भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेला गेली दोन वर्षे आर्थिक संकटाने घेरल्यामुळे सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली. जीवनाश्यक वस्तुंची मोठी टंचाई भेडसावत आहे. महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल – डिजेल अडिचशे रूपये लिटरवर पोचले आहे. सत्ताधारी राजपक्षे परिवाराविषयी जनमानसात प्रचंड आक्रोश आणि प्रक्षोभ प्रकटला आहे. दि. ९ जुलैला संतप्त निदर्शकांनी ऱाष्ट्रपती निवासाला घेरावो घातला व नंतर हजारो निदर्शक राष्ट्रपती निवासात घुसले आणि तेथे मनमुराद लुटालूट सुरू झाल्याचे चित्र जगाला दिसले. श्रीलंकामधे अराजक निर्माण झाल्याने कुणाचा कुणाला मेळ नाही. राज्यकर्त्यांच्या विशेषत: राजपक्षे परिवाराच्या विरोधात निर्माण झालेला प्रक्षोभ शांत करणे कुणालाच शक्य झालेले नाही.
यापुर्वी प्रक्षुब्ध जमावाने राजपक्षे यांचे लहान भाऊ व माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कोलंबो येथील निवासाला घेरावो घातला तेव्हा महिंदा हे आश्रय घेण्यासाठी नौदलाचा तळ गाठला. दि. १२ मे रोजी महिंदा राजेपक्षे यांनी राजीनामा दिल्यावर विक्रमसिंघे हे पंतप्रधान झाले होते.
राजपक्षे परिवाराने सत्तेची सर्व मोक्याची व महत्वाची पदे काबीज करून श्रीलंकाला बेसुमार लुटले अशीच भावना तेथील सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे. देशाला आर्थिक संकटात ढकलायला राजपक्षे परिवारच कारणीभूत आहे अशी भावना देशात बळावली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, सिंचन मंत्री चामल राजपक्षे आणि क्रीडा मंत्री नामल राजपक्षे या सर्वांच्या विरोधात देशात असंतोषाचा वणवा पेटला आहे. या सर्वांनाच आपल्या पदाचे राजीनामे देण्याची पाळी आली.
एक काळ असा होता की श्रीलंकाचे ७० टक्के बजेट हे राजपक्षे परिवाराच्या हाती एकवटले होते. राजपक्षे परिवाराने ४२ हजार कोटी रूपये बेकायदशीरपणे परदेशात गुंतवले आहेत, आरोप केला जात आहे. राजपक्षे परिवाराला मदत करण्यात सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकाचे गव्हर्नर अजित निवार्ड यांनी महत्वाची भूमिका बजावली असेही सांगण्यात येत आहे.
शहात्तर वर्षाचे महिंदा राजपक्षे हे परिवाराचे प्रमुख आहेत. २००४ मधे पंतप्रधान म्हणून भूमिका पार पाडल्यावर २००५ ते २०१५ याकाळात ते राष्ट्रपती होते. तामिळी लोकांचे आंदोलन चिरडून टाका, असे त्यांनीच आदेश दिले होते. जनतेचा असंतोष वाढू लागताच त्यांनी दहा मे रोजी राजीनामा दिला. महिंदा यांच्या कारकिर्दीतच श्रीलंका व चीन यांची जवळीक वाढली. पायभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी चीनकडून ७ लाख अब्ज डा’लर्सचे कर्ज घेतले. मोठ मोठी कर्ज घेतलेले प्रकल्प कागदावरच राहीले, त्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला. राजपक्षे परिवारात सर्वात शक्तिमान महिंदा होते म्हणूनच त्यांना द चीफ म्हटले जायचे.
माजी लष्करी अधिकारी असलेले गोटबाया २०१९ मधे श्रीलंकाचे राष्ट्रपती झाले. संरक्षण सचिवापासून त्यांनी अनेक जबाबदारीची पदे संभाळली आहेत.
७१ वर्षाचे बासिल राजपक्षे हे अर्थमंत्री होते. सरकारी कामासाठी दिलेल्या कंत्राटात ते कमिशन घेत असत, म्हणून त्यांना मिस्टर १० पर्सेंट म्हटले जायचे. सरकारी खजिन्यात त्यांनी लाखो डा’लर्सची हेराफेरी केल्याचे आरोप झाले. गोटाबाय राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्यावरील सर्व कारवाया रद्द झाल्या. ७९ वर्षाचे चामल हे महिंदा यांचे मोठे बंधु आहेत. जहाज व नागरी उड्डाण मंत्री म्हणून त्यांनी काम केले. चामल हे जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांचे शरीर रक्षक होते. पस्तीस वर्षाचे नामल राजपक्षे हे महिंदा यांचे मोठे पुत्र. २०१० मधे वयाच्या २४ व्या वर्षीच ते संसद सदस्य झाले. त्यांच्यावर मनी ला’ड्रिंगचे आरोप झाले.
