गडकरींच्या मार्गातील ‘स्पीडब्रेकर’

Editorial Politics
Spread the love

राजधानी दिल्ली / विकास झाडे

नावाप्रमाणेच कामात वाघ असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चर्चेत आहेत. खरं तर ते दिल्लीत आल्यापासूनच आपल्या अघळपघळ व्यक्तिमत्त्वाने चर्चेचा विषय होतात. मोदी सरकारमध्ये सर्वोत्तम काम करणारा मंत्री म्हणून गडकरींचे स्थान नेहमी अव्वल राहिलेले आहे. अद्याप त्यांच्या जवळपास कोणाला फिरकता आलेले नाही. जेव्हा केव्हा मोदी सरकारला त्यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सादर करायची वेळ येते तेव्हा ‘गडकरी एके गडकरी’ हाच पाढा वाचावा लागतो. गडकरींनी देशभरात उभारलेल्या महामार्गांचा चित्रपट डोळ्यांपुढे मांडण्यात येतो. गेल्या ८ वर्षांत ७२ हजार कि. मी. राष्ट्रीय महामार्ग बांधणारे, दर दिवशी ३७ कि. मी. महामार्ग बांधून जगाचा रेकॉर्ड तोडणारे, वडोदऱ्याजवळ २४ तासांत अडीच कि. मी. ४ लेनचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता उभारून विश्व रेकॉर्ड बनविणारे, सागरमाला परियोजना सुरू करणारे गडकरी पक्षासाठी मात्र उपेक्षित ठरतात. का? या प्रश्नांचे उत्तरही शोधणे गरजेचे आहे.

महाजन-मुंडेंनंतर महाराष्ट्रातील भाजपचा बलाढ्य नेता म्हणून निर्विवादपणे गडकरींकडे पाहिले गेले आहे; तेच स्थान त्यांनी दिल्लीतील राजकारणात निर्माण केले. संघाच्या संस्कारात वाढलेल्या गडकरींनी आपण कधी दिल्लीत येऊ, याचे स्वप्नही पाहिले नसेल. परंतु राष्ट्रीय नेतृत्वासाठी दिल्लीत त्याच त्या चेहऱ्यांना आलटून पालटून पुढे करण्याच्या वृत्तीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘खो’ दिला. संघाकडून गडकरींचे नाव पुढे आले तेव्हा दिल्लीतील राजकारणात रुळलेल्या राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अनंत कुमार, यशवंत सिन्हा, अरुण जेटली याशिवाय दिल्लीहून गुजरातला मुख्यमंत्री म्हणून गेलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासारख्यांसाठी धक्का होता. ‘राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला यावे लागेल याची मी कल्पनाच केली नव्हती, सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली असती तरी मला आनंद झाला असता’, असे डिसेंबर २००९ मध्ये पदारूढ झालेले गडकरी सहजनेते बोलून जात होते. मात्र, नागपूरच्या शैलीत रोखठोक बोलण्याचे परिणाम गडकरींना सतत भोगावे लागले. पक्षातीलच लोक कशी अडवणूक करतात, हे त्यांनी वारंवार अनुभवले आहे. अध्यक्ष असतानाच्या प्रारंभीच्या काळात सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर मराठी मिश्रित हिंदीत केलेल्या विचित्र टीकेने गडकरींवर असभ्यपणाची झोड उठली होती. भाजपातील नेत्यांनीच गडकरींच्या वक्तव्याची वात काही काळ तेवत ठेवली. काळ कसा बदलतो पहा, सोनिया गांधींना पुढे अटलजींनंतर विरोधकांमधील सर्वात आवडणारा नेता गडकरी ठरले. विरोधी बाकांवर असूनही गडकरींच्या सर्वोत्तम कामावर आनंद व्यक्त करीत बाक वाजवणाऱ्या सोनिया गांधी होत्या. विरोधकांनी पाठ थोपटावी असे भाग्य किती मंत्र्यांच्या नशिबी आले?

स्पष्टवक्ता असलेल्या गडकरींना दिल्लीतील डावपेचाचा अंदाज यायला खूप वेळ लागला; तोपर्यंत त्यांचे अध्यक्षपद हातचे गेले होते. अशोक रोडवरील भाजपचे मुख्यालय नजरेपुढे आणले तर गुरांचा गोठा असल्यासारखे शेड येथील खोल्यांना होते. अंधारकोठडीतील सभागृह भाजपच्या मानसिकतेचे दर्शन घडवित असे. गडकरी दिल्लीत येण्याच्या आधी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली आदी नेत्यांना मुख्यालयाचा चेहरा बदलावा, असे वाटले नाही. गडकरींनी अडीच वर्षातच ल्युटीयन झोनमधील मुख्यालयाला अत्याधुनिक केले. डौलदार सभागृह बांधले. गडकरींच्या दबंगगिरीमुळे ज्यांना आपले अस्तित्व धोक्यात आहे असे वाटत होते, अशांनी संघही हतबल होईल आणि गडकरींना नागपूरची वाट धरावी लागेल, अशा योजना आखायला सुरुवात केली होती. दुसऱ्यांदा अध्यक्ष होताना ‘पूर्ती’च्या निमित्ताने जे ‘उद्योग’ झालेत, ते कोणी बाहेरच्यांनी केले नव्हते. अरुण जेटली यांच्या मदतीला सखा पी. चिदंबरम कसे धावून आलेत याच्या सुरस आख्यायिका आहेत. दिल्लीतील ज्या पत्रकारांना गडकरींनी लाडावले होते, ज्यांना उमरेड तालुक्यातील बेला येथील पूर्तीचा कारखाना दाखवायला नेले आणि ज्या कॅमेरांमध्ये गडकरींच्या औद्योगिक क्रांतीची गौरवगाथा कॅमेराबंद करण्यात आली होती, ती या पत्रकारांनी कधीच दाखवली नाही. मात्र, पूर्तीमध्ये गडकरींनी घोटाळा केला, याचे दिवसरात्र चित्रण दाखवताना तेच फुटेज वापरण्यात आले. नंतर गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

