मेगास्टार अमिताभ बच्चन नुकताच करोनातून बाहेर आला. त्याला हा दुसऱ्यांदा करोना झाला होता. टेस्ट निगेटिव्ह येताच तो ‘कौन बनेगा करोडपती’च्या शुटींगच्या कामावर आला. अमिताभचे वय ७९ वर्षे आहे. ह्या वयात माणूस खाट धरतो. पण अमिताभला फुरसत नाही. कामच काम. वेळ मिळाला तर आराम. तब्येत ठणठणीत आहे अशातलाही भाग नाही. पण त्याचे शुटींग सुरु असते. काम त्याला सोडत नाही की तो कामाला सोडत नाही हा प्रश्नच आहे.
त्याला खूप सारे आजार आहेत. पाठीचे मोठे दुखणे आहे. त्याच्या छोट्या-मोठ्या आतड्यांना मागे सूज आली होती. त्यावर सर्जरी झाली आहे. १९८२ साली ‘कुली’ सिनेमाच्या शुटींगच्या वेळी तो गंभीर जखमी झाला होता. मारधाडीच्या एका प्रसंगात खलनायकाने मारलेला ठोसा पोटात लागला. सर्जरी झाली. पण हे दुखणे आजही त्याला त्रास देते. त्याला लिव्हर प्रॉब्लेम आहे. ‘माझे फक्त २५ टक्के लिव्हर काम करते’ असे त्यानेच मागे सांगितले होते. सात वर्षापूर्वी त्याला ६० बाटल्या रक्त द्यायचे होते. ज्यांनी रक्त दिले त्यातला एक जण हेपायटीस बीचा पेशंट होता. त्याचे रक्त दिले गेल्याने अमिताभचे लिव्हर खराब झाले. अवघ्या २५ टक्के लिव्हरवर तो जिवंत आहे. ह्या साऱ्या त्रासामुळे त्याला लवकर थकवा येतो. पण थांबेल तर तो अमिताभ कसला? शो मस्ट गो ऑन.
त्याला पैशाची कमी नाही. ३ हजार कोटी रुपयाचा तो मालक आहे. तारुण्यात तर त्याचा भाव तगडा होताच. पण आताही त्याचा तोच जलवा आहे. जाहिरातींमध्ये तो काम करतो. त्याच्या नावावर माल खपतो. म्हणून कंपन्याही त्याला घेऊन आपल्या मालाची पब्लिसिटी करतात. तुम्ही पाहत असाल. टीव्हीवरच्या सर्वाधिक जाहिरातीत अमिताभ दिसतो. एकेका जाहिरातीसाठी तो ५ ते ६ कोटी रुपये घेतो. आजही त्याच्याकडे तीन मोठे सिनेमे आहेत. त्याची भूमिका असलेला ‘ब्रम्हास्त्र’ लवकरच लागतो आहे. त्यासाठी त्याने फक्त १० कोटी रुपये घेतले होते. आहे ना धमाल. अमिताभच्या एक सिनेमात एक डायलॉग आहे ‘हम जहा खडे होते है, लाईन वही से सुरु होती है.’ अमिताभची लाईन आजही सुरु आहे. सेंच्युरीसाठी त्याला शुभेच्छा.
901 Total Likes and Views