या, गणराज या….!

Editorial
Spread the love

दरवर्षीचा गणेशोत्सव सोहळा चार दिवसांवर आला. बाहेर पाऊस कोसळत असो किंवा नसो…. गणेशोत्सव जवळ आला की, एक प्रचंड उत्साह अंगात सळसळत असतो. ही ऊर्जा कुठून येते, याचा पत्ता लागत नाही. गरिब असो, श्रीमंत असो…. सगळ्यांचाच हा उत्सव असा उत्साहाचा….. आतापर्यंत गणपतीच्या दिवशी घरी तयार मूर्ती येत होती म्हणून या गणपती बाप्पाशी फार बोलता आले नाही. यावर्षी गंमत झाली…. माझी सुविद्य नेत्रविशारद कन्या डॉ. मृदुला (एम. बी. बी. एस., डी. ओ. एम. एस. ,एफ. आर. सी. एस. आणि एम. बी. ए.)… या कन्येने वेळ कुठून काढला, माहिती नाही… आठ दिवस घरी गणपती तयार करत होती. शाडूच्या मातीचा हा गणपती वरील चित्रात जो आहे, तो माझ्या कन्येने बनवलेला आहे. तिला प्रसिद्धीतंत्र माहिती नाही. त्यामुळे ‘कोटी कोटी रुपे तुझी….’ अशा स्पर्धेत तिने या मूर्तीचे चित्र पाठवले असते.
मी किंवा माझी स्व. पत्नी मंगला आम्हा दोघांनाही कलात्मक अंग जवळपास नव्हते आणि मला तर अजिबातच नाही. कन्येला हे कसं जमतं, तेही समजत नाही. पण, तिने खूप छान मूर्ती तयार केली…. रंगवली… आणि माझ्याच खोलीत ठेवून दिली. शनिवारी पहाटे अचानक जाग आली आणि त्या मूर्तीकडे किती तरी वेळ टक लावून पहात होतो… असा भास झाला की, गणपतीबाप्पा बोलत आहेत… गप्पा मारत आहेत…. ही विद्येची देवता… बुद्धीची देवता…. या मूर्तीकडे पाहताना एक गोष्ट जाणवत राहिली की, बाप्पाची पहिली क्षमा मागू या….
मग, बोलायला सुरुवात केली… गेली दोन वर्षे कोरोनामुळे सामान्य माणसांच्या उत्साहावर कसं विरजण पडले होते…. घुसमट झाली होती. एकाच घरात चार माणसं एकत्र येत नव्हती. एका खोलीत राहिली तरी तोंडं मात्र वेगळी. तोंडावर मास्क…. त्याच दोन वर्षांच्या काळात गणपती आले आणि गेलेही…. काहीजणांच्या घरी दीड दिवस…. काहींच्या घरी पाच दिवस तर काही जणांच्या घरी दहा दिवस…. तसा गणपती बाप्पांचा मुक्काम छोटासाच… पण, मुक्काम हलला की ती जागा कशी ओकी-ओकी वाटते…. दोन-पाच दिवसांत असे जिव्हाळ्याचं नातं कसं काय जमतं….
बाप्पांकडे बघत असतानाच म्हणालो, ‘बाप्पा, यावर्षी कोरोनाचे संकट बरेच दूर केलेत…. महाराष्ट्रावर आणि देशावर तुमची कृपा अशीच राहू दे….. दोन वर्षे का अवकृपा केलीत? किती घरं उद्धवस्त झाली… किती रोजगार गेले… अगोदरची नोटाबंदी…. नंतर कोरोना…. गरीब संस्कार उद्धवस्त झाले… पण तरीही तुमची पूजा- अर्चा- आरती ही माणसं साजरी करत राहिली… आता महाराष्ट्राला आणि