कुंगफू पांड्याने पाकला लोळविले

Sports
Spread the love

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने पाकचा फडशा पाडत आशिया चषकात दमदार सुरुवात केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत पाकचे कडवे आव्हान संपुष्टात आणत टीम इंडियाने गत पराभवाचा वचपा काढला आहे. प्रथम गोलंदाजीत अनुभवी भुवी सोबत पांड्याने पाक फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या तर उत्तरार्धात जडेजा पांड्या म्हणजेच संताजी धनाजीच्या जोडीने बाबरसेनेचा खात्मा करत रणांगणात तिरंगा फडकवला.

खरेतर पाक संघातील बाबर, रिझवान आणि फकर झमन हे फलंदाजीतील त्रिकुट भारतीय संघासाठी फार मोठी डोकेदुखी होती. त्यातच भुवी वगळता पांड्या, आवेश खान, अर्शदिपसिंग आणि चहल कितपत चालतील हे सांगणे कठीण होते. त्यामाने पाकची वेगवान गोलंदाजी आपल्या पेक्षा नक्कीच सरस होती. फलंदाजीत आपल्याकडे रोहीत विराट आणि राहुल कधीही पेंशनवर बसू शकतात अशी स्थिती होती. त्यामानाने सुर्यकुमार, पांड्या, कार्तिक आणि जडेजा यांच्याकडून आशादायी चित्र उभे होते. त्यातच मागच्या लढतीत बाबर रिझवान ने दो ही मारा सॉलिड मारा केल्याने त्यांचे मनोबल उंचावले होते. अशा पार्श्वभूमीवर टीम इंडिया यावेळी कितपत टिकाव धरेल याबाबत क्रिकेट रसिक साशंक होते.

मात्र नवा गडी नवा राज भारतीय संघाच्या पथ्यावर पडले. पाकचे पंचप्राण बाबर आझम नावाच्या पोपटात दडले आहे हे आपल्या संघाला ठावूक होते. बाबर रिझवानची ढवळ्या पवळ्याची जोडी टी ट्वेंटीचा शंकरपट जिंकण्यात तरबेज आहे. मात्र या दोघांना वेसण घातले तर पाक संघाचा पोळा फुटायला वेळ लागत नाही हे ही तितकेच खरे आहे.ओल्ड इज गोल्ड भुवीने आखुड टप्प्यात गोलंदाजी करताच बाबरे आझमचे साम्राज्य उध्वस्त झाले. भुवीच्या पावलावर पाऊल ठेवून मग पांड्या, आवेश खानने आखुड टप्प्याने पुढचे तिन बळी टिपत पाकला गुडघे टेकण्यास विवश केले.

पाक फलंदाजीचे शीर उडवताच भारतीय गोलंदाजांनी मैदानाचा ताबा घेत एकच धुमाकूळ घातला. भुवी,पांड्या, अर्शदिपसिंगने इडी पेक्षा जास्त वेगाने विरोधी फलंदाजांवर धाडी घालत पाकला घामाघूम केले. विशेषतः अर्शदिपसिंगने शेवटचा फलंदाज शाहनवाज दहानीचा त्रिफळा उडवताच पाकच्या संघाची अवस्था अर्शसे फर्श तक अशी झाली. दिडशेच्या आता पाकचा बोऱ्याबिस्तर गुंडाळल्याने टीम इंडिया निश्चिंत होती. तरीपण दिडशे खोके एकदम ओक्के अशी परिस्थिती अजिबात नव्हती. कारण पाक गोलंदाजी म्हणजे आयपीएलचा मारा नव्हता आणि सलामीला राहुल म्हणाले आनंदी आनंद होता.

तसेही आजकाल राहुल नावाभोवती साडेसाती चालू आहे आणि त्याला केएल राहुल कसा अपवाद असणार? सोबतच कोहलीचा फॉर्म विराट नसल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. त्यातच पाकने कोहलीला जीवदान देऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. मात्र संघाने पन्नाशी गाठताच रोहीत आणि कोहली तंबूवासी झाले. संघाची वाटचाल सुर्यकुमार आणि जडेजाने सांभाळली. मात्र सुर्यकुमार दुबईत तळपलाच नाही ‌ त्यामानाने जडेजाने जळूसारखे एका टोकाला चिकटून राहत पाकचे धावाशोषण केले.

