देश सुन्न रस्ते अपघातात दर तासाला १८ लोक मरतात
मोठ्या उद्योगपतीपैकी एक आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याच्या बातमीने देश हादरला आहे. अहमदाबादकडून मुंबईला मर्सिडीज कारने येताना भर दुपारी पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी जागीच जीव गमावला. सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. कारमध्ये दोघे होते. दोघे गेले आणि दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे. महाराष्ट्र सरकारने ह्या अपघाताची चौकशी करायला सांगितले आहे. चौकशी होईलही. पण गेलेला जीव परत थोडीच येणार? सायरस अवघे ५४ वर्षांचे होते, धडाडीचे होते. अशी माणसे गमावणे देशाला परवडणारे नाही. गेल्या महिन्यात माजी आमदार विनायक मेटे यांचा अशाच अपघातात मृत्यू झाला. त्या बातमीची शाई वाळत नाही तोच हा अपघात. आपल्याकडे रस्ते अपघात ही नवलाई राहिलेली नाही. रस्ते जणू मृत्यूचे सापळे झाले आहेत. रस्ते रुंद झाल्याने गाड्या भरधाव धावताहेत. प्रत्येकाला घाई आहे. प्रत्येकाला वेग पाहिजे. त्यातून अनेकदा ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटून अपघात होत आहेत. हे कोण थांबवणार?
मर्सिडीजसारखी महागडी, अत्याधुनिक कारही आतल्या माणसाला वाचवू शकली नाही. तुम्हाला धक्का बसेल. गेल्या वर्षी आपल्या देशात रस्ते अपघातात दीड लाख लोक मेले. हा सरकारी आकडा आहे. ह्या वर्षी तर अपघात वाढले आहेत. हे प्रमाण पाहिले तर दर तासाला १८ लोक मरतात आपल्याकडे. पण हा विषय गाडीत बसणारे, चालवणारे आणि सरकारही गंभीरपणे घेत नाही. उद्योग जगतातला पारसी समाजाचा एक हिरा आज आपण गमावला. भविष्यात अशाच आणखी बातम्या येत राहतील. आपण केव्हा जागे होणार आहोत? कारण कार आता लक्झरी राहिलेली नाही. आता साध्या साध्या कुटुंबाकडेही कार आल्या आहेत, कॉलेजचे पोरंही कारमधून फिरताहेत आणि त्यांच्या अपघाताच्या बातम्या देश रोज वाचतो आहे. म्हणून चिंता.
टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी ही नावं आपल्या कानावर आली असतील. पण कोण होते हे सायरस? प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणे पसंत करणारे सायरस मिस्त्री हे भारतीय उद्योग जगतातील एक मोठे नाव. उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे ते धाकटे पुत्र होते. लंडनमधील इम्पिरियल महाविद्यालयातून त्यांनी सिव्हील इंजीनिअरिंग केले. वयाच्या २३ व्या वर्षी १९९१ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पालनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कंपनीने भारतात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठे बंदर बांधणे यासह अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. एका मोठ्या उद्योगपतीला देश मुकला आहे.
334 Total Likes and Views