ग्लोबल पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले हे राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विभागीय चौकशीत झालेल्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ३४ महिने कामावर हजर न राहता त्यांनी शासनाकडून पगार घेतला असा त्यांच्यावर आरोप आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. त्यांच्यावरील कारवाई अटळ असताना आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपली बाजू त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यानंतर डिसलेगुरुजींवर अन्याय होईल असं पाऊल उचलणार नाही, असं फडणवीस म्हणाले. ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, ज्याने भारताची ख्याती सर्वदूर पसरवलीये, त्यांच्याबाबतीत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, यादृष्टीने योग्य आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, असं फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
आता मुख्यमंत्री ह्या गुरुजीला आधार देणार तर कसा देणार? हा प्रश्न आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील शाळेत व ‘डायट’कडे सतत गैरहजर राहिल्याबद्दल झालेल्या चौकशीने हे ग्लोबलगुरुजी अडचणीत आहेत. चौकशी अहवालानुसार कारवाई झाली तर त्यांची सेवासमाप्त किंवा बडतर्फी होऊ शकते. डिसले यांनी राजीनामापूर्व अर्ज दिला आहे. राजीनामा मंजूर होण्याअगोदर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती आहे.
हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे आहे. पीएचडी करण्यासाठी डिसले यांनी जिल्हा परिषदेकडे ६ महिने सुट्टी मागितली होती. त्यावरून मोठे वादळ झाले होते. तेव्हाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली आणि त्यांचा सुट्टीचा अर्ज मंजूर झाला. मात्र आजतागायत त्यांनी पीएचडी प्रवेशाचा एकही पुरावा सादर केला नसल्याची माहिती मिळते. डिसले यांना अमेरिका फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासन येथे कुठलाही पुरावा शिक्षण खात्यात दिला गेला नाही. ग्लोबल पुरस्कार मिळाल्याबाबत देखील सबळ माहिती डिसले यांनी शिक्षण विभागाला दिली नाही. त्यामुळे नवे मुख्यमंत्री ह्या ग्लोबल गुरुजीला आधार देणार तरी कुठला?
178 Total Likes and Views