पुन्हा परतून येतेय ’गांधीयुग’! ’नफरत छोडो, भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने..

Editorial
Spread the love

दुर्दैवी बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षेतून मुक्त करण्याचा पराक्रम गुजरात मधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केला. एवढंच नव्हे तर बलात्काऱ्यांच्या गळ्यात फुलांचे हार घालून, पेढे वाटून त्यांचे स्वागत करण्यात आले. जल्लोष करण्यात आला. ही कोणती हलकट मानसिकता आहे? ही कोणती संस्कृती आहे? आरएसएस या बाबतीत चूप का आहे? विशेष म्हणजे भाजपा मधिल निर्मला सीतारामन, स्मृती इराणी सारख्या डझनभर महिला मंत्री या क्षणी काय करत आहेत? त्यांची भूमिका नेमकी काय आहे? त्याही पेढे वाटून जल्लोष साजरा करत आहेत, की गोव्यामध्ये ईराणी बाईंच्या खानदानी बार मध्ये ’बीफ’ वगैरेंची पार्टी सुरू आहे?

राजकीय, वैचारिक मतभेद आपण समजू शकतो. पण एखाद्या महिलेवर सामुहिक बलात्कार करणाऱ्यांचे स्वागत करणे, ही कल्पनाही करवत नाही. हा देश कुठल्या वळणावर आणून ठेवला या सैतानांनी? यांच्या घरी मुलीबाळी नाहीत का ? यांच्या बायका, यांच्या सुना याबाबतीत काय विचार करत असतील? की त्यांनाही ’इतर धर्मीय महीलांच्यावर सामुहिक बलात्कार करा’ असं निर्लज्जपणे सांगणारी सावरकरी संस्कृती मान्य आहे?

हे आता फार झालंय! अती झालंय! निदान भाजप नेत्यांच्या घरातील महिलांनी तरी यावर विचार करायला हवा! भाजपा महिला आघाडीने विचार करायला हवा! बिल्कीस बानोच्या जागी स्वतःला ठेवून विचार करायला हवा! ती हनुमान चालीसा घेऊन उड्या मारणारी साध्वी(?) आता कुठं गेलीय? अशावेळी जर खरंच हनुमानजी अवतरले तर यांना कशा कशाने धुनकलं असतं? सारंच संतापजनक आहे. अलिकडच्या काळात काय लायकीची माणसं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधान मंत्री म्हणून धुमाकूळ घालत आहेत, हे बघून लाज वाटते! एखाद्या जातीबद्दल, धर्माबद्दल, चक्क महापुरूषाबद्दल एवढा द्वेष? आम्ही माणूस आहोत की शेणकिडे? आणि असल्या विचारावर चालणाऱ्या संघटनांच्या हातात देशाची सत्ता जावी? आम्ही खरंच एवढे मुर्दाड आहोत का? एवढे नीच आहोत का?

हा देश बुद्धाचा आहे, गांधींचा आहे, हे आम्ही विसरलो आहोत. जाती, धर्माची गुंगी आमच्यावर एवढी चढली आहे, की आमच्या जातीची डुकरंही आम्हाला ऐरावत वाटायला लागतात. आमच्या जातीतील सत्तेचे दलाल हिरो वाटायला लागतात! गांधींना प्रात:स्मरणीय म्हणत म्हणत ’गोडसे झिंदाबाद’ करणारे जसे आहेत, तसेच बुद्धाचं नाव घेत घेत इतरांच्या नावाने द्वेषाच्या ओकाऱ्या करणारेही कमी नाहीत. 

कुणाला आवडो, न आवडो, कोणी मान्य करो वा न करो, पण गांधींच्या नेतृत्वात या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, हे वास्तव आहे! देश स्वतंत्र झाला म्हणून या देशात लोकशाही आली. स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच देशाचे स्वतंत्र संविधान आले. बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्वतःचा जीव ओतला. वंचितांना, उपेक्षितांना विशेष अधिकार मिळालेत. याचं भान आम्ही ठेवायला हवं. तुम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी नव्हता..? ओके! तुमचे नेते सहभागी नव्हते..? ओके? पण हजारो, लाखो, करोडो लोक स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होते, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. अनेकांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्या खाल्ल्या, स्वतःची डोकी फोडून घेतली, रक्त सांडलं, जेलमध्ये गेलेत, स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, अनेकांची बायका पोरं उघड्यावर पडली. अनेकांचे संसार स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात भस्म झालेत, तेव्हा कुठं हे स्वातंत्र्य मिळालं! स्वातंत्र्य घरात बसून मिळालं नाही. त्यात सर्वच जाती धर्माचे लोक सामील होते. पुरुष होते, महिला होत्या. तरुण होते, म्हातारे होते. गरीब होते, श्रीमंत होते. अशिक्षित होते, तसेच अनेक बॅरिस्टर होते, डॉक्टर होते, प्राध्यापक होते.. साऱ्याच क्षेत्रातील लोक होते. त्या सर्वांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं.. आणि त्या लढाईचे सर्वोच्च नेते होते बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी! जात, पात, धर्म विसरून सारा देश या फाटक्या माणसाच्या नेतृत्वात एक झाला होता! काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कलकत्ता पासून मुंबई पर्यंत सारा देश या माणसाला आपला नेता मानत होता!

