काँग्रेसची संघ द्वेष यात्रा……

Analysis
Spread the love

अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा मार्ग बारा राज्यांतून काश्मीरपर्यंत जाणार असून ३५०० किमी अंतर पार करणार आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक हेच ध्येय त्यांच्यापुढे आहे. भाजपवर टीका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी द्वेष एवढाच अजेंडा राहुल यांचा दिसतो आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजपचे संख्याबळ आणि मतांची टक्केवारी वाढत आहे. आपले काय चुकते, काँग्रेस पक्ष कुठे कमी पडतो, याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी ते भाजप व संघ परिवारावर हल्लाबोल करीत आहेत. लोकांचा आवाज दाबला जात आहे. देशातील प्रत्येक संस्थांवर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. काही मूठभर उद्योगपती देशावर नियंत्रण करीत आहेत, असे तेच तेच आरोप राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने रोज करीत आहेत. राहुल यांचे हे आरोप सामान्यांना पटत नाहीत.


भारत जोडो यात्रा केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यांतून काश्मीरपर्यंत जाणार आहे. ३५७० किमी यात्रेच्या मार्गावर ३७२ लोकसभा मतदारसंघांमधून राहुल गांधींचा प्रवास होणार आहे. बारा राज्यांतील सर्व मतदारसंघांतून राहुल यांची यात्रा जाणार नाही. नांदेडला यात्रा आली म्हणजे सर्व महाराष्ट्रात काँग्रेसला लाभ होईल असे मुळीच नाही. भारत जोडो यात्रा काँग्रेसला जनाधार वाढविण्यासाठी आहे की, जनतेची मने भडकविण्यासाठी आहे? भाजपने तर राहुल यांची ही यात्रा आहे की भारत तोडोसाठी आहे का? असा स्पष्ट सवालच विचारला आहे. भारत जोडो यात्रा दुसऱ्या दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश असलेल्या जळत्या खाकी हाफ पॅण्टचे छायाचित्र काँग्रेसने ट्वीट करून भाजप व संघाला डिवचण्याचे काम केले. संघाची हाफ पॅण्ट जळत असताना त्याखाली आणखी १४५ दिवस शिल्लक, असे लिहिले आहे. देशाला द्वेषाच्या बेड्यातून मुक्त करणे व भाजप-संघाकडून झालेल्या हानीची भरपाई करणे हे आमचे लक्ष्य असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. असे वादग्रस्त ट्वीट करून काँग्रेसने आ बैल मुझे मार अशी स्वत:ची अवस्था करून घेतली. संपूर्ण भारतात केरोसिन शिंपडले गेले आहे आणि केवळ एका आगपेटीच्या काडीने भारतात आग लागेल, असे वक्तव्य राहुल यांनी गेल्या वर्षी केंब्रिज विद्यापीठात केले होते. राजस्थानच्या चिंतन शिबिरातही देशाल आग लागेल असे ते म्हणाले होते.


भारत जोडो यात्रेतून राहुल यांना काय साधायचे आहे? ज्या केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या सतत हत्या होत आहेत तेथे राहुल यांची यात्रा अठरा दिवस आहे आणि जिथे योगी आदित्य नाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे त्या सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशात यांची राहुल यात्रा केवळ दोन दिवसांत आटोपली जाणार आहे. मुंबईवर २६-११ला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने हे तर संघाचे कारस्थान असे उद्गार काढले होते. तोच नेता आज राहुल यांच्या चौकडीतला म्हणून ओळखला जातो. संघाला टार्गेट करून काँग्रेसची मते वाढणार आहेत का? जनसमर्थन प्राप्त करण्यासाठी भारतीय राजकारणात राहुल गांधींची निघालेली भारत जोडो यात्रा ही काही पहिलीच यात्रा नव्हे. १९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी मार्च काढून सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते.  १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी रामरथ यात्रा काढून भाजपला संजिवनी दिली आणि पक्षाला केंद्रात सत्तेच्या दिशेने नेले. १९८४ मध्ये भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यांची संख्या अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर ८५ वर गेली व नंतर १२० वर पोहोचली. आता तर मोदींच्या कारकिर्दीत भाजपचे तीनशेपेक्षा जास्त खासदार लोकसभेत आहेत.