देशाला संकटात लोटू नका…. आणि आजच्या या परिस्थितीत तुमच्या शिवाय कोणाचा आधार राहिलेला नाही. महागाई, बेकारी, बेरोजगारी हे सगळे प्रश्न निर्माण करणाऱ्यांना टोकणारे कोणी राहिलेच नाही…. विचारणारे कोण आहे? निर्भय नेतृत्त्व शिल्लक राहिलेले नाही. मग, राजकीय पळापळी सगळ्यांनाच ईडी-सीडीची भिती… सामान्य माणसांना वाचवणारे फक्त तुम्हीच.. सरकारकडून आता ती काही अपेक्षा नाही. आता हे काम तुम्हालाच करावे लागेल. जे चुकत आहेत, त्यांचा कान धरणारे कोण आहेत? तुम्हीच त्यांचे कान धरू शकता… ’
क्षणभर भास झाला…. बाप्पा बोलताहेत…. ते सांगत आहेत…. ‘सगळे अन्याय, अत्याचार तुम्ही सहन करतच आहात…. महागाईचे चटकेही सहन करत आहात…. मग मी काय करणार आहे…? तुमच्यावरील अन्याय-अत्याचार, महागाई, बेकारी याचा राग तुम्हालाच येत नाही…. तर माझ्याकडून काय अपेक्षा करता… ’ बाप्पाला म्हणालो, ‘बाप्पा, तुमचेही तसे बरोबरच आहे म्हणा… पण आता आमचे नेतेही हतबल झाले आहेत…. त्यांच्यात लढण्याची तरी शक्ती द्या…. तेवढे तुम्ही नक्कीच करू शकाल. लढवय्या नेत्याची आज आम्हाला गरज आहे…. ’
बाप्पांना हात जोडून सांगणे आहे….. सध्याच्या या भयानक परिस्थितीमध्ये मार्ग दाखवण्याचे काम तुम्हालाच करावे लागेल. तुमची आरती करताना हीच प्रार्थना आहे…. तुम्ही ‘ज्ञाानमयी’ आणि ‘विज्ञाानमयी’ आहात…. तुम्ही कर्ते-धर्ते आहात…. संकट निवारक आहात… तुमच्यापुढे लोटांगण घालायला आम्हाला काहीच हरकत नाही…. उलट त्यात आनंद आहे. पण, सध्या भलत्यांपुढे लोटांगण घातले जात आहे…. आजचा हा सत्तेचा बाजार…. त्यांना रोखणारे आता कोण राहिले आहे? तुम्हालाच हे काम करावे लागेल…. तुम्ही शंकराचे पूत्र… शंकर महाराजांनी तिसरा नेत्र उघडला तर भस्म करण्याची शक्ती त्यांच्या त्या नेत्रामध्ये आहे…. तुम्ही भस्म करा असे म्हणणे नाही…. पण काहीतरी चुकत आहे, याबद्दल तुम्ही कान धरा… दोन वर्षांच्या काळात हजारो कुटुंबे उद्धवस्त झाली. तुमची प्रार्थना करून थकले…. पण, अनेकजण वाचलेच नाहीत. पण याच काळात ज्याचे नाव माहिती नव्हते असे कोणी आदाणी नावाचे जगातले सगळ्यात श्रीमंत झाले…. हे कोडं काय आहे, बाप्पामहाराज हे आम्हाला काही समजत नाही…. सामान्य माणसं मर-मर करून कष्टाने जगत आहेत… त्यांची महिन्याची तोंड मिळवणी होत नाही…. आणि हे असे आदाणी वर्षा-दोन वर्षात खरबोपती कसे काय होतात? मोठंच कोडं आहे… या मागचं इंगित काय? या मागे कोण? तुम्ही तर नक्कीच नसणार…. पण मग कोण ? ‘इंद्र’ की ‘नरेंद्र’.