विरोधकांचा मोठेपणा मान्य करायला जेवढं मोठं मन असावं लागते, तेवढीच स्वतःची उंचीही मोठी असावी लागते! खुजी माणसं आयुष्यभर स्वतःच्या सावलीलाच घाबरत असतात. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची यादी घेऊन नेहरू जेव्हा गांधीजीकडे गेले, तेव्हा ’हे सरकार काँग्रेसचं आहे, की देशाचं?’ असा थेट प्रश्न विचारून विरोधी पक्षात असणाऱ्या बाबासाहेबांना मंत्रिमंडळात घ्यायला सांगणारे गांधीच होते! नेहरू मंत्रिमंडळात राहूनही त्यांच्याच विरोधात बोलणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना सहन करण्याचा मनाचा मोठेपणा हाही गांधीमुळेच नेहरूंमधे आला होता! गांधींच्या किचनमध्ये प्रत्यक्षात भंगीकाम करणारी व्यक्ती स्वयंपाकी म्हणून काम करायची, हे किती लोकांना माहीत आहे? दुसऱ्या कोणत्या नेत्याने ही हिम्मत दाखवली? गांधी स्वतः संडास साफ करायचे! कुष्ठ रोग्यांच्या जखमा धुवायचे, हे भारताच्या इतिहासात आणखी कोणत्या नेत्यांनी केलं आहे? अनेक उच्चविद्याविभूषित, श्रीमंत तसेच उच्चवर्णीय लोक देखील गांधींच्या प्रभावामुळे सार्वजनिक संडास साफ करायचे! हे दुसऱ्या कोणत्या नेत्याने किंवा त्यांच्या अनुयायांनी केलं आहे? एका अस्पृश्य कुटुंबाला आश्रमात ठेऊन घेण्याच्या वादावरून बाकी सहकारी तर सोडाच पण खुद्द कस्तुरबा गांधी आश्रम सोडून जायची वेळ आली होती, तरीही गांधी झुकले नाहीत! आणि तरीही गांधी दलित विरोधी? तरीही गांधी वर्णवादी?

वैचारिक मतभेद असू शकतात, पण गांधींचा मोठेपणा समजून घेण्यासाठी जात, पात, धर्म, पंथ, पक्ष अशा डबक्यातून आधी बाहेर यावं लागते! निदान चळवळीशी नातं सांगणाऱ्या लोकांनी तरी आपल्या मनातला गांधीद्वेष दूर केला पाहिजे! गांधी हे रसायनच वेगळं आहे! गांधी म्हणजे कोरडी फिलॉसॉफी नव्हे, गांधी म्हणजे प्रत्यक्ष जगणं आहे! गांधी म्हणजे चमत्कार आहे! गांधी म्हणजे मातीतून उगवलेला नैसर्गिक बुध्द आहे!

..तर असा हा गांधी.. देश वाचवण्यासाठी पुन्हा आपल्या मदतीला येतोय! द्वेषाचा वणवा विझवण्यासाठी पाऊस होऊन येतोय. लोकशाही, संविधान, न्यायव्यवस्था सारे सारे मृतप्राय झाले असतांना, त्यात नव्याने प्राण फुंकण्यासाठी गांधी आपल्या हातातील शस्त्र होतोय.

राहूल गांधींच्या नेतृत्वात काँगेस एक देशव्यापी पदयात्रा काढते आहे. लोकशाहीवर ज्यांची ज्यांची निष्ठा असेल, त्या सर्व पक्ष, संघटनांनी आपले छोटे मोठे मतभेद बाजूला ठेऊन या ’भारत जोडो’ यात्रेला सहकार्य केले पाहिजे. ताकद दिली पाहिजे. कारण आपला देश वाचविणे आवश्यक आहे. या क्षणी तोच आपला अग्रक्रम असला पाहिजे!

’गांधी पिस फाउंडेशन’मधे २२ सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी अलीकडेच दिल्लीमध्ये एकत्र आले होते. न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील, प्रा. योगेंद्र यादव, मेधा पाटकर, डॉ. सुनीलम, प्रा. अजित झा यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मीटिंगमधे २ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यात सुमारे ७५ किलोमिटरची जिल्हा स्तरीय पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या पदयात्रांच्या निमित्ताने सारा देश जागा होतो आहे. सारा समाज ढवळून निघणार आहे. यात्रेत फक्त तिरंगा झेंडा असणार आहे! ’नफरत छोडो, भारत जोडो’ या नावाने हे अभियान चालविण्यात येणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या ’भारत जोडो’ पदयात्रेचे आपापल्या भागात जोरदार स्वागत करावे, सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन ’पीस फाऊंडेशन/सिव्हील सोसायटी’ तर्फे करण्यात आले आहे. ’लोकजागर अभियान’ तर्फे आम्हीही त्यात सहभागी आहोत. आपणही सहभागी व्हावे, अशी विनंती आहे.

या पदयात्रेमधून देशाला नवी ऊर्जा मिळणार आहे, नवी दिशा मिळणार आहे! नवा आत्मविश्वास मिळणार आहे! मनामनात उभ्या केल्या गेलेल्या परकेपणाच्या भिंती उध्वस्त होणार आहेत! पुन्हा नव्याने गांधीयुग परतून येण्याच्या ह्या पाऊलखुणा आहेत! देशात सध्या सुरू असलेले अराजक थांबविणे गरजेचे आहे. सरकार प्रायोजित आतंकवाद थांबवायचा असेल, तर गांधी हाच एकमेव मार्ग आहे! बुद्धाशिवाय जगाला आणि गांधीशिवाय देशाला पर्याय नाही, हे जेवढ्या लौकर आपल्या लक्षात येईल, तेवढेच आपले आणि जगाचेही भले होईल!

तूर्तास एवढंच!

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर 9822278988

 191 Total Likes and Views

0 Comments

No Comment.