एसटी नदीत पडून १३ बुडाले

Editorial
Spread the love

                 मध्य प्रदेशातील  इंदूर  येथे एका पुलावर महाराष्ट्राची एसटी बस नर्मदा नदीत कोसळून आटले सर्व १३ प्रवासी बुडाले. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची ही  बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी येथील नर्मदा नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळली. सकाळी दहाच्या सुमारास  या दुर्घटनेत एसटीच्या चालक आणि वाहकासह एकूण १३ जणांनी जीव गमावला. तसंच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला, आत किती प्रवासी होते  हे सांगायला कोणी जिवंत नाही.  चालक चंद्रकांत पाटील आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी हे बस घेऊन येत होते. मात्र खलघाट आणि ठिगरी येथील पुलावर आल्यानंतर बसचा टायर फुटला आणि बस थेट नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली. काहींनी मात्र वेगळे  सांगितले.  समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या  मोटर सायकलवाल्याला वाचवण्याच्या  धडपडीत चालकाचा   बसवरील ताबा सुटला आणि  पुलाचे कठडे तोडून बस २५ फुट खाली  नदीत पडली.

बस दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे. चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (वय ४५, राहणार अमळनेर , जळगाव), वाहक प्रकाश श्रावण चौधरी (वय ४०, रा. शारदा कॉलनी, अमळनेर जळगाव), निंबाजी आनंदा पाटील (वय ६०, रा. पिळोदा ता. अमळनेर) आणि कमला निंबाजी पाटील (वय ५५, रा पिलोदा ता. अमळनेर) अशी जळगाव जिल्ह्यातील चारही मृतांची नावे आहेत. तर मूर्तिजापूर, अकोला येथील अरवा मुर्तजा बोरा (वय २७) यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे.

   मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची तर   महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  मदत करून  हा प्रश्न सुटणार नाही.  असे अपघात होतातच कसे?  एसटीच्या बसेस आधीच खटारा झाल्या आहेत. त्या बदलण्याची गरज आहे का? गाड्यांची देखभाल व्यवस्थित  होते का?  ह्या प्रश्नांच्या  मुळाशी जावे लागेल. सध्या पावसाचे  दिवस आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.  एसटीच्या अधिकाऱ्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.

 104 Total Likes and Views

0 Comments

No Comment.