एकनाथ शिंदेच बाहुबली, सरकारने विश्वास ठराव जिंकला

Editorial
Spread the love

शिंदे-फडणवीस सरकार आता बिनधास्त झाले.   विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ह्या सरकारने रविवारी  पहिली लढाई जिंकली होती.  आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला.  शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.

             महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. त्या नन्तर प्रत्यक्ष मतमोजणी कऱण्यात आली. यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली.  अध्यक्षाच्या निवडणुकीत  आघाडीच्या बाजूने  १०७ मते मिळाली होती.  मात्र बहुमताच्या चाचणीत  आघाडीच्या मतांची संख्या  आठने कमी झालेली दिसली.

                 अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख हे अनुपस्थित राहिले. उशिरा आल्याने त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. तर प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर कालही अनुपस्थित होते आणि आजही अनुपस्थित राहिले. जितेश अंतापूरकर यांचं लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी आहेत.

              सत्तेची लढाई जिंकल्याने   शिंदे सरकारला आता  सारा मार्ग मोकळा झाला आहे.  येत्या दोनचार दिवसात मंत्रीमंडळ जाहीर होईल.  त्यात कोणाची वर्णी लागते आणि कोण गळतो याची चर्चा सुरु झाली आहे.  बंडखोरांची संख्या  ५० आहे. एवढ्या सर्वांना मंत्री करणे अवघड आहे. त्यामुळे  नाराजी पसरण्याचा धोका आहे.  शिंदे यांना आपल्या आमदारांना  सांभाळावे लागेल.  काही मिळाले नाही तर ते फुटतील.  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी तसा संकेत दिला आहे. ‘ह्या सरकारमध्ये नाराजांची फौज  मोठी आहे. त्यामुळे चार-सहा महिन्यात  सरकार  कोसळेल आणि  मध्यावधी निवडणुका लागतील’ असे पवारांनी म्हटले आहे.

 253 Total Likes and Views

0 Comments

No Comment.