गब्बर सिंग हा भारतीय चित्रपटसृष्टीमधला सर्वात हिट व्हिलन. तो अतिशय पॉप्युलर होता. त्याचे डायलॉग घराघरात, रस्त्या-रस्त्यावर, पानठेल्यावर म्हटले जायचे. आजही त्यातले डायलॉग लोकांना पाठ आहेत. एकंदरीत तो व्हीलन संप्रदायामधला प्रभावी डायलॉग डिलिव्हरी करणारा कलाकार होता. गब्बर खोटारडा होता, मग्रूर होता, क्रूर होता, थंड डोक्याचा होता, महाकुटील होता, कारस्थानी होता. सध्याचे राजकारण पाहिले की गब्बरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
शोले मध्ये जय-वीरू ही जोडी देखिल आहे. म्हणायला ते दोघे हिरो आहेत, पण खऱ्या अर्थाने बाहुले आहेत. व्हीलन जेवढा क्रूर, तेवढाच हिरोच्या कॅरेक्टरला उठाव येतो. त्या पातळीवर जय वीरू झालेले धर्मेंद्र-अमिताभ हे विनोदी अभिनेते वाटतात.
शोलेचा खरा हिरो ठाकूर आहे ! संजीव कुमार आहे ! दोन्ही हात नसलेला ठाकूर हा ज्या पद्धतीने बुटाच्या टाचेखाली रगडून गब्बर सिंगचा बदला घेतो, ते पाहताना लोक टाळ्या वाजवतात. एक प्रकारचे आत्मिक समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर असते.
भारतीय राजकारण सध्या गब्बर सिंग प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात एकवटलेले दिसते. गब्बरच्या टोळीमध्ये सामील होण्यासाठी अनेक मोठे मोठे चेहरे धन्यता मानू लागले आहेत. डाकूंनी लुटलेल्या सोन्याची, चांदीची, पैशाची विल्हेवाट लावणारे सावकार पूर्वीही गावागावात होते. ते लोकांना आपले हितचिंतक वाटायचे. अडीअडचणीला गोरगरिबाला मदत करायचे. उसणे पैसे द्यायचे. अर्थात त्याचे व्याज मोठ्या प्रमाणात वसूल करून घ्यायचे. पण गोरगरिबांना ते आपले वाटत होते. प्रत्यक्षात मात्र ते डाकूंचे साथीदार होते. काँग्रेस-राष्ट्रवादी मधले जे महाभाग सध्या सत्ताधारी पक्षांमध्ये सामील होत आहेत, ते सगळे लोक, त्या सावकारा सारखे आहेत. त्यांनी स्वतःही जनतेच्या लुटीतून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. आमदार, खासदार, मंत्री बनून स्वतः डाके घातलेले आहेत. पण लोकांना तेव्हा लक्षात आले नव्हते. आज ते उघडे पडले आहेत. गब्बर आणि कंपनी यांचे आभारच मानायला पाहिजे. कारण नकळत का होईना, पण त्यांच्यामुळेच खरे डाकू उघडे झालेत.
समाजात सद्या सर्वत्र दहशत पसरली असली, तरी यातूनच नवे नेतृत्व पुढे येणार आहे. इंग्रजांच्या दहशतवादी सत्तेसमोर गांधी नावाचा एक फाटका माणूस छाती पुढे करून उभा झाला. आणि सारा देश एकवटला ! या फकिरानं जनतेला हिंसा करायला मनाई केली. गोळी छातीवरती झेलून घ्या, लाठी पाठीवरती झेलून घ्या, मुकाट्यानं सारे काही सहन करा, फक्त असहकार करा.. अशाप्रकारचा नवा मंत्र या जगाला दिला. करोडो लोक या फकिराच्या आदेशाप्रमाणे लाठी, गोळ्या, दगड.. सारं सहन करू लागले. आणि शेवटी इंग्रजी सत्तेला मागे हटावे लागले. भारतामध्ये त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.
