‘जिथे जो कुणी प्रस्थापित असेल तिथे मनसे लढणार,’ असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं. येत्या महापालिका निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करेल अशी जोरदार चर्चा होती. पण राज यांनी आपल्या विदर्भ दौऱ्यात स्वबळाचा नारा लावला. राज ठाकरे यांनी काल दिवसभर स्थानिक नेत्यांशी चर्चा केली, विविध सेलच्या बैठका घेतल्या, पदाधिकाऱ्यांशी बोलले. त्या नंतर आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी सांगितले, की आम्हाला प्रस्थापितांशी लढावं लागेल, मग तो कोणताही पक्ष असो.
राज म्हणाले, मैत्रीचे संबंध एकीकडे. पण शेवटी राजकारण हे नात्यांवर नाही तर धोरणांवर, मुद्द्यांवर चालतं. प्रत्येकजण प्रस्थापितांविरोधात लढूनच मोठा होतो. हा विदर्भ पहिल्यांदा ओळखला जायचा तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून. मग भाजपने प्रस्थापित काँग्रेसविरोधात लढा दिला आणि विदर्भ काबीज केला. म्हणजेच प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठं होता येतं. जर विदर्भात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल. राजकारण हे एका बाजूला आणि मैत्रीचे संबंध हे दुसऱ्या बाजूला.. गडकरींची आणि माझी मैत्री ३५ वर्षांपासूनची आहे. राजकारण हे सतत सुरु असतं. राजकारण हे मुद्द्यांवर, धोरणांवर असतं. राजकारणातली टीका देखील मुद्दे-धोरणांवर असते. नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल.
प्रस्थापितांशी लढण्याचा मंत्र लावला तर मनसेला नागपुरात भाजपशी, पण मुंबईत उद्धव ठाकरेंशी लढावे लागेल. भाजपची तीच रणनीती आहे. शेवटी भाजप आणि मनसेचे टार्गेट मुंबई जिंकण्याचे आहे.
102 Total Likes and Views