परवा राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर सारख्या शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली . तेथील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे या उलट्या काळजाच्या पित्याने अज्ञान आणि अंधश्रद्धेपोटी सहा वर्षाच्या आपल्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली त्यातच तिचा मृत्यू झाल्याने या घटनेची चर्चा झाली आणि भुतबाधेच्या संशयावरून तिला अमानुष मारहाण होऊन त्यात तिचा बळी गेल्याचे उघड झाले . अंधश्रद्धेचा खेळ केवळ खेड्यात चालतो , शहरे सुधारली अशी हाकाटी पिटणाऱ्या लोकांना या घटनेने सणसणीत चपराक लगावली आहे. ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वागविले तिलाच अज्ञानातून बेदम मारहाण करताना खुद्द पित्याची बुद्धी जर नराधम बनत असेल तर अंधश्रद्धा माणसाला कसे जनावर बनवते याचा धडा या घटनेतून घेता येतो.
पहिल्या वर्गात जाणारी मुलगी अचानक काहीही खातपीत नाही हे पित्याच्या लक्षात आल्यावर तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचे सोडून मांत्रिकाकडे नेण्यात आल्यावर ही बाहेरची म्हणजे भूतबाधा असल्याचे नेहमीचे विधान मांत्रिकाने केले आणि चिमुरडीच्या अंगातून भूत काढण्याचे अघोरी प्रयोग पालकांनी मांत्रिकाच्या सल्ल्याने सुरु केले . अंधश्रद्धा मनुष्याच्या मेंदूतील विचार करण्याच्या कप्प्यावर पहिला आघात करीत असते. चांगले,वाईट निवडण्याची क्षमता गोठवून टाकण्याचे काम ती करीत असते या घटनेतही तसेच घडले . मुलीच्या अंगातून भूत काढायचे असेल तर तिला मारहाण करून भुताला पळवले पाहिजे असा सल्ला मांत्रिकाने दिला असल्याने खुद्द पिता आणि मामाने चामडी पट्ट्याने सहा वर्षाच्या चिमुरडीला बेदम मारहाण केली .
मुलगी जिवाच्या आकांताने ओरडली तेव्हा हा तिचा आवाज नसून तिच्या अंगातील भूत ओरडत असल्याचा पित्याचा समज करून देण्यात आला होता. नेहमी अशा सर्व घटनांत हेच घडत असते. तीन दशकांपूर्वी याच शहरात प्रतापनगरात एका स्त्रीला भूत बाधा झाल्याचे मांत्रिकाने जाहीर केल्यावर मांत्रिक आणि घरातल्या लोकांनी मिळून तिला केसानी उलटे टांगून रात्रभर अमानुष मारहाण केली . खालून मिरचीची धुरी दिली . रात्रभर हा अत्याचार सहन केल्यावर त्या महिलेने पहाटे प्राण सोडले . ज्यांच्याकडे दाद मागावी ती पोलीस यंत्रणा सुद्धा आपल्याच समाजाचा घटक असते त्यामुळे भूत बाधा झाली की असेच उपचार करावे लागतात हे त्यांच्या अंगवळणी पडलेले असते त्यामुळे असे अघोरी उपचार हा कायद्याने गुन्हा आहे याचेही साधे भान अनेकदा पोलिसांना नसणे ही समाजाची शोकांतिका ठरत आहे
खरंतर भुताच्या नावावर जेवढे उपचार लोकांवर केले जातात ते सगळे रुग्ण मानसोपचार अंतर्गत येतात . मनाचे म्हणजे प्रत्यक्षात मेंदूचेही काही आजार असू शकतात आणि त्यावर उपचार करणारा मांत्रिक नव्हे तर स्वतंत्र मानसोपचार विभाग प्रत्येक सरकारी दवाखान्यात असतो हे आजच्या काळातही आपण समाजाच्या शेवटच्या थरात सांगू शकलो नसेल तर समाज आणि सरकार म्हणून हे आपले सामूहिक अपयश आहे असेच म्हणावे लागेल. या जगात भूत नसते , ते कुणालाही लागू शकत नाही असे आजचे विज्ञान मानते आणि हे मत गेली दोनशे वर्ष तरी जगातील कोणत्याही मांत्रिक , तांत्रिकाला खोदून काढता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ गेली चाळीस वर्ष याच विषयावर लोकांचे प्रबोधन करीत आहे तरीही खेडी सोडा शहरातही मुलींचे बळी पडत असतील तर आपण नेमके कुठे चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे .
आपल्या पुरोगामी राज्यात संत आणि महापुरुषांनी यावर मोठी जागृती केली आहे. सगळ्या संतांनी भूत कसे काल्पनिक असते याची मांडणी केली आहे. रिकामा मेंदू भुताचा कारखाना असे उगीच नाही म्हटले जात. थोडक्यात भूत हे माणसाच्या डोक्यात असते हे ज्याला लक्षात ठेवता आले त्याला कधीही भूत बाधा होऊ शकणार नाही. २०१३ साली आपल्या राज्याने प्रा. श्याम मानव यांच्या पुढाकाराने जादूटोणा विरोधी कायदा केला आहे . या कायद्याला तेव्हा विरोध करणाऱ्या प्रवृत्ती त्याची गरज नसल्याचे ओरडून सांगत होते कारण समाजात खोलवर काय चालते याबाबत ते अज्ञानी होते. अशा घटना आजच्या काळात कानावर आल्या की अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची मोठ्या शहरांना सुद्धा किती गरज आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. शहरी श्रद्धेची घेरी कशी आपला मेंदू बधिर करते आणि हातून कशी अघोरी कृत्ये घडवून आणते हेच या घटनेने शिकवले आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248
796 Total Likes and Views