‘टक्केवारीचे खड्डे’ बुजवले नाहीत तर, एका पावसाने रस्ते उखडणारच….!

Hi Special
Spread the love

४ जुलै रात्री मुंबईत पाऊस सुरू झाला. सामान्यपणे पावसाची सुरुवात मृग नक्षत्रापासून होते. ७ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले होते. पण अलिकडे सगळ्याच क्षेत्रांतील गणिते बदलली आहेत. अंदाज चुकत आहेत. राजकारणाचे आिण वेधशाळेचेसुद्धा…. वेधशाळेकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. पण अजूनही वेधशाळेचा अंदाज ५० वर्षांपूर्वीचाच आहे. ५० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढले होते… ‘मार्मिक’मध्येच ते छापून आले होते. ‘एक कारकून कार्यालयात जाताना त्याची पत्नी त्याच्या हातात आठवणीने छत्री देते आणि सांगते की, ‘आज पाऊस कोसळणार, असा वेधशाळेचा अंदाज आहे…. छत्री घेवून जा… तो म्हणतो की, ‘पाऊस येण्याचे भाकित वेधशाळेने केले आहे ना…. मग पाऊस नक्की येणार नाही….’ त्यावेळी वेधशाळेवर विनोद होत होते. अजूनही होत आहेत. राजकारण आणि वेधशाळा करमणुकीच्या जागा बनल्या आहेत. यातील गमतीचा भाग सोडा… पण, तब्बल तीन आठवडे पाऊस उशिरा सुरू झाला…. ग्रामीण भागात अनेक जिल्ह्यांत अजून पाऊस नाही. त्याची एकही बातमी मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांत कोणाला द्यावीशी वाटत नाही. कारण आमच्याकडे राजकीय बातम्यांनीच पहिले पान व्यापले आहे. कडक उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी हाह:कार असतो. त्याची चार ओळीची बातमी मुंबईत कधी येत नाही. पण, मुंबईत दहा टक्के पाणी कपातीची बातमी पहिल्या पानाची बातमी होते. मुंबईत राहणारा वाचक ग्रामीण भागातला आहे… याचे भान मुंबईत आल्यावर सगळेच पत्रकार विसरतात.. मूळ मुंबईचे कोणीच नाही… सगळेच बाहेरून आले आहेत. पण एकदा मुंबईत आले की, पत्रकारही गावाला विसरतात. तसा हा प्रकार आहे.

