इकडे कोशारींची माफी, तिकडे नड्डांची फुशारकी

Editorial
Spread the love

तमाम महाराष्ट्रातील जनतेची माफी मागणारे हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत. महाराष्ट्र राज्य झाल्यापासून या राज्यात २१ राज्यपाल झाले. पहिले राज्यपाल श्री. श्रीप्रकाश. हे अत्यंत सुसंस्कृत आणि महाराष्ट्राशी एकजीव होवून त्यांची कारकीर्द सर्वांच्या लक्षात राहिली. १० डिसेंबर १९५६ ते १६ एप्रिल १९६२ अशी सहा वर्षे ते राज्यपाल होते. कसल्याही विषयात त्यांचा कसलाही वाद झाला नाही. त्यानंतरचे डॉ. पी. सुब्रमण्यम. नंतर विजया लक्ष्मीबाई पंडीत. नंतर पी. व्ही. चेरियन. पुन्हा जवळपास सहा वर्षे असलेले अलिअवर जंग, नंतर सादीक अली, लष्कराचे माजी प्रमुख ओ. पी. मेहरा. नंतर वायुदलाचे माजीप्रमुख इद्रस लतिफ. मग कोना प्रभाकर राव, मग डॉ. शंकर दयाळ शर्मा… यांची महाराष्ट्रातील प्रतिमा तर एक वडीलधाऱ्या सारखी होती. त्यानंतरचे के. ब्रह्मानंद रेड्डी, पुन्हा डॉ. सुब्रमण्यम… नंर सर्वाधिक काळ राहिलेले

डॉ. पी. सी. अलेकझांडर (१९९३ ते २००२)…. योगायोग असा की, त्यावेळचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा होते. अलेकझांडर हे ही महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. नंतरचे महंमद फजल… मग कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा… त्यानंतर एस. सी. जमीर, मग के. शंकरानंद आणि मग विद्यासागर राव… त्यानंतर आले कोशारी महाराज….

५ सप्टेंबर २०१९ ला आले. २ वर्षे ३३० दिवसांत त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले. आणि आता त्यांची पायउतार होण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना महाराष्ट्राची माफी मागून जावे लागले…. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाची टोपी घालून राज्यपाल म्हणून ते वावरले. त्याबद्दल कोणी आक्षेप घेतला नाही. पण, संस्काराचा टेंभा मिरवणारा संघ स्वयंसेवक, राज्याचा घटनात्मक प्रमुख असताना त्याच्या भाषेचा दर्जा काय….. त्यामुळे जवळपास ३ वर्षे व्हायला येतील… या राज्यपालांबद्दल महाराष्ट्राला कसलीही आत्मियता वाटत नाही आणि वाटणारही नाही. राज्यपाल पदावरून ज्या दिवशी ते पायउतार होतील, त्या दिवशी महाराष्ट्र असे समजेल की, या ‘संघ स्वयंसेवकाने आयुष्यात सर्वात चांगली गोष्ट आज केली… ती म्हणजे, आज ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाले.’

यापूर्वीच्या राज्यपालांनी जी प्रतिष्ठा मिळवली होती ती या महाशयांनी पार धूळीला मिळवली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राजभवन हे भाजपाचे जणू उपकार्यालयच झाले होते. त्याबद्दलही कोणाची तक्रार नव्हती. पण, याची चर्चा त्यावेळी उघडपणे होत होती. महारष्ट्रात राज्यपाल राहून, महाराष्ट्राबद्दल अपमानाची भाषा वापरणारे राज्यपाल महाराष्ट्र कसा सहन करेल? त्यांनी माफी मागितली… आपल्या संस्कृतीत सांगितले जाते की…. ‘क्षमा वीरस्य भूषणम….’ महाराष्ट्राने त्यांना कधीच क्षमा केली आहे. ते पदावर नसते तर ते जे काही बडबडले त्याला कोणी विचारले असते? पदावर होते म्हणून प्रसिद्धी मिळाली. पण या प्रसिद्धीचे ‘भूषण’ त्यांनी मानले तर मग त्यांच्यासारखे तेच… महाष्ट्रातून जाताना अपकीर्ती घेवून ते जाणार आहेत. आता या राज्यपालांची दखल कोणीही घेणार नाही. आणि महाराष्ट्रात त्यांना कोणी कार्यक्रमांना बोलावणारही नाही.

