मोदी आणि बूबका!!

News
Spread the love

मोदीजी गेली आठ वर्षं पंतप्रधान आहेत. अजून दोन वर्षं तरी राहतीलच.. 2024 मध्ये कदाचित पुन्हा निवडूनही येतील.. पण असा दिवस कधीतरी उगवेलच की जेव्हा त्यांच्या जागी अन्य कुणीतरी या पदी विराजमान होईल…
आणि प्रॉब्लेम खरा इथूनच सुरु होईल. मोदींनी आपल्या अचाट कार्यक्षमतेनं कर्तृत्वाची एवढी मोठी रेघ आखून ठेवली आहे की पुढच्या पंतप्रधानांना ती डोकेदुखी ठरू शकते.
मोदींनी स्थापित केलेले मानदंड पार करणं तर सोडाच पण तिथपर्यंत पोहोचणं देखील सोपी गोष्ट नाही. भल्याभल्यांची दमछाक होईल. मुळात सध्याचे अनेक नेते ‘शारीरिक क्षमतेत’ मोदींसमोर टिकणं महाकठीण आहे. आणि असा फिटनेस प्राप्त करायला वर्षनुवर्षांची तपश्चर्या आवश्यक आहे.. सध्या तरी ‘योगी’ सोडल्यास ती अन्य कुणाकडे दिसत नाही. ‘आहार – विहार’ या सर्वात महत्वाच्या आणि प्रत्येकाला अनिवार्य अशा जीवनदायी गोष्टी आहेत हे अनेक नेत्यांच्या गावीही नाही.. अखंड प्रवास करायचा.. देशाच्या आणि जगाच्या विविध भागात.. आणि तब्येत उत्तम ठेवायची आणि कमीतकमी वेळात अधिकाधिक काम करून पुढच्या कामासाठी एनर्जी शिल्लक ठेवायची हे येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे.

14 साली मोदी देशपातळीवर आले तेव्हाही त्यांचं वक्तृत्व चांगलंच होतं… पण या बाबतीत गेल्या काही वर्षात त्यांनी जी घोडदौड केलीय ती आश्चर्यजनक आहे. ज्या राज्यात जातील तिथल्या भाषेत दोन-तीन वाक्य बोलायची… स्टेजवर बसलेल्या पंधरा-वीस जणांची नावं योग्य क्रमानं- न अडखळता घ्यायची- आणि मग विशुद्ध हिंदीत बोलायचं.. उगाचच उर्दूचा बोझ नाही.. संस्कृतचे संदर्भ द्यायचे पण क्लिष्टता टाळायची…. चपखल विशेषणांची खैरात.. अचूक शब्दनिवड.. आवश्यक तिथं अनुप्रास / यमक… ही त्यांची वैशिष्ट्य! त्यांची भाषणं लिहून देणारे लोक हुशार असतीलच पण प्रत्येक भाषणात मोदींचा ‘स्वतःचा टच’ नि:संशय दिसतो…
सध्यातरी इथपर्यंत पोहोचणारा अन्य कुणी दृष्टिक्षेपात नाही.

मोदींसारखं ‘कौटुंबिक पाशापासून पूर्णत: मुक्त असणं’ हे ही भावी नेत्यांसाठी एक आव्हान असेल. आठ वर्षात फक्त एकदा मोदींनी आपल्या वृद्ध आईला पंतप्रधानांच्या निवासस्थानी रहायला आणलं होतं… अन्य नातेवाईकांपैकी कुणालाही मोदींच्या पदाचा थेट लाभ मिळाल्याचं अजून तरी ऐकीवात नाही. स्वतःच्या जेवणाचा खर्चही मोदी स्वतःच्या पगारातून करतात अशी माहिती नुकतीच समोर आली आहे . ‘भेटवस्तूचा लिलाव करून मिळालेला पैसा एखाद्या कल्याणकारी योजनेसाठी देणे’ ही त्यांची जुनी सवय आहे.. ही नि:संग वृत्ती अंगी रुजवणं कठीण गोष्ट आहे….

भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचं मोदींच्याइतकं सूक्ष्म आणि सम्यक ज्ञान अन्य राजकीय नेत्यांपाशी नाही. एकदा ते संसदेच्या कँटीन मध्ये जेवले आणि अभिप्राय वही पुढे केल्यावर त्यांनी लिहिलं.. “अन्नदाता सुखी भव!” मुळात भारतीय संस्कृतीचा निरतिशय अभिमान, त्याचा आनुषंघिक व्यासंग, डोळसपणे केलेलं भारतभ्रमण यामुळं इथल्या मातीचा नेमका पोत मोदींनी जाणला आहे… भारतीयांत्वात इतका खोल मुरलेला नेता अन्य कुणी नाही.

विरोधकांची अश्लाघ्य आणि दर्जाहीन टीका विनसायास पचवण्याची मोदींची क्षमता अद्भुत आहे. ‘मोदींनी EVM हॅक केले/ चौकीदार चोर हैं/ मोदी हिटलर असल्यामुळे पुन्हा निवडणुका होणारच नाहीत/मोदींनी देश विकला’ इथपासून ते अगदी अर्वाच्य भाषेतील वैयक्तिक टिकेपर्यंत सर्व प्रकारची आलोचना मोदी सतत पचवत असतात. किंबहुना अशा टिकेकडे ते ढुंकूनही बघत नाहीत…. त्यामुळे विरोधक अधिकच चेकळतात.. पुन्हा विखारी टीका.. पुन्हा दुर्लक्ष.. अधिक काम.. हे चक्र अविरत चालूच आहे. ‘कचऱ्यापासून वीज निर्मिती’ करतात तशी मोदी ‘टीकेच्या कचऱ्यापासून कामासाठी ऊर्जा निर्मिती’ करतात.. सोपी गोष्ट नव्हे ही!

‘सर्जी बूबका’ नावाचा रशियन Pole vaulter (उंच उडी ) होता. तो दरवेळी पोल व्होल्ट मध्ये नवनवे विक्रम करायचा.. आणि स्वतःच ते मोडायचा.. त्यानं अनेक सुवर्ण पदकं मिळवलीच पण एकूण 35 वेळा विश्वविक्रम मोडले… बहुसंख्य वेळा स्वतःचेच! मोदींनी सेट केलेले मानदंड मोडण्याची क्षमता सध्या तरी त्यांच्याशिवाय अन्य कुणाकडे दिसत नाही….
आपण स्वतःच स्थापित केलेले कार्यक्षमतेचे निकष मोदींनी वारंवार मोडवेत हीच आम्हा भक्तांची सदिच्छा आहे.

जीवेत शरद: मोदीजी!
वाढदिवसानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा!!

🌹
🌹
🌹
🌹
🌹
🌹

 260 Total Likes and Views

0 Comments

No Comment.