मुद्दा असा, की जेवढा विलन पावरफुल, तेवढेच हिरोचे कॅरेक्टर आपोआप प्रभावी होऊन जाते. पुढच्या लढाईमधला खरा हिरो जनताच असणार आहे, नव्या दमाचे युवक हेच उद्याचे हिरो असणार आहेत. शोले मध्ये जय-वीरू नावापुरते हिरो होते. खरा हिरो – दोन्ही हात नसलेला ठाकूर हाच होता ! गब्बरच्या टोळीमध्ये सामील होणारांना होऊ द्या. डाकुंच्या टोळीची सदस्य संख्या कितीही मोठी असली, तरी ती गावापेक्षा मोठी असूच शकत नाही! लोकशाहीमध्ये जनता आणि मतदार यांचीच ताकद मोठी आहे.
अंधार जेवढा जेवढा तीव्र होत जातो, तेवढेच काजव्याच्या चमकण्यालाही आपोआप तेज प्राप्त होते. साधा काजवाही मोठा आधार वाटायला लागतो. भारतीय राजकारणाची सध्याची परिस्थिती ही अशी काळरात्रीच्या दिशेने वाटचाल करणारी आहे.
व्हिलन जसा एखाद्या व्यक्तीला मारताना आधी त्याला चटके देतो, वेगवेगळ्या पद्धतीने छळ करतो, तसाच प्रकार या सरकारने सुरू केला आहे. जसजशी जनता त्रस्त होईल, तसतशा सरकारला आनंदाच्या उकळ्या फुटतात. ही विकृती आहे. ती थांबली पाहिजे. त्यासाठी जनतेने विकृतीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात मतदान केले पाहिजे. लोकशाही पद्धतीने सामना केला पाहिजे.
स्वतःला शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवून घेणारे, शाहू महाराजांचे वंशज म्हणवून घेणारे लोक, या धर्मांधांच्या चरणावर लोटांगण घालायला निघून गेलेले आहेत. मागे राहिलेल्या स्वाभिमानी मावळ्यांनीच आता शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची शिकवण अमलात आणली पाहिजे.
सर्वांनी धर्मांध शक्तीच्या विरोधामध्ये उभे राहणे गरजेचे आहे. नव्या दमाचं नेतृत्व उभे करण्याची गरज आहे. अशा तरुण लोकांना हेरून त्यांना विधनाभेसाठी उभे केले पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करण्याची हिम्मत आणि शहाणपणा दाखवला पाहिजे. जमेल तेवढा पैसा जमा करा. पैसा नसला तर मेहनत करण्याची, एक महिन्याची वेळ देण्याची गरज आहे. स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाका. स्वतःच्या घरचं खाऊन एक महिना त्या उमेदवारासाठी काढा. प्रचार करा. आपल्या अवतीभवतीची पाच दहा गाव घ्या. नाही जास्त जमलं, तर स्वतःचा गाव तरी सांभाळा. चार समविचारी लोक एकत्र या. स्वतःच्या गावातले मोहल्ले मोहल्ले वाटून घ्या. ते पैशाच्या भरोशावर बूथ मॅनेजमेंट करतात. तुम्ही प्रेमाने माणसाला जवळ करा. महिलांनी महिलांच्या पर्यंत जावे. जेवणावळी, बाकीचे निरर्थक सोहळे बाजूला ठेवा. वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी यावर होणारा खर्च या जनतेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लावा. आजूबाजूची दहा घर प्रत्येकाने सांभाळण्याची तयारी केली, समजूतदारपणा दाखवला, तर खर्चाची देखील गरज पडणार नाही.
.. मात्र आधी आपण प्रामाणिकपणे आपल्या मनाला विचारा. विचाराशी बेइमानी करू नका. धर्मांध, बेईमान लोकांना कळत नकळत मदत होईल, असे काहीही करू नका. शेवटी मतदान आपल्यालाच करायचं आहे. आपण विकले जाणार नाही याची काळजी घ्या. आपला शेजारी विकला जाणार नाही, याची काळजी घ्या. त्यालाही धीर द्या. मी तुझ्यासोबत आहे, मी विकला जाणार नाही, तुही विकला जाऊ नकोस.. हे ठामपणे समजावून सांगा. दोघही शांतपणे विचार करा. परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. एका एका गावांमधून धर्मांधशक्ती हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.
..तेव्हा गब्बरला घाबरू नका. वरून टपकणाऱ्या हिरोची वाटही बघत बसू नका!
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर 9822278988
561 Total Likes and Views