राज्यामध्ये सत्तासंघर्ष पेटला असताना ईडीने म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. उद्या ईडीच्या कार्यलयामध्ये त्यांना हजर राहायचे आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रवीण राऊत यांनी ईडीसमोर केलेल्या खुलाश्यांच्या आधारे हे समन्स बजावण्यात आले आहे.
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याचसंदर्भातील चौकशीसाठी हे समन्स आहे.
ईडीने या प्रकरणात याच वर्षी संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.
म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान,सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल केला होता.
मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शनवर ६७२ भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी पत्रा चाळ प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्यात येईल आणि म्हाडासाठी विकास काम करण्यात येईल आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्र विकासक विकेल, असे करारात नमुद करण्यात आले होते. मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून ९ विकासकांना एफएसआय विकून सुमारे ९०१ कोटी ७९ लाख रुपये रक्कम वसूल केली. यावेळी ६७२ भाडेकरू आणि म्हाडा यांना करारानुसार सदनिका देण्यात आल्या नाहीत.
२०१० मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले आहे. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे.
161 Total Likes and Views