राज्यपाल हे का बोलले? त्याच्या मागे कोण? कोणाचा तरी भक्कम पाठींबा असल्याशिवाय घटनात्मक पदावरून ही भाषा वापरणे इतके सहज वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रच्या या अपमानामागे अन्य जे कोणी असतील तेही उघडे पडतील आिण महाराष्ट्र त्यांनाही योग्यवेळी योग्य धडा शिकवील. प्रत्येकाची एक- एक वेळ येत असते. आणि जेव्हा चौफर अन्याय होत असतो, तो अन्याय सहन करणारे लगेच व्यक्त झाले नाहीत तर ते अिधक धोकादायक असते. धुमसणारा अग्नी ज्या दिवशी उफाळतो त्या दिवशी तो डोंगर-कडेही गिळून टाकतो, असा भूगोल आहे. तो महाराष्ट्रातच घडलेला आहे. महाराष्ट्र कवी यशवंत यांच्या फार छान अशा चार ओळी अाहेत…

हटून हटतो…. काय सागर…
हटेल एकीकडे…
उफाळेल तो दुसरीकडूनी….
गिळून डोंगरकडे

ज्वालामुखीला बघता लिंपू
काय कल्पना खुळी
तोच अनावर उद्यास होईल
तुम्हास शहाण्णव कुळी….

या कवितेतील शब्दांचा अर्थ समजणारे समजून घेतील.