लाखो माणसं देशोधडीला लागतात…. रोजगार जातात…. आमच्या रुपयाला जगात कोणी विचारत नाही. आणि पाच-दहा माणसं अशी एका रात्रीत कशी काय कोट्यधीश, अब्जाधीश होतात? तुम्ही संकटमोचक आहात…. मग गरिब माणसांवरील संकट दूर का होत नाही…..? आणि अशा झटकन श्रीमंत झालेल्या लोकांना तुमचा आशीर्वाद कसा काय मिळतो? जी माणसं मनापासून तुमच्या पायाशी लीन होतात ती गरिब माणसंच सध्या अडचणीत आलेत…. महागाईने बेजार झालेत… रोजगार नाहीत म्हणून हताश आहेत…. तरीही तुमच्या पूजा-अर्चेत आणि तुमच्या आगमनासाठी त्यांना प्रचंड उत्साह आहे. त्यांची बाजू घेवून तुम्ही आता या गरिब माणसांचे भले कसे होईल, याची जरा काळजी अिधक घ्यायला हवी. या गरिब माणसांचे वाली आता फक्त तुम्हीच आहात.. आणि तुमचा खरा भक्त तोच आहे….
बाप्पांकडे एकटक लावून पाहात असताना हे सगळे विचार मनात येत होते… आपण सगळे उत्सवप्रिय आहोत. दोन- पाच दिवस उत्सवाचे सरल्यानंतर मग रोजचे सामान्य प्रश्न प्रत्येकासमोर अक्राळ -विक्राळ रूप घेवून उभेच राहणार आहेत. बाप्पांना प्रार्थना करू या की, या सगळ्या कठीण प्रश्नात सामान्य माणसांना वाचव. राजकीय माणसांना सदबुद्धी दे…. सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे ते लक्ष देतील…. त्यांचे प्रश्न सोडवतील… बाप्पांचे आगमन होण्यापूर्वी विधानसभेच्या पायंड्यांवर जो धिंगाणा घातला गेला… त्यात सत्ताधारीही सामील झाले… बाप्पाकहे मागणे आहे की, ‘सत्ताधाऱ्यांना तरी त्यांची ‘पायरी’ दाखवून दे’. सत्तेवर बसलेल्या माणसांनी कसे वागायचे ही सुबुद्धी त्यांना दे….. वरच्या पायंड्यांवर असलेल्यांनी वरच्याच पायंड्यावर रहावे, एवढं तरी बाप्पा त्यांना कळायला नको का? सगळा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे. सामान्य माणसांनी या लोकांना राज्याच्या भल्यासाठी िनवडून दिले आहे. पायंड्यांवर बसण्यासाठी नाही, एवढेही यांना समजत नाही का…. आणि यांचा गोंधळ बघितल्यानंतर बाप्पा, तुम्हालाही राग यायला हवा आहे…. तुम्ही जरा डोळे वटारा…. आपल्याकडे राज्यकर्त्यांना निवडून देण्याची तरतूद आहे. त्याकरिता निवडणूक आहे…. पण राज्यकर्ते चुकीचे वागले तर त्यांना परत बोलावण्याची (रिकॉल) तरतूद नाही…. जगातील काही देशांत ती तरतूद आहे…. त्यामुळे होतेय काय, सामान्य मतदार हताश आहेत. आपला प्रतिनिधी किती वाह्यात वागतोय, हे तो पाहत आहे… पण, काहीच करू शकत नाही. अशावेळी बुद्धीदात्या बाप्पांनी आमच्या या सगळ्या मंडळींना सुबुद्धी द्यावी. राजकारण सभ्यतेने करा….. एवढे तरी त्यांना समजू दे…. महराष्ट्राच्या राजकारणाचे गटार झाले… आता हे सगळे लोकप्रतिनिधी बाप्पा तुमच्यासमोर लोटांगण घालायला येतील तेव्हा त्यांचे कान पकडा…. आिण त्यांना सांगा, ‘जरा नीट वागा’… हा बिघडलेला महाराष्ट्र दुरुस्त करण्याची सुबुद्धी तुम्हालाच द्यायची आहे. सध्याचा महाराष्ट्राचा काळ ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असा आहे. तुम्ही बुद्धीची देवता आहात. तुम्ही या विपरित बुद्धीला दुरूस्त करू शकता. तुमची पूजा-अर्चा करताना आम्ही गरिब माणसं आमच्याकरिता मागून मागून काय मागणार? आणि सामान्य माणसांना मिळणार तरी काय? बाप्पा, किमान देवाने तरी पक्षपात करता कामा नये…. प्रामाणिक कष्टकऱ्यांच्या बाजूनेच त्यांनी उभे रहायला पाहिजे. सत्ताधारी कसेही वागोत… बाप्पांना हात जोडून एवढीच विनंती आहे की, सामान्य माणसांचा वाली तुम्हीच आहात. त्याच्याच वाट्याला सगळ्यात जास्त अडचणी, दु:ख, कष्ट… असे का?