४ - ५ जुलै च्या रात्री पाऊस सुरू झाला... एका रात्रीत मुंबईच्या सगळ्या रस्त्यांची धूळधाण झाली. गेले चार दिवस मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या आणि ठाण्यापासून पुण्यापर्यंतच्या वाहतुककोंडीची छायाचित्रे येत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्यांचीही छायाचित्रे येत आहेत. गेल्या वर्षीची खड्ड्यांची छायाचित्रे छापली तरीही चालून जातील... अशीच दरवर्षीची रस्त्यांची अवस्था आहे. वाहतूककोंडीचा संताप, मग छायाचित्रातून, उपसंपादकीयातून व्यक्त होतो. ते सदर गेल्या वर्षीचे यावर्षी छापले तरीही खपून जाईल. कारण गेल्यावर्षीही खड्डे होते.... त्याच्या आगोदरही होते. मुख्यमंत्री आणि सरकार कोणाचेही असले तरी, खड्डे दरवर्षीच आहेत. वाहतुक कोंडी दरवर्षीची आहे. शिवाय कितीही उड्डाणपूल बांधले तरी दरवर्षी एक लाख नव्या गाड्या रस्त्यावर येत आहेत. वाहतूक कोंडी होणारच आहे. शिवाय अट्टाहासाने उभी केलेली मेट्रो अजून पाच वर्षे तरी पूर्ण होत नाही. त्या मेट्रोने जवळपास ३० फुटांचा रस्ता अडवून टाकला आहे. त्याचे अस्ताव्यस्त सामान रस्त्यावर सर्वत्र आहे. त्याच सामानाच्या बाजुला ‘मेट्रो का कार्य प्रगतीपर हैं.’ असे फलकही आहेत. जी मेट्रो दहिसर ते गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत सुरु आहे.... ते मेट्रोचे सहा डब्बे २४ तास रिकामेच आहेत... वाहतुक कोंडी कमी व्हावी म्हणून मेट्रोसाठी अब्जावधी रुपये ओतले... पण, वाहतुक कोंडी कमी झाली का? मेट्रोचा वापर किती टक्के होत आहे? अपेक्षे एवढा होत नसेल तर त्याची कारणं काय? या सगळयाच गोष्टीचे चिंतन झाले पाहिजे आणि उपाय योजिले पाहिजेत. नागपूरात सीताबर्डी ते नागपूर विमानतळ मेट्रो धावते आहे... दिवसभर उभे राहून त्यातील प्रवासी मोजा... सगळे डबे रिकामे दिसतील... हे सगळे कशाकरिता केले आणि कोणाकरिता केले? घरातून निघालेला माणूस स्टेशनवर पोहोचेपर्यंत एकतर रिक्षा वापरेल.... किंवा बाईक काढेल.... त्या बाईकची पार्किंग व्यवस्था मेट्रो स्टेशनजवळ कुठे आहे...? ६० फूट उंचीचे जिने आहेत. सगळेच विषय अवघड आहेत.... पुढच्या २५ वर्षांनंतर मुंबईच्या वाहतुकीचे अराजक निर्माण होईल. हे काल्पनिक भय नाही. आज सकाळी ८.०० वाजता ठाण्याहून निघालेला माणूस मुंबईत पोहोचायला १०.३० वाजतात. संध्याकाळी ५.०० च्या नंतर मुंबई सोडली तर कांदिवली-बोरिवली गाठायलाच ८.०० ते ८.३० होतात. सकाळ- संध्याकाळचा प्रवास असा ५ ते ६ तासांचा आहे. इंधनखर्च, वेळेचा अपव्यय... सगळेच विषय हातापलिकडे गेलेले आहेत. राज्यकर्ते कोणीही असोत... या स्थितीत गेल्या दहा वर्षांत फरक झालेला नाही... उलट परिस्थिती बिकट होत चालली आहे. लोकांनी फारच गोंगाट केला तर मग रस्त्यावरचे खड्डे, बुजवण्याचे नाटक हे तर फारच गंमतशीर आहे.... सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहतात... अजून ते वर्षा बंगल्यावर गेलेले नाहीत. ते दुपारी मुंबईकडे निघतात... त्यांनी स्वत: खड्डे ब्ाघितले आहेत. नंतर एक जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली... आिण अिधकाऱ्यांना झापले... ­खड्डे बुजवण्याचे काम लगेच सुरू झाले. त्यामध्येही अशी गंमत की, वाहतुकीच्या कोंडीतच एकीकडे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे... बरं, खड्डे कसे बुजवत आहेत....? तर खड्ड्यांत माती आणि रेती... काही ठिकाणी विटांचे तुकडे...आिण धुम्मसने ठोकणे... जे खड्डे बुजवून झाले त्यानंतर पुढचे खड्डे बुजवताना जोरात पाऊस आला तर, आगोदर बुजवलेल्या खड््यांची माती-रेती वाहून गेलेली.... खड्डा पुन्हा हजर.... खड्डा म्हणतोय, ‘अरे, किती बुजवाल....’? या सगळ्या नाटकामध्ये वाहतुककोंडीत अडकलेला सामान्य माणूस! त्याच्याशी कोणाला काय पडलेय? सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक विनंती आहे... ते ठाण्याचे आहेत... याचा ठाणेकरांना आनंदच आहे... ते ठाण्यात राहतात... लुईसवाडीतून ते मुंबईला निघाले की, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करणे हे पोलिसांचे कामच आहे.... पण, दिलेल्या वेळेवर त्यांनी निघणे किंवा ते निघताना पोलिसांना तशी सूचना देणे... या साध्या गोष्टी त्यांच्या स्टाफने जर पाळल्या तर एक-एक तासाची होणारी वाहतुक कोंडी टळेल... कोपरीचा पूल उतरल्यानंतर गेले ८ दिवस ‘मुख्यमंत्री मुंबईत जाणार आहेत’ म्हणून दीड-दोन तासांची वाहतुक कोंडी होत आहे. थोडेसे नियोजन व्यवस्थित केले तर हा सगळा त्रास वाचेल. पण, त्याचा विचार कोण करणार? यात मुख्यमंत्र्यांचा दोष नाही. त्यांच्यासाठी असलेल्या व्यवस्थेचे नियोजन बरोबर नाही. ते घरातून बाहेर पडण्यापूर्वी १० मिनीटे वाहतुक थांबवली तर समजू शकते... एक-एक तास वाहतूक थांबवून ठेवायची.... हे मुख्यमंत्र्यांना माहितीही नसेल... एकीकडे पाऊस... दुसरीकडे खड्डे.... तिसरीकडे मानवनिर्मित वाहतूक कोंडी... सर्वच बाजूंनी सामान्य माणसांची कोडी होत आहे. जे पायी चालत आहेत... रिक्षात पावसाची झड खात आहेत.. जे बाईकवर आहेत.... ज्यांना पाऊस झोडपतोय... त्यांचे हाल तर आणखीनच वेगळे... चारचाकी गाड्यांमध्ये बसलेले त्यामध्ये अनेकजण आजारी रुग्ण, अनेक वृद्ध, काही गरोदर महिला, अनेकजण डायबिटीसवाले.... अनेकांच्या वेगवेगळ्या अडचणी.... या सगळ्या वाहतूक कोंडीतून कामाच्या जागेवर पोहोचणे... किंवा कामावरून घरी पोहोचणे, या सगळ्याच गोष्टी अतिशय अवघड झालेल्या आहेत. आणि यात निसर्गाचा दोष कमी आणि माणसांचा दोष जास्त.... व्यवस्थेचा दोष तर सर्वात जास्त... 

