शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे सुप्रीम कोर्टात काय होते? ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कोर्टाने ११ जुलैची तारीख दिली होती. पण काही झाले नाही. मात्र जे झाले, त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाशी निगडित एकूण सात प्रकरणं होती. मात्र ‘सुनावणीसाठी घटनापीठाची स्थापना करणे गरजेचे आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई करु नये’ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. बहुमत चाचणीच्या वेळी शिंदे गटाचा व्हीप न पाळणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांनाही ह्या आदेशाने दिलासा मिळाला आहे.
कोर्टापुढे केवळ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण नव्हते. शिंदे गटाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्या गटाने ठाकरे गटाच्या १४ आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटीसीचाही विषय होता. आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला बोलावले यालाही शिवसेनेने एक याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीलाही सेनेने आव्हान दिले आहे. अशा एकूण चार याचिका कोर्टापुढे होत्या. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आपण घटना पीठाकडे देत आहोत असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. ह्या निकालाने कोणाला काय दिलासा मिळाला याची चर्चा सुरु झाली आहे. काहींचे म्हणणे आहे, की शिंदे गटाला दिलासा आहे तर काहींचे उलटे मत आहे. नेमके काय झाले? काय होणार?
घटना पीठाकडे मामला गेल्याने निकाल यायला खूप वेळ लागणार आहे. आमदारांच्या बंडाची अशी प्रकरणे लवकर निकालात निघत नाहीत असा अनुभव आहे. तारीख पे तारीख. पण ह्या निकालाने शिंदे सरकार आता सुप्रीम कोर्टाच्या मर्जीवर आहे असे अनेकांना वाटते. पण सरकारला धोका नाही. सरकार चालू राहील. तिकडे कायद्याचा किस पडणेही चालू राहील. ११ तारखेच्या भीतीने सरकारचा शपथविधी लांबला होता. पण आता सरकार शपथविधीला मोकळे आहे. बहुधा १३ जुलैला हा शपथविधी होईल. शिंदे-फडणवीस सरकारला फक्त अडीच वर्षे काढायची आहेत. घटना पिठाचा निकाल आधी येतो की २०२४ ची निवडणूक आधी येते ते पहायचे. एक मात्र खरे. १६ बंडखोर आमदारांना घरी पाठवून शिंदे सरकारला हादरा देण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव उधळला गेला आहे. त्यांना काही वेगळे अपेक्षित होते. पण उद्धव यांचे सारेच पत्ते उलटे पडत आहेत. ४० आमदार त्यांना सोडून गेले, नन्तर सरकार पडले, शिवसेना फुटली. त्यांचे खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. उरलीसुरली शिवसेना वाचवण्यासाठी ठाकरे परिवाराला धावपळ करावी लागत आहे. शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. पण करणार काय? कोर्टाचे दरवाजे ठोठावले तर त्यांचे ऐकावेच लागेल. घटनापिठाचा निकाल येईपर्यंत वाट पाहणे एवढेच सध्या ठाकरे गटाच्या हाती आहे.
402 Total Likes and Views