श्रीलंकाला आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात प्रथमच सापडला आहे. श्रीलंकाच्या विदेशी गंगाजळीत खडखडाट आहे. जीवनावश्यक वस्तुंची आयात करायला या देशाकडे परकीय चलन नाही. देशात अन्न- धान्य, साखर, दुधाची पावडर, फळे , औषधे यांची मोठी टंचाई आहे. देशात तेरा ते चौदा तास वीजेचे लोडशेडिंग आहे. बसेससाठी डिझेल नसल्याने सार्वजनिक प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दहा बारा वर्षापासून श्रीलंका सतत नवनवीन कर्ज घेत आहेत. चीन, भारत व जपान या देशांकडून घेतलेल्या कर्जाखाली श्रीलंका बुडली आहे. २०१८- १९ मधे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी हंबनटोटा बंदर चीनला ९९ वर्षाच्या लीजवर देऊन टाकले. जागतिक बँक, आशियायी विकास बँक आदींची फार मोठी देणी श्रीलंकेच्या डोक्यावर आहेत. निर्यात वेगाने घटली असून व्यापारात दहा हजार कोटी डा’लर्सचा घाटा आहे. एका डा’लरची किमत श्रीलंकेच्या ३९० रूपयापर्यंत पोचली आहे.
श्रीलंकाचे राष्ट्रपती गोटबाया यांनी देशातून पलायन केले व ते मालदिवला पळाले. राजपक्षे देश सोडून पळाल्याचे कळतात जनता आणखी क्षुब्ध झाली. देशात अन्न धान्याची टंचाई आहे, महागाईने कळस गाठला आहे, देश कर्जबाजारीपणामळे दिवाळखोरीत निघाला आहे आणि राष्ट्रपतींनीच देशातून पळ काढला आहे. संतप्त जमावाकडून कोलंबोमधे सरकारी व सार्वजनिक मालमत्तेची नासधुस, लुटालूट आणि जाळपोळ सुरू झाल्याने पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जारी केली. देशात अनेक ठिकाणी पोलीस व निदर्शक यांच्यात धुमच्चक्री बघायला मिळाली. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जनतेच्या उठावापुढे श्रीलंकेच्या सैन्य दलाने आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत. न’शनल टीव्ही च’नेल असलेल्या रूपवाहिनीच्या स्टुडिओवरही निदर्शकांनी कब्जा मिळवला. निदर्शकांवर हेलिका’प्टरमधून लक्ष ठेवले जात आहे. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी ठिक-ठिकणी हवेत गोळीबार केला जातो आहे. श्रीलंकेतील घ़डामोडींची भारताने दखल घ्यावी अशी मागणी तेथील जनतेकडून होत आहे. राष्ट्पतीपदावर असताना गोटबाया हे दुसऱ्या देशात पळून गेले की त्यांना पळवून लावले ? हा प्रश्न लाख मोलाचा आहे. गोटबाया यांना अमेरिकेत जायचे होते, त्यांच्याकडे श्रीलंका व अमेरिका असे दुहेरी नागरिकत्व होते. पण २०१९ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यापुर्वी त्यांनी अमेरिकन नागरिकत्व सोडून दिले. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने श्रीलंकेतील घटनेनुसार एकाच देशाचे नागरीक असणे आवश्यक आहे.
दि. १५ जुलै २०२२ रोजी राजपक्षे परिवाराच्या विरोधात देशात प्रक्षोभ सुरू झाला व सरकारने खाद्यपदार्थांवर आणीबाणी जारी केली. २ एप्रिल रोजी राष्ट्रपती निवासाबाहेर हिंसक निदर्शने झाली. ४ एप्रिल रोजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमलसह २६ मंत्र्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले. ९ मे रोजी महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. रोनिल विक्रमसिंघे पंतप्रधान झाले. ५ जुलै रोजी विक्रमसिंघे यांनी श्रीलंका दिवाळखोर झाल्याची घोषणा केली. ९ जुलै रोजी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसखोरी केली व ताबा मिळवला. १० जुलै रोजी निदर्शकांनी विक्रमसिंघे यांच्या निवासाला आग लावली. जनमताच्या रेट्यापुढे गोटबाया यांनी राजिनामा पत्रावर स्वाक्षरी केली. श्रीलंकेत नवीन राष्ट्रपतीपदासाठी २० जुलै रोजी निवडणूक होणार आहे. गेले महिनाभर श्रीलंकेतील अराजकाकडे सारे जग पाहात आहे पण कोणीही हस्तक्षेपासाठी पुढाकार घेतला नाही.
इंडिया का’लिंग- सुकृत खांडेकर
178 Total Likes and Views