तक्रार केली जाते...., ‘अहो, काय तुफान पाऊस.... त्यामुळे रस्ते उखडले....’ माणसं भाबडेपणाने बोलतात... अनेकांना यामागचे ‘टक्केवारी’चे उघडपणे बोलले जाणारे राजकारण माहिती नसते. आज हे सगळे रस्ते, ‘महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे’ आहेत. तिथे राधे:शाम मोपलवार नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत... त्यांना निवृत्तीनंतरही पाचवेळा मुदतवाढ दिलेली आहे. पहिली मुदतवाढ फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिली... दुसरी आणि तिसरीही फडणवीस यांनीच दिली... चौथी आिण पाचवी उद्धव ठाकरे साहेबांनी दिली. हे खाते आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते. आता सगळी खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. पाऊस फक्त मुंबईतच पडतो, अशी स्थिती नाही. कोल्हापूर सोडल्यानंतर महाराष्ट्रातील कागल हा शेवटचा मतदारसंघ सोडला की, कर्नाटक सुरू होते... नंतर केरळ... एकदा मोपलवारांना या राज्यात पावसाळ्यात पाठवा... तिथे वाहतूक किती आहे बघा... हुँदाईच्या गाड्या घेवून लांबलचक ट्रेलर त्या रस्त्यांवर आहेत की नाही बघा... धो धो पाऊस आहे की नाही ते बघा... तिथले रस्ते उखडलेत का? याची माहिती घ्या.. का उखडले नाहीत, याच्या खोलात जा... बेळगाव आणि त्रिवेंद्रमपर्यंत कसे रस्ते आहेत, याची एकदा माहिती घ्या... मुंबईत पाऊस सुरू होण्याआगोदर केरळातून पाऊस मुंबईत येतो... तिथले रस्ते उखडत नाहीत... याचे कारण ते माती आणि रेतीचे बनवत नाहीत. इथे सगळे काम बोगस केलेले आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी रेतीमध्ये डांबर किती असावे? याचे प्रमाण ठरलेले आहे... ठरलेल्या डांबराच्या प्रमाणापेक्षा एक टक्का जास्त डांबर कुठेही वापरलेले दिसत नाही. उलट ठरलेल्या प्रमाणाच्या ५० टक्केही डांबर ठेकेदार वापरत नाहीत, हे आज उघडपणे सांगतो. योग्य प्रमाणात डांबर वापरले तर रस्ते एका पावसात उखडणे शक्य नाही. याची एकदा राज्य पातळीवर जाहीर चौकशी करा... हवे तर न्यायालयीन चौकशी करा... आतापर्यंत या रस्त्यांवर झालेला खर्च लोकांना सांगा... कोणती एजन्सी काम करते, तेही सांगा... मोपलवार यांनी याची चौकशी केली का? हेही सांगा... पाच-पाच वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतर एका पावसात रस्ते उखडले म्हणून ही मुदतवाढ दिलेली आहे का? नव्या मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर आता द्यायला हवे. सामान्य माणसांची किती बाजूंनी कोंडी करणार? याचेही उत्तर हवे आहे. कितीही पाऊस पडला तरी पावसाला दोष देता येणार नाही. दोष व्यवस्थेलाच द्यावा लागेल. पावसाला शिव्या घालून पाऊस आला नाही तर, तो आला नाही म्हणूनही, शिव्या घालणार.... निराधार आकाशातून पडणारा पाऊस जगाचा आधार आहे... तो आला की, त्याचे स्वागतच करायला हवे. त्याने धँुवाधार यावे... आमचे कवी मित्र दया पवार हे याच पावसावर एक छान कविता करून गेले... 