तुमच्या भेटीच्या ओढीने जवळपास अर्धा महाराष्ट्र आपापल्या गावी पोहोचत आहे. गावी पोहोचेपर्यंत त्याचे काय हाल होत आहेत, याची बाप्पा तुम्हाला कल्पना यायला हवी. खड्डे तुडवीत…. गचके खात, तुमचा हा सामान्य भक्त प्रचंड ओढीने गावाकडे निघाला आहे… किती हाल-अपेष्टा सहन करून तुमच्या भेटीसाठी तो आतुरतेने चालला आहे. गेली ५० वर्षे तेच खड्डे… तेच रस्ते…. पण ओढही तीच…. त्याच्या वाट्याला हे सगळं नेहमी का येत आहे? प्रवास सुखाचा का हाेत नाही…. मधले बोके कोण? बाप्पा, तुम्हाला तर हे नक्की माहिती असणार….. सध्या राजकारणात ‘खोके’ आणि ‘बोके’ यांचीच चर्चा आहे. सामान्य माणसांची चर्चा कोणीच करत नाही…. त्यांच्या प्रश्नांची चर्चा नाही…. यावर्षी तुमचा साधारण दहा दिवस मुक्काम असेल, या दहा दिवसांत तुम्ही या सगळ्या लोकांकडे हा हिशेब मागा…. नाहीतर त्यांान सरळ शाप द्या… गरिब माणसांना फसवून जे कोणी कामं करतील त्यांचा तुमचा आशीर्वाद कधीच राहता कामा नये…. अशी प्रार्थना आम्ही करतोय.. सामान्य माणसांना तुमच्याकडे फार काही मागायचे नाही…. त्याच्या अपेक्षाही फार नाहीत. त्याचा भक्तीभाव तुम्ही समजून घ्या… तोच तुमचा खरा भक्त आहे. त्याच्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार? त्याचे वाईट दिवस कधी बदलणार? आणि हो बाप्पा… महाराष्ट्रातील मागचे आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार, असे सांगत होते. ते पडलं… आता नवीन सरकार आले… त्याचे भवितव्य किती आहे, ते कोणाला सांगता येत नाही…. तुम्हाला मािहती असेल… तुम्हाला मािहती असणारच…. कारण जे काही होत आहे, त्याला तुमचे आशीर्वाद असतील, असे सांिगतलं जात आहे. बाहेर अशी चर्चा आहे की, तुम्ाच्या माघी गणेशजन्म उत्सवापर्यंत पुन्हा एकदा पहाटे शपथविधी होण्याचे बोलले जात आहे. हे खरं आहे का बाप्पा….? पूर्वी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला की, पुन्हा पाच वर्षांनंतर शपथविधी व्हायचा…. आता सारखे शपथविधी…. त्या शपथेचे गांभीर्य राहिलेच नाही बाप्पा…
आणि हो….बाप्पा, आणखी एक विचारायचे राहिले…. ते आपले गुलामनबी आझाद काँग्रेस पक्ष सोडून गेले… तुम्हाला कळलंच असेल… ४० वर्षे काँग्रेसमध्ये ते सत्तेत होते तेव्हा त्यांना ‘पक्षात काही चुकत आहे’, असे वाटत नव्हते. सत्ता गेल्यानंतरच हे असं काहीतरी चुकत आहे, हे यांच्या हे नंतर का लक्षात येतं? ते विखे-पाटील विरोधी पक्षनेते असताना काँग्रेस चांगली होती…. पद गेल्यावरच पक्ष वाईट कसा काय होतो? आम्हा सामान्य माणसांना या प्रश्नांची उत्तरे िमळत नाहीत. तुम्हाला मिळाली तर तुम्ही आम्हाला ती सांगा…. आमचे पृथ्वीराज बाबासुद्धा साडेचार वर्षे मुख्यमंत्री असताना ‘पादुका’ ठेवून पक्ष चालत नव्हता… किंवा तसं ते म्हणत नव्हते… सत्ता गेल्यावर हे सगळे लोकं असे का म्हणतात… या प्रश्नाचे उत्तरच मिळत नाही बाप्पा…. तुम्हाला तरी सापडतील का याची उत्तरं…?
तुमच्या आगमनाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली…. कारण, डॉ. मृदुलाने दोन दिवस आधीच तुमच्ाी छान मूर्ती तयार केली…. त्यामुळे बोलायला वेळ िमळाला….
गणराज, तुमचे स्वागत करताना या सामान्य माणसांच्या उत्साहाला दाद द्या. ईडा-पीडा टळो अाणि महाराष्ट्रावर इथून पुढे कोणतेही संकट न येवो, अशी प्रार्थना करताना दहा दिवसांतील तुमचे घराघरातील वास्तव्य पुढचे वर्ष सुखा-समाधानाचे जाओ, एवढीच प्रार्थना आपण करू या….
गणपती बाप्पा मोरया….

  • मधुकर भावे

 172 Total Likes and Views

0 Comments

No Comment.