बाळासाहेबांची शिवसेना एक असावी हीच सर्वांची इच्छा; दीपाली सय्यद यांचे स्पष्टीकरण

Editorial
Spread the love

शिवसेनेतून बंड करत ५० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे )यांनी बंड केलं आणि भाजपसोबत (BJP)सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याचं ट्विट दिपाली सय्यद (Deepali Sayed)यांनी केलं. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं.

मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबतही बोलले. यानंतर त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत. बाळासाहेबांची शिवसेना एकच असावी ही दोन्ही गटातील आमदारांची, माझी आणि तमाम शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेत दोन गट नकोत हि माझी स्वतःची इच्छा आहे. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावे असे मला मनापासून वाटते. दोन्ही गटांमध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत असून लवकर यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

माझ्यावर कारवाईचा बडगा उचलण्याचा कोणताही संबंध येत नाही. उद्धव ठाकरे मोठे आहेत. ते काहीही करू शकतात. शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही एकत्रही येऊ शकतात. सगळ्या आमदारांना माझं आवाहन आहे की शिवसेनेत दोन गट नकोत. त्यामुळे कार्यकर्ते होरपळत आहेत. मला दोन्ही गटांमध्ये बोलून हे जाणवलं आहे की त्यांना एकत्र यायचं आहे. पण कुणी समोर येऊन बोलत नाही. मान अपमान यामध्ये अडकले आहेत. मात्र तो विचार सोडून एकत्र यायला हवं असं दिपाली सय्यद बोलताना म्हणाल्या.

संजय राऊतांच्या बोलण्यामुळे विधानांमुळे शिंदे गटातील आमदार जास्त दुखावले का, याबाबत विचारले असता दिपाली सय्यद म्हणाल्या, याला टोचून बोलणे, त्याला टोचून बोलणे सुरू आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यांना शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्र आणावे, असे आवाहन दिपाली सय्यद यांनी केले.

मी शिवसैनिक आहे. आमचे शिवसैनिक एकत्र येत असतील तर मी सर्वांचेच आभार मानेल. भाजप असो, शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो सर्वांचे आभार मानेन. दोन्ही ग्रुपमध्ये इगो हर्ट आहे. तो तुटला तर या गोष्टी पूर्ण होतील. पण माझे नेते उद्धव ठाकरे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता प्रत्येक पक्ष आपआपला विचार करतोय. नैसर्गिक युती होत असेल, तर झाली पाहिजे. शिंदेंची घरवापसी झाली पाहिजे. एका घराचे दोन तुकडे नको. प्रत्येकाने शांततेने प्रयत्न केले तर त्यातून नक्कीच मार्ग निघेल. येणाऱ्या काळात हे होईल, असे मला वाटते, असेही त्यांनी सांगितले.

 185 Total Likes and Views

0 Comments

No Comment.