‘अरे पावसा, मुसळावाणी ये…
आिण एकदा जगबुडी होऊ दे…’

पाऊस आल्यावर रस्ते उखडतात.. हे 'नवीन बांधकामशास्त्र' नेत्यांमुळे निर्माण झालेले आहे. या सगळ्या व्यवहारातील ‘टक्केवारी’ उघडपणे चर्चेत असते. त्या ठेकेदाराने आवश्यक तेवढ्या डांबराचे मिश्रण करून रस्ते करायचे म्हटले तर त्याचे दिवाळं निघेल. कारण एकच रस्ता करायचा नाही... हा ठेका मिळवण्याकरिता अनेक ‘रस्त्यावरून’ त्याला चालावे लागते. आणि त्याचा खर्च खूप होतो. मग, तो सचोटीने काम कशाला करेल? एकदा खोलात जावून या सगळ्याची चौकशी करा. चार दिवस पेपरबाजी होते... फोटो छापले जातात... ज्यांना वाहतुककोंडीत अडकावे लागते ते आपण कसे आडकलाे, याची वर्णने घरी आल्यावर करतात. नंतर सगळे विसरले जाते. आताही तसेच होईल. जिथपर्यंत या रस्त्यांच्या डांबरामागे व्यवस्थेला सांभाळण्याची वाळवी लागेली आहे, तिथपर्यंत पहिल्या पावसात खड्डे पडणारच... 

मोपलवारांना अजून ५० वर्षे मुदतवाढ दिलीत, तरीही खड्डे हे पडणारच. खड्डे पडणार, कोंडी होणार... मूळ दुखण्याला हात घातल्याशिवाय रोग बरा होणार नाही... खड्डे बुजवून व्यवस्थेचा खड्डा बुजणार नाही. हे सत्य समजून घ्या... पण, वेळ कोणाला आहे?
                  - मधुकर भावे

 264 Total Likes and Views

0 Comments

No Comment.