बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधलेले नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स अवघ्या ८ सेकंदात जमीनदोस्त करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता अगदी पत्त्याच्या बंगल्यासारख्या ह्या इमारती कोसळल्या. आपल्याकडे प्रथमच अशा प्रकारे पाडकाम होत असल्याने देशभर हे तोवर कसे पडते याची उत्सुकता आणि तेवढेच भाय होते. पण सारे सुखरूप झाले. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे टॉवर्स पाडण्यात आले आहेत. ‘एपेक्स’ ही इमारत ३२ मजली तर ‘सेयान’ २९ मजल्यांची इमारत होती. कुतुबमीनारपेक्षा उंच या इमारती प्रचंड बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर लगतच्या परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आले . पडायला २० कोटी रुपये खर्च आला. इमारतींचा ८० हजार टन मलबा पडला आहे. या टॉवर्सचं पाडकाम हाती घेण्याआधी लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
दोन्ही टॉवरमध्ये एकूण ९५० फ्लॅट्स होते. सुपरटेकनं २०० ते ३०० कोटी रुपये खर्चून ट्विन टॉवरची उभारणी केली होती. ज्या ठिकाणी ट्विन टॉवरचं बांधकाम झालं, त्या भागात मालमत्तेचा दर सध्या १० हजार रुपये प्रति वर्ग फूट इतका आहे. हा आकडा विचारात घेतल्यास ट्विन टॉवर्सचं मूल्य १००० कोटी रुपयांच्या पुढे जातं. मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानं दोन्ही टॉवरच्या मूल्यावर परिणाम झाला आणि ते ७०० ते ८०० कोटींपर्यंत आलं. ट्विन टॉवरमध्ये ७११ ग्राहकांनी फ्लॅट बुक केले होते. यापैकी ६५२ ग्राहकांसोबत सुपरटेकनं सेटलमेंट केली. बुकिंगवेळी दिलेली रक्कम आणि व्याज असा पर्याय देण्यात आला होता. बाजारमूल्य किंवा बुकिंगवेळचा दर अधिक व्याज मिळून त्या इतक्यात दराचा दुसरा फ्लॅट असाही पर्याय दिला गेला.
नोएडातील हे ट्विन टॉवर्स अनधिकृतरित्या इमारतींचे नियम धाब्यावर बसवून बांधण्यात आले होते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दिले होते. आर. के. अरोडा हे ह्या कंपनीचे मालक आहेत. ‘सुपरटेक’ कंपनीला न्यू ओखला औद्योगिक प्राधिकरणाने ९ मजल्यांचे १४ टॉवर्स बांधण्याची परवानगी २००५ मध्ये दिली होती. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बागेचा देखील समावेश होता. त्यानंतर हळूहळू मजले वाढवून घेतले गेले. २००९ मध्ये या प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन भव्य टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठीच्या नवीन आराखड्याला नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली होती. अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने २०१२ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बांधकाम अनधिकृत ठरवून २०१४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.
161 Total Likes and Views