कोशारी महाराजांचे निवेदन दोन दिवस गाजत राहिले. त्यांची जागा भाजपाचे नियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतली. ‘देशात फक्त भाजपाच टिकेल. शिवसेना असो…. प्रादेशिक पक्ष असो…अन्य प्रादेशिक पक्ष असो किंवा काँग्रेससकट सगळे पक्ष संपून जातील. आणि एकटा भाजापा उरेल,’ असे नड्डा यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे हा देश आता जसा बहुभाषिक आहे तसा तो एकपक्षीय लोकशाहीचा देश होणार आणि बाकी विरोधी पक्षांना या देशात जागा शिल्लक राहणार नाही, असे ‘नड्डाभविष्य’ आहे. मुंबईतील वृत्तपत्रांनी रविवारच्या वृत्तपत्रासाठी भविष्याच्या कॉलमकरिता नड्डा यांना आमंत्रण द्यायला हरकत नाही.
नड्डा हे नेमके कोण? देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा किंवा त्यांच्या पूर्वीच्या पिढीचा त्याग काय? त्यांच्या घराण्याचा त्याग काय? देश उभारणीत त्यांचे काम किती? चार वर्षे केंद्रीय मंत्रीपद मिळालेला माणूस. अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांच्या राज्याबाहेर त्यांचे नावही कोणाला माहिती नव्हते. सत्ताधारी भाजापाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे, त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते. त्यांनी केलेल्या निवेदनात ‘भाजापा हा भक्कम वैचारिक पाया’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नड्डा यांच्या कोणत्याही भाषणात कोणत्याही विचारांची मेजवानी मिळत नाही. किंबहुना भाजापाची संपूर्ण वाटचाल ‘वैचारिक’ आहे की, ‘भावनात्मक’ आहे…. देशाच्या मुख्य प्रश्नांपासून लक्ष उडवण्याकरिता अितशय हुशारीने प्रभू राम-जात-धर्म- सर्व काही वापरून त्याचा फायदा घेणारा हा पक्ष आहे. जात – धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने झाला आणि दुसरकडे पाकिस्तानला शत्रू समजणाऱ्यांनी, पाकिस्तानच्या अध्यक्षाला वाढदिवसाच्या दिवशी आमंत्रण नसताना पाकिस्तानात जाऊन मिठ्या मारल्या. काश्मीरमध्ये मेहबूबा यांच्या मंत्रिमंडळात सामीलही झाले. यात ‘विचार’ होता की, राजकारण होते? हे कोणालाही स्पष्ट करता आलेले नाही. या पक्षाचा आणि विचारांचा फारसा संबंध नाही. भावनात्मक मुद्दे हातात घेवून हा पक्ष मोठा झाला. त्याची मिमांसा एखाद्या प्रबंधात करावी लागेल. पण, नड्डा हे जे काही बोलत आहेत त्याकरिता त्यांनी थोडे थांबायला काही हरकत नाही…. राजकारणाचे भविष्य कोणी वर्तवू नये… या देशातील जनताच सर्वश्रेष्ठ आहे. १९७७ साली ज्या त्वेषाने जनतेने त्यावेळच्या जनता पक्षाला ३/४ बहुमत देवून सत्तेवर बसवले, त्याच जनतेने अडीच वर्षांत पुन्हा इंदिरा गांधी यांना सत्तेवर बसवले होते. बंगालमध्ये एक राज्य जिंकण्यासाठी पंतप्रधानांपासून, गृहमंत्र्यांपासून सगळे उतरले… हरले… आता वेगळ्या मार्गाने बंगाल फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली… आता बंगालची राजकीय फाळणी करण्याचा वेगळा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांत कोणत्या ‘वैचारिक’ भूमिकेवर भाजपाचे राज्य आणले? याचा खुलासा नड्डा यांना करता येणार नाही. महाराष्ट्रात जे काही किळसवाणे राजकारण झाले ते ‘वैचारिक’ आहे, असे नड्डा यांना वाटते का? आणि ते किती दिवस टिकणारे राजकारण आहे? यात वैचारिक काय? याचा खुलासा नड्डा यांनी करायला हवा. आजच्या घटकेला देशात फक्त भाजापा टिकेल, असे म्हणणाऱ्या नड्डा यांना काही दिवस थांबायला हरकत नाही. भाजापाचे अध्यक्ष म्हणून नड्डा किती दिवस टिकतील, याचीच खात्री कोणी देवू शकत नाही. कारण केंद्रीय मंत्रिमंडळ असले तरी सगळा देश दोन व्यक्ती चालवतात. पक्षही दोन व्यक्तीच चालवतात. नड्डा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्रात कोशारी राज्यपाल म्हणून ही वेगळी नावे समोर असली तरी यांच्या मागे शक्ती कोणाची आहे, हे सगळ्या देशाला माहिती आहे. पर्यायी नेतृत्त्व नसतानाही, अतिरेक झाल्यानंतर जनता त्यांचा मताचा अधिकार वापरून भल्याभल्यांना बाजूला करू शकते. हे नड्डा यांना समजायला काही वेळ लागेल. सत्ता आणि पैसा सदा सर्वकाळ लोकांवर राज्य करू शकत नाही. भाजापा आता सत्तेच्या अशा उंचीवर पोहोचलेला आहे…. की, इथून त्या पक्षाची आणि सत्तेची घसरणच आहे…. घाट माथ्यावर पोहोचल्यानंतर उतार सुरू होत असतो… हा निसर्ग नियम आहे. भाजापाचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच नड्डा यांनी असे बेधडक राजकीय निवेदन केलेले आहे. ज्यांच्या मागे ५१ सदस्य आहेत त्यांचे लोकशाहीत बहुमत असणार, हे देशाने मान्यच केलेले आहे. पण, रस्त्यावर लढणाऱ्या ४९ टक्के लोकांना अगदीच क्षूद्र समजू नका. संसदेत बहुमत असलेले रस्त्यावरच्या अल्पमतात असणाऱ्या लढायांनी पराभूत केलेले आहेत. हा इतिहास नड्डांना माहिती नसेल. राज्यपाल जसे नामधारी आहेत… तसे भाजपाचे अध्यक्षही नामधारीच आहेत. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे, हे ही लोकांना खुलेआम माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याची राज्यपालांची भूमिक जशी त्यांच्या अंगाशी आली नड्डांच्या निवेदनाचेही तसेच होईल. थोडे दिवस थांबा… निवडणुका होऊ द्या… संपूर्ण देशात तुम्हाला बहुमत मिळू द्या… मग ‘देशात सर्व राज्यांत बहुमत मिळवणारा भाजापा हा एकटा पक्ष आहे,’ असे तुम्ही अिधक जोरात सांगू शकाल. आणि लोकांचा तसा कौल असेल तर तो या देशाला मान्य होईल. त्यापूर्वीच थाळ्या पिटून विजय कशाला साजरा करता? थोडे थांबा… या देशातील जनता तुमच्या मागे धावत येईल, असे गृहीत धरू नका. दोनदा धावत आली हे खरे… पण, आता अतिरेक झालेला आहे… महागाईचा, बेरोजगारीचा… देशातील अनेक संस्था विकण्याचा… अनेक अदाणी नव्याने पैदा करण्याचा… आणि जात-धर्माच्या नावावर वाहिन्यांना वापरून वातावरण भावान्मक करण्याचा. सुरुवातीला जनतेला हे आवडले. याच जनतेने नोटाबंदीही सहन केली. पण, अतिरेक होतो तेव्हा लोक सगळा हिशेब चुकता करतात. तेवढ्यासाठी नड्डा यांना थोडे थांबावे लागेल. तिथपर्यंत ते अध्यक्ष राहतात की नाही एवढे त्यांनी पहावे. ते काही त्यांच्या लोकप्रियतेमुळे अध्यक्ष झालेले नाहीत, हे देश जाणतो. त्यामुळे सगळे बोलून घालवू नका. थोडे शिल्लक ठेवा. सध्या एवढेच…

  • मधुकर भावे

 194 Total Likes and Views

0 Comments

No Comment.