, शंभूराजे देसाई आणि संजय सिरसाट. भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर गट लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लवकरच भेट घेणार आहे.

        सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी गुवाहाटी येथे हॉटेलात असलेल्या बंडखोर आमदारांवर १२ जुलैपर्यंत कोणतीही अपात्रतेची कारवाई न करण्याचे तसेच आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला  आहे.

 129 Total Likes and Views

0 Comments

No Comment.