नितीन गडकरी राजकारण संन्यास घेणार?

Editorial
Spread the love

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. पण परवा त्यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याची खळबळ आहे. निमित्त ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी सत्काराचे होते. त्यात त्यांनी लावलेल्या वेगळ्या सुरामुळे खळबळ आहे. ‘कधी कधी मला राजकारण सोडावेसे वाटते. कारण समाजासाठी करण्याची गरज आहे अशा अनेक गोष्टी आहेत’ असे गडकरी म्हणाले. ‘आज राजकारण म्हणजे १०० टक्के सत्ताकारण झालं आहे’

अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. गडकरी म्हणाले, “राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे.”

गडकरींच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. खरेच ते राजकारणाला कंटाळले आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांचे खटकले आहे का? नेमके असे काय झाले की ते राजकारण संन्यास घेण्याची गोष्ट बोलत आहेत? तशातला भाग नाही. कधी कधी नेते मनातले बोलतात. तसे गडकरी बोलले. त्यात एवढे गंभीरपणे घेण्यासारखे काही नाही. राजकारणी माणूस कधी रिटायर होत नसतो. समोरच्याला त्याला रिटायर करावे लागते. कधी म्हातारपण तर कधी बिघडलेली तब्येत त्याला सक्तीने रिटायर करते. नरेंद्र मोदी आल्यानंतरही लालकृष्ण अडवाणी कुठे रिटायर व्हायला तयार होते? त्यांना सक्तीने ‘मार्गदर्शक मंडळा’त टाकावे लागले. हार्टचे ऑपरेशन झाल्यानन्तर पी व्हि नरसिंहराव पेन्शनीत निघाल्यासारखे होते. पण राजीव गांधी यांची हत्या झाली आणि देशाचे चित्र बदलले तेव्हा रावसाहेब एकदम ‘जवान’ झाले. पंतप्रधान म्हणून पूर्ण पाच वर्षे त्यांनी काम केले.

राजकारण हे ‘बुस्टर डोस’सारखे आहे. सोडतो म्हटले तरी सोडवत नाही. त्यामुळे तुम्ही लिहून घ्या. गडकरीही संन्यास घेणार नाहीत. अजून त्यांना मुख्यमंत्री व्हायचय, पंतप्रधान व्हायचय. २०१४ मध्येच ते पंतप्रधान व्हायचे. पण त्यांच्या घरी आयकर धाड पडली आणि सारी गडबड झाली. भाजपमधल्या काही लोकांनीच गडकरींचा गेम केला असे तेव्हा बोलले गेले. पण ती धाड पडली नसतो तर गडकरींना भाजपचा अध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळाली असती. आणि जर ते अध्यक्ष असते तर पंतप्रधानपदाचा उमेदवार तेच असते. नरेंद्र मोदी तेव्हा पिक्चरमध्ये कुठेही नव्हते. गडकरी साध्ये फक्त ६५ वर्षांचे आहेत. गडकरींच्या अजून खूप काही इच्छा बाकी आहेत. त्या सोडून गडकरी संन्यास घेतील असे अजिबात नाही. आणि गडकरींनी तसे बोलूही नये. मोदींनी त्यांचे म्हणणे मनावर घेतले तर भलतीच पंचाईत व्हायची.

 182 Total Likes and Views

0 Comments

No Comment.