गेली दोन तपे म्हणजेच चोवीस वर्षे सोनिया गांधी आणि राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कब्जा करून बसले आहेत. एकीकडे देशपातळीवर भाजपचे आव्हान वाढते आहे. दुसरीकडे प्रादेशिक पक्ष २०२४च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा शोधू लागले आहेत आणि काँग्रेस मात्र नेतृत्वहिन व दिशाहिन दिसत आहे. स्वत: राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. गांधी परिवाराच्या बाहेरील नेता अध्यक्ष व्हावा, असे सुचवले जात असले तरी दहा जनपथ आपला पक्षावरचा रिमोट कंट्रोल सोडायला तयार नाही.
सोनिया गांधींनीच पुढील पाच वर्षे काँग्रेस अध्यक्षपदी राहावे आणि त्यांच्या मदतीला दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले जावेत, अशी टूम पुढे आली होती. एक कार्यकारी अध्यक्ष दक्षिणेतील राज्यांमधील व दुसरा कार्यकारी अध्यक्ष उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यातील असावा, अशी चर्चा सुरू झाली. कर्नाटकातील मल्लिकार्जुन खर्गे आणि केरळमधून रमेश चेन्नीथला अशी नावे चर्चेत येत होती. मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत व गांधी परिवाराशी निकटवर्तीय समजले जातात. चेन्नीथला हे
केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
उत्तर भारतातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नावे प्रथम कार्यकारी अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. गेहलोत व पायलट हे दोन्ही ताकदवान नेते आहेत व दोन्ही नेते गांधी परिवाराच्या जवळचे समजले जातात. गेहलोत हे केंद्रात अनेकदा मंत्री होते. तीन वेळा प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा मुख्यमंत्री, अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी काम केले आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नाही, असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर दिल्लीत राहून राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक जबाबदारी स्वीकारू, असे त्यांनी सूचित केले आहे. युवा चेहरा म्हणून सचिन पायलट यांचे नाव कार्यकारी अध्यक्ष म्हणून घेतले जात असले तरी राजस्थानच्या बाहेर जाऊन कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारण्यास आपल्याला रस नाही, असे त्यांनीच म्हटले आहे.
गेहलोत किंवा पायलट यांपैकी एकजण दिल्लीला गेले, तर राजस्थानातील काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद संपुष्टात येण्यास मदत होऊ शकेल, असे अनेकांना वाटते. राहुल गांधींनी मात्र त्यांच्या सहा महिने चालणाऱ्या भारत जोडो यात्रेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होईल. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू होईल व काश्मीरमध्ये त्याचा समारोप होईल. ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी करण्यावर राहुल गांधी स्वत: बारीक-सारीक गोष्टीत लक्ष देत आहेत.
उदयपूर येथे झालेल्या संकल्प शिबिरात काँग्रेसने येत्या २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण नवरात्रीमुळे ही यात्रा अगोदर सुरू करण्याचे ठरविण्यात आले. बारा राज्यांतून व दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणारी ‘भारत जोडो यात्रा’ ३५०० कि. मी. अंतर कापणार आहे. ऐंशी वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ‘भारत छोडो अभियान’ सुरू केले होते. त्यानंतर पाच वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच प्रेरणेतून काँग्रेसने भारत जोडो यात्रा आखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाला लाल किल्ल्यावरून बोलताना राजकारणातील भ्रष्टाचार व घराणेशाहीवर कठोर शब्दांत ताशेरे मारले होते. ईडीने नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सोनिया गांधी व राहुल गांधी यांची कित्येक तास चौकशी केली आहे. मोदींनी भ्रष्टाचाराबरोबरच भाई-भतिजा वाद आणि घराणेशाहीचा मुद्दाही प्रखरपणे मांडला होता. आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदामध्ये रस नाही, असे सांगताना गांधी परिवाराच्या बाहेरील व्यक्तीही काँग्रेस पक्ष चालवू शकते, असे राहुल गांधी सुचवत आहेत. पण गांधी परिवाराबाहेरील कोणीही पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास तयार होत नाही, हे वास्तव आहे.
काँग्रेस पक्षातच एका गटाचा राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्ष होण्यास विरोध आहे. राहुल यांनी अध्यक्ष होता कामा नये, यासाठी हा गट नेहमीच सक्रिय असतो. राहुलकडून पक्षाला भविष्य नाही, राहुल पक्षाचा विस्तार करू शकत नाहीत, राहुल पक्षाची आहे ती शक्ती टिकवू शकत नाहीत, असे या गटाचे सांगणे असते. सन २०१९ मध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठा फटका बसला. पन्नास खासदार निवडून आणताना काँग्रेसची दमछाक झाली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही तेथे खूप कमी जागा आल्या.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दहा जनपथच्या मर्जीतील आहेत. पण त्यांचा मुलगा वैभव याचा जोधपूरमध्ये पराभव झाला. जो आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, त्यांना पक्षाचे अध्यक्षपद देण्याची चर्चा होते, हेच काँग्रेसचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
गेली चोवीस वर्षे आई आणि तिचा पुत्र काँग्रेस अध्यक्षपदाची खुर्ची बळकावून बसले आहेत. देशाच्या राजकीय क्षितीजावर मोदींचा उदय झाल्यापासून काँग्रेसची सर्वत्र धूळधाण उडाली. पण दोघे मायलेक पक्षातील दुसऱ्या ताकदवान नेत्याकडे सूत्रे सोपवत नाहीत आणि अन्य कोणाला पक्ष चालविण्यासाठी ताकदही देत नाहीत. सन १९९८ ते २०१७ पर्यंत सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या. २०१७ मध्ये आईने मुलाच्या हाती पक्षाची सूत्रे दिली. तेव्हा राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली होती. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सलग दुसऱ्यांदा मोठा पराभव झाला, तेव्हा राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. माय-लेकाच्या चोवीस वर्षांच्या काळात भाजपचे नऊ राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यात कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्णमूर्ती, वैंकय्या नायडू, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे वेगवेगळ्या प्रदेशांतील आहेत, घराणेशाहीतून कोणीही पुढे आलेले नाही. म्हणूनच काँग्रेस अध्यक्षपदावर चिकटून राहणाऱ्या गांधी परिवारावर भाजप घराणेशाहीचा आरोप करीत आहे.
नॅशनल हेराॅल्ड घोटाळा प्रकरणी सोनिया गांधींची ईडीने चौकशी केली आहे. स्वतंत्र्यानंतर गांधी परिवाराची प्रथमच चौकशी होत आहे. गांधी परिवाराच्या विरोधात कारवाई होत असताना हा परिवार पक्षाच्या अध्यक्षपदावर नसेल, तर त्याला महत्त्व किती मिळेल, कितीजणांची सहानुभूती मिळेल आणि केवढी मोठी प्रसिद्धी मिळू शकेल? सन २०२३ पर्यंत देशात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगडसह ११ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत व २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक आहे. म्हणूनच देशाचा सर्वात वयोवृद्ध राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असेल, याला महत्त्व आहे. दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसला त्यापासून काही धडा घ्यावा, असे वाटत नाही.…sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
209 Total Likes and Views