२१ जुलैला देशाच्या १६ व्या राष्ट्रपती म्हणून एनडीएच्या उमेदवार ६४ वर्षे वयाच्या द्रौपदी मुर्मू यांची घोषणा झालेली असेल. आदिवासी समाजाची कोणी पहिल्यांदाच राष्ट्रपती झालेली असेल. पण मुर्मू यांची एवढीच ओळख नाही. प्रचंड संघर्षातून मुर्मू इथपर्यंत पोचल्या आहेत. त्या मुळच्या ओडिशातल्या. पहाडपुर गावच्या. वडील लहान शेतकरी. घरच्या गरिबीतही त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी लहानसहान नोकऱ्या केल्या. पाटबंधारे आणि ऊर्जा खात्यात त्या ज्युनिअर असिस्टंट होत्या. पुढे त्या शिक्षिका बनल्या. १९९७ मध्ये त्या राजकारणात उतरल्या आणि मग मागे वळून पाहिले नाही.
द्रौपदीने भगवान कृष्णाला संकटंच मागितली होती. ह्या द्रौपदीच्या वाट्याला संघर्षच आला. ओडिशामध्ये राज्यमंत्री राहिलेल्या मुर्मू यांना आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. १९८० मध्ये त्यांचे लग्न झाले. दोन मुले झाली. पण दोघेही गेली. एकाचा रहस्यमय मृत्यू झाला तर दुसरा रस्ता अपघातात गेला. सध्या एक मुलगी आहे. ती बँकेत काम करते. द्रौपदी यांचे पती बँकेत होते. व्ह्र्दयविकाराच्या धक्क्याने ते अचानक गेले. एकट्या पडलेल्या मुर्मू यांनी आपले मन अध्यात्माकडे वळवले. पुढे भाजपने त्यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून पाठवले.
ह्या धकाधकीत मुर्मू यांच्या आयुष्यात काही सुखद क्षणही आले आहेत. फार थोड्या लोकांना माहित असेल, त्यांचा प्रेमविवाह झाला होता. ४२ वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्या काळात प्रेम विवाह हे अप्रूप होते. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपती टुडू असे होते. लग्नानंतर त्या द्रौपती मुर्मू झाल्या. कॉलेजकाळातली त्यांची लव्हस्टोरी आहे. मुर्मू यांचे भुवनेश्वरमध्ये पदवीचे शिक्षण सुरू होते. याच दरम्यान त्यांची भेट शाम चरण मुर्मू यांच्याशी झाली. शाम चरण हे देखील याच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. काही दिवसांतच दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. शाम चरण हे १९८० मध्ये लग्नाचा प्रस्ताव घेऊन द्रौपती मुर्मू यांच्या गावी गेले. त्यांनी सोबत काही नातेवाईकांनाही नेले होते. त्यांनी तीन दिवस वरवाडा गावात तळ ठोकला होता. मात्र, द्रौपती मुर्मू यांचे वडिलांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. अखेर नातेवाईकांनी समजवल्यानंतर त्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला. द्रौपदी टुडू आणि शाम चरण मुर्मू हे दोघेही संथाल समाजातून येतात. या समाजातील पंरपरेनुसार मुलाच्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाला हुंडा दिला जातो. तो किती द्यायचा हे मुली आणि मुलाचे कुटुंबीय बसून ठरवतात. त्यावेळी दोघांच्याही परिवारांमध्ये झालेल्या चर्चेतून एक गाय, बैल आणि १६ जोड्या कपडे देण्याचे ठरले होते. पहाडपूर गावाच्या मध्यभागी एक एक छोटी इमारत आहे. ही इमारत पूर्वी द्रौपदी मुर्मू यांचे घर होते. मात्र, मुलं आणि पतीच्या मृत्यू नंतर त्यांनी या इमारतीचे शाळेत रुपांतर केले. द्रौपदी मुर्मू या मुलांच्या आणि पतीच्या पुण्यतिथीला येथे येतात. एक संवेदनशील महिला देशाला राष्ट्रपती म्हणून मिळत आहे.
203 Total Likes and Views