दरम्यान एकतर्फी वाटणारी लढत आता रंगतदार अवस्थेत येऊन ठेपली होती. जडेजाला साथ देण्यास पांड्या मैदानावर उतरला आणि हीच ती वेळ होती पांड्याचे प्रसिद्ध वक्तव्य करून आलो हे सिद्ध करून दाखविण्याची. नेमके याच अटीतटीच्या वेळी पाक संघ गळपटला आणि टीम इंडियाचे काम सोपे झाले. विशेषतः निर्धारित वेळेत षटके पुर्ण न झाल्याने क्षेत्ररक्षणाला भगदाड पडले. याचा पुरेपूर फायदा घेत जडेजा पांड्याने पाक गोलंदाजी चोपून काढली. महत्वाचे म्हणजे १९ व्या षटकांत पांड्याचे सणसणीत तिन चौकार पाकच्या शवपेटी वरील शेवटचा खिळा ठरला. उरलीसुरली कसर त्याने जिंकायला सहा धावा असतांना षटकार ठोकून पुर्ण केली.

संपूर्ण सामन्यात पांड्याचे वर्चस्व दिसून आले. मग ते गोलंदाजीत एअर स्ट्राईक करणे असो की फलंदाजीत सर्जिकल स्ट्राईक करणे असो. खरेतर पाकची या सामन्यात भट्टी जमलीच नाही. फलंदाजांच्या फ्लॉप शो ला गोलंदाजांनी चांगलाच हातभार लावला. त्यांनी तब्बल नऊ वाईड आणि पाच लेगबाय देत भारतीय फलंदाजांवरचे दडपण कमी केले. सोबतच त्यांच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने, बाबर आझमच्या साधारण नेतृत्व गुणाने त्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. या धक्कादायक पराभवाने पाक संघाचा आत्मविश्वास नक्कीच कमी झाला असेल.

याउलट टीम इंडिया या दिग्वीजयाने न्हाऊन निघाली आहे. प्रथम गोलंदाजी पत्करून पाकला दबावाखाली ठेवणे, विराट, जडेजा, पांड्याची उपयुक्त फलंदाजी ही भारतीय संघाची जमेची बाजू ठरली. आरंभ है प्रचंड है या थाटात टीम इंडियाने मिशन आशिया चषकाचा श्रीगणेशा केला आहे. तरीपण गत सामन्यातील पराभवाचे शल्य हे भारतीय संघाच्या विजयाचा पासवर्ड होता तर कुंगफू पांड्या हा ओटीपी होता. विशेषतः पांड्या हाच दोन्ही संघातील प्रमुख फरक होता, तोच टीम इंडियाचा एक्स फॅक्टर होता. अष्टपैलू खेळ करत पांड्या ने पाकचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेही पांड्यासाठी हा सामना बोटं लावीन तिथं गुदगुल्या सारखा होता. चेंडू असो बॅट दोन्ही खेळण्याने त्याने पाकचा गेम केला. अगदी दादा कोंडकेंच्या भाषेत सांगायचं झालं तर या पांडू हवालदाराने पाकची अवस्था वाजवू का अशी केली. त्याने जडेजा सोबत तुमचं आमचं जमलं करत पाकला आली अंगावर घेतली शिंगावर केले. येऊ का घरात म्हणत पाकच्या गोटात पळवा पळवी केली. शेवटच्या षटकांत कार्तिकला आगे की सोच म्हणत गनिमी कावा शिकवला. अखेर पाकरूपी ढगाला कळ लावत त्याने मैदानावर धावांचा प्रलय आणला. पाकमध्ये जेवढे नुकसान सध्याच्या पुराने झाले नसेल तेवढे नुकसान पांड्याच्या शेवटच्या षटकाराने केले असेल. दुबई ते इस्लामाबाद पर्यंत त्या षटकाराचे ओरखडे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल.
तमाम क्रिकेट रसिकांतर्फे भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

 196 Total Likes and Views

0 Comments

No Comment.