गडकरींवर हेरगिरी!
गडकरी हे दिल्लीतील असे एकमेव नेते आहेत की, त्यांच्या सुपरफास्ट मार्गांमध्ये सातत्याने ‘स्पीडब्रेकर्स’ येत गेले. एकातून सुटत नाही तर दुसरे संकट उभेच अशी त्यांची अवस्था आहे. तरीही न डगमगता संयमाने ते पुढे जातात. अध्यक्ष असताना त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाला लागून असलेला १३, तीन मूर्ती लेन हा बंगला मिळाला. मे २०१४ मध्ये ते मंत्री झाले त्यानंतर त्यांच्या घराची हेरगिरी करण्यात आली होती. गडकरींच्या दिल्लीतील वाड्यात थेट डायनिंग टेबलपर्यंत कोणतीही व्यक्ती सहज जाऊ शकते. भेटायला येणाऱ्यांवर त्यांनी कोणतीही आचारसंहिता लादली नाही. जुलै २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात गडकरींच्या घरी हेरगिरीची अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आली असल्याचे आढळले. गडकरी यांच्या घरातील हेरगिरी प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले होते. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हेरगिरी केव्हापासून सुरू आहे, याबाबत प्रतिक्रिया देणे आणि त्यामागे कोण आहे, याची शक्यता वर्तविणे, चारदा संसदेचे कामकाज तहकूब होणे, विरोधकांनी जेपीसीची (संयुक्त संसदीय समिती) मागणी करणे इतका सगळा आकांडतांडव झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यात काहीच तथ्य नसल्याचा खुलासा केला. या प्रकरणात तथ्य नसते तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे भारत दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांकडून भारताची कोणत्याही प्रकारची हेरगिरी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला नसता. या हेरगिरीमागे कोण आहे हे शोधणे महत्त्वाचे होते, परंतु विषय थांबविण्यात आला.

मागच्या आठवड्यात पक्षाने गडकरींना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून बाहेर केले. पाऊणशे पेक्षा कमी वयोमान असलेल्या पक्षाच्या माजी अध्यक्षांना संसदीय मंडळाचे सदस्य ठेवण्याची प्रथा यानिमित्ताने मोडण्यात आली. राजनाथ सिंग यांचा मात्र समावेश आहे. गडकरी पक्षाचे आता केवळ सदस्य आहेत. एका सक्षम नेत्याला अशी वागणूक का दिली गेली, यावर चर्चा होत आहे. पुढे त्यांचे मंत्रिपदही टिकून राहील का? त्यांना २०२४ ला लोकसभेची तिकीट मिळेल काय? यावर आता मते व्यक्त केली जात आहेत. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तिथे गडकरी तीन लाखांवर मतांनी निवडून येतात. ती केवळ भाजपची मते नाहीत तर गडकरींची चार दशकातील कमाई आहे. सगळ्याच पक्षातील नेत्यांना ते प्रिय आहेत. त्यामुळे भाजपचे संसदीय मंडळ बनले काय आणि न बनले काय? त्यात गडकरी असोत वा नसोत. काय फरक पडतो. ज्या नेतृत्वाकडून भाजपचे संचालन होत आहे, अशा मंडळातील सदस्यांच्या मताला किती मूल्य असेल? ही बाबही या निमित्ताने अधोरेखित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गप्प का? याबाबतही रवंथ सुरू आहे. परंतु संघाचा भाजपमध्ये हस्तक्षेप नसतो. संघाचा जो अजेंडा आहे तो मोदी सरकार तंतोतंत पाळत आहे. राम मंदिर, कलम ३७०, हिंदुत्व आदींवर त्यांचे काम सुरू आहे. तुम्हाला तुमचे धोरण हवे की व्यक्ती? हा प्रश्न जेव्हा संघाला विचारला जाईल तेव्हा डॉ. मोहन भागवत यांना धोरणांनाच पाठिंबा द्यावा लागेल. दिल्लीत गेल्या १३ वर्षात अत्यंत कार्यक्षम असलेल्या गडकरींचे पंख छाटण्याचे काम त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी केले. तीच मालिका पुढेही सुरू राहील. परंतु भाजप नेतृत्वाकडून होणाऱ्या व्यक्तिद्वेषाच्या या कृतीमुळे गडकरींचा ‘गड’ अधिक मजबूत होतोय. देशाचा जलदगतीने विकास करू शकणारा नेता गडकरीच आहेत हे केव्हाच शिक्कामोर्तब झाले आहे. आता गडकरींच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 182 Total Likes and Views

0 Comments

No Comment.