हेडिंग वाचून दचकलात का? दचकू नका. स्वातंत्र्य मिळाल्यानन्तरच्या ७५ वर्षात हेच चालत आले आहे. स्वातंत्र भारतात आजही ८० कोटी लोक गरीब आहेत असे खुद्द सरकारनेच मान्य केले आहे आणि त्या हिशोबाने फुकट अन्नधान्य दिले गेले. मग अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या गरीब असलेल्या देशाच्या राष्ट्रपतीला नोकरी संपल्यानन्तर किती पगार मिळावा? किती फायदे मिळावेत? पूर्वी हे खपले. पण आता करोनाने सामान्य माणसाचे बजेट उद्धवस्त केले असताना निवृत्तीनंतरचे राष्ट्रपती यांना मिळणारे फायदे सामान्य माणसाला अस्वस्थ करणारे आहेत. तेवढे फायदे आपली व्यवस्था सामान्य माणसाला का देऊ शकत नाही? राष्ट्र्पतीचे नागरिकत्व आणि सामान्य माणसाचे नागरिकत्व … दोन्ही वेगळे असते काय? निवृत्तीनंतर सरकार त्यांना पोसू शकते तर प्रत्येक इतरांना का पोसू शकत नाही?
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपेल. त्यांच्यासाठी २३ जुलैला अशोका हॉटेलमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदावर असताना रामनाथ कोविंद यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळाल्या आहेत. यामध्ये महिन्याला पाच लाख रुपये वेतन, मोफत वैद्यकीय सेवा, प्रवास सुविधा यासारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे. यापैकी बऱ्याचशा सुविधा निवृत्तीनंतरही कोविंद यांना मिळत राहतील.
राजेमहाराजे संपवले असे सांगितले जाते. पण त्यांच्या रूपाने वेगळे राजेमहाराजे आजही आपल्या छातीवर बसले आहेत. रामनाथ कोविंद यांच्या निवृत्तीची तयारी गेल्या महिन्यापासूनच सुरू झाली. राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर कोविंद १२ जनपथ येथे राहतील. हा बंगला लुटियन्स दिल्लीतील सर्वात मोठ्या बंगल्यांपैकी एक आहे. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान निधनापर्यंत याच बंगल्यात वास्तव्यास होते. कोविंद २५ जुलैला १२ जनपथला राहायला जातील. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी १० जनपथला राहतात. म्हणजेच कोविंद लवकरच सोनिया गांधींचे शेजारी होतील.
निवृत्तीनंतर कोविंद यांना दर महिन्याला दीड लाख रुपये पेन्शन मिळेल. सचिव दर्जाचे कर्मचारी आणि कार्यालयाचेही पैसे मिळतील. रामनाथ कोविंद यांना आयुष्यभर भाडं द्यावं लागणार नाही. निवृत्त झाल्यानंतर कोविंद यांना दोन लँडलाईन, एक मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन मिळेल. यासोबतच मोफत वीज आणि पाणी मिळेल. एक कार आणि चालकही त्यांच्या दिमतीला असेल. रामनाथ कोविंद यांना निवृत्तीनंतर दोन सचिव मिळतील. दिल्ली पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. त्यांना आयुष्यभर मोफत वैद्यकीय उपचार मिळतील. रेल्वेतून फर्स्ट क्लासचा प्रवास आणि विमान प्रवास त्यांना मोफत असेल. त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीलादेखील प्रवास मोफत असेल. संपूर्ण देशभरात प्रवास करण्यासाठी त्यांना सर्व सुविधांनी सुसज्ज कारदेखील मिळेल. कोविंद यांच्या पत्नीला सचिव दर्जाचा कर्मचारी नियुक्त करता येईल. त्याच्यासाठी त्यांना महिन्याकाठी ३० हजार रुपये मिळतील.
1,201 Total Likes and Views