“आपण रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला” असा सनसनाटी आरोप शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘सामना’ ह्या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोर हे पालापाचोळा आहेत असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रियेत काय धोके असतात हे कोणताही डॉक्टर सांगू शकेल. त्याची कल्पना मलाही होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. पाच-सहा दिवसांनी सकाळी जाग आल्यावर आळस देण्याचा प्रयत्न केला आणि अचानक मानेत वेदना जाणवल्या. त्यानंतर माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती. मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन अवर’मध्ये ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळात काही गोष्टींची माहिती माझ्या कानावर येत होती.”
उद्धव पुढे म्हणाले, “माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही असं पसरवलं जात होतं. पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव यांची ही मुलाखत तोडफोड आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी बंडखोरांवर थेट हल्ला आहे. त्यामुळे शिंदे गट आता काय प्रत्युत्तर देतो त्याकडे लक्ष राहील.
184 Total Likes and Views