महात्मा गांधी यांनी काढलेला दांडी मार्च १२ मार्च १९३० रोजी सुरू झाला. साबरमती आश्रम, अहमदाबाद ते दांडी असा ३८५ किमी अंतराची ती यात्रा होती. ब्रिटिशांच्या काळात मिठावर कर लावला म्हणून त्या विरोधात गांधीजींनी मार्च काढला होता. १९८२ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये एनटी रामाराव यांनी चैतन्य रथम यात्रा काढली. हैदराबादहून २९ मार्च १९८२ रोजी सुरू झालेली यात्रा ७५ हजार किमी अंतराची होती. अविभाजित आंध्र प्रदेशमध्ये १९७२ ते १९८२ या काळात राज्यात पाच वेळा मुख्यमंत्री बदलले गेले.  एकदा राष्ट्रपती राजवट लागली. जनतेला मजबूत व स्थिर सरकार मिळावे म्हणून रामाराव यांनी चैतन्य रथ यात्रा काढली होती. या यात्रेने रामाराव यांच्या पक्षाला प्रचंड जनसमर्थन मिळाले. १९८३ मध्ये झालेल्या निवडणुकीत रामाराव यांच्या तेलुगू देशमचे २९४ पैकी १९९ जागांवर आमदार निवडून आले. त्यानंतर राज्यात तेलुगू देशमचे पाच वेळा सरकार स्थापन झाले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्ली अशी ४ हजार किमी अंतराची पदयात्रा काढली होती. तेव्हा काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्ष दुर्बल व विसकटलेला होता. पण त्यांनी कोणाला टार्गेट करून यात्रा काढली नव्हती.
अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा मांडून भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम रथयात्रा सुरू केली. गुजरातमधील सोमनाथ मंदिर ते अयोध्या अशी रथ यात्रा २५ सप्टेंबर १९९० रोजी सुरू झाली. ९ राज्यातून १० हजार किमी मार्गक्रमण करीत निघालेली यात्रा बिहारमधील लालूप्रसाद सरकारने समस्तीपूरमध्ये अडवली व अडवाणी यांना अटक केली. त्यानंतर लगेचच केंद्रातील व्ही. पी. सिंग सरकारचा भाजपने पाठिंबा काढून घेतला व सिंग सरकार कोसळले. कारसेवक जेव्हा अयोध्येला पोहोचले तेव्हा यूपीतील मुलायम सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला.  मात्र त्या घटनेनंतर देशात भाजपची शक्ती वेगाने वाढली. सन २००४ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी चेतल्ला शहरापासून यात्रा काढली. १५०० किमीची यात्रा अकरा जिल्ह्यांतून फिरली. राज्यात दुष्काळाची परिस्थिती होती म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजशेखर रेड्डींनी पदयात्रा काढली होती. दहा वर्षे सत्तेवर असलेल्या तेलुगू देशम सरकारच्या विरोधात नाराजी मोठी होती, रेड्डी यांना यात्रेतून मोठे जनसमर्थन मिळाले. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी १८५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले व तेलुगू देशमला हटविण्यात रेड्डी यांची पदयात्रा कारणीभूत ठरली. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी २०१७ मध्ये प्रजा संकल्प यात्रा काढली होती.  ६ नोव्हेंबरला कडप्पा जिल्ह्यातून निघालेली श्रीकाकुलमपर्यंत पोहोचली. ४३० दिवसांत १३ जिल्ह्यांतील १२५ विधानसभा मतदारसंघांतून ३६४८ किमी अंतर रेड्डी यांनी पदयात्रेतून पार केले. २००९ मध्ये त्यांचे पिताजी वाईएस राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडने जनगमोहन यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी वाईएसआर काँग्रेसची स्थापना केली. यात्रेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५२ जागा जिंकल्या व राज्यात जगनमोहन यांचे सरकार स्थापन झाले. भारत जोडो यात्रेत राहुल यांच्या फाइव्ह स्टार राहणीमानाची व अंगावरील एकेचाळीस हजार रुपये किमतीच्या टी-शर्टची चर्चा अधिक झाली.

डॉ. सुकृत खांडेकर
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

 611 Total Likes and Views

0 Comments

No Comment.