एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 39 शिवसेना आणि 11 अपक्ष आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला. (Shiv Sena’s question to BJP)
शिवसेनेने अग्रलेखात म्हटले की, महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून लोकशाहीच्या विजयासाठी आकडय़ांचा खेळ करता आला असता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते, पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही आणि आपल्या शालीन स्वभावाला साजेशी भूमिका घेतली.
या सर्व पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन महत्त्वाची विधाने केलेली आठवतात. अटलजींचे सरकार फक्त एका मताने कोसळत असताना अटलबिहारी विचलित झाले नाहीत. ‘‘तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमटय़ानेही शिवणार नाही,’’ असे ते म्हणालेच, पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजप नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले, ‘‘मंडी सजी हुई थी, माल भी बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नहीं किया था!’’ अटलजींचा हा वारसा आता संपला आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली? ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे. कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडले, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे रक्षण केले. जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची अब्रू लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील… नक्कीच, अशी टीका शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे.
195 Total Likes and Views