ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजमुकुटातला कोहिनूर हिरा भारतात परत आणावा, अशी जोरदार मागणी लोकांकडून सुरु झाली आहे. जगाला भुरळ पडणारा हा हिरा सर्वप्रथम १९३७ मध्ये तेव्हाच्या महाराणीच्या राजमुकुटात झळकला. दोन हजार ८०० हिऱ्यांनी जडलेल्या या मुकुटाची फ्रेम प्लॅटिनम धातूची असून मुकुटाच्या समोरचा बाजूला कोहिनूर हिरा लावण्यात आला आहे. हा हिरा मुळात भारताचा आहे, भारतात सापडला आहे. भारत गुलामीत असताना इंग्रजांनी तो मिळवला. तो परत करावा अशी मागणी वेळोवेळी भारताकडून झाली. पण ब्रिटनने दाद दिली नाही. भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. इथल्या अनेक मौल्यवान वस्तू पळवल्या. टिपू सुलतानची अंगठीही तिकडे आहे असे म्हटले जाते. कोहिनूर हिरा आम्हाला भेट मिळाला असे ब्रिटन सरकार सांगते. पण कोणी गुलाम स्वखुशीने एवढा मौल्यवान हिरा देऊ शकतो का?
कोहिनूर हिरा शीख महाराजा रणजीत सिंग यांचे वारस दुलीप सिंग यांनी औपचारिकपणे राणी व्हिक्टोरियाला सुपूर्द केला होता. त्यावेळी दुलीप सिंग यांच्याकडे हिरा देण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. गुलामांना नाही म्हणण्याचा अधिकार नसतो.
कसा आहे हा हिरा? कोहिनूर हिरा १०५.६ कॅरेटचा रंगहीन हिरा आहे. हा हिरा १३व्या शतकात आंध्र प्रदेशातील गुंटूरजवळ काकतीय राजवंशाच्या कालखंडात सापडला होता. ‘जिस की लाठी, उस की भैस’ ह्या न्यायाने तो अनेक राजांच्या हातात खेळला. सुरुवातीला हा हिरा दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीकडे होता. नंतर तो मुघल साम्राज्याकडे गेला. पुढे नादिर शाहने तो लुटून अफगाणिस्तानात नेला. १८०९ साली पंजाबचे शीख महाराजे रणजीत सिंग यांच्याकडे हा हिरा आला होता.
जनमानस काहीही असले तरी भारत सरकारने हा हिरा परत आणण्यासाठी कधीही गंभीर प्रयत्न केले नाहीत असेच दिसते. ‘कोहिनूर हिरा चोरून किंवा जबरदस्तीने घेतला नव्हता, त्यामुळे भारताने त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नये’ असेच सांगितले गेले. ब्रिटीश सरकारनेही कोहिनूर परत करण्याबाबतची शक्यता नाकारली आहे. पण सध्या नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. मोदी सरकारने कोहिनूर परत मागून आपण महाशक्ती होत असल्याचा परिचय द्यावा असे आता भारतीयांचे म्हणणे आहे. मोदी बोलतील का ‘मन की बात.’?
100 Total Likes and Views