नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…. संघाच्या प्रार्थनेला चाल देऊन पहिल्यांदा गाणारे श्री यादवराव जोशी यांचा आज जन्मदिन !

Analysis
Spread the love

आज संघाचे जे विशाल स्वरूप नजरेसमोर येते ते अनेक लोकांनी केलेल्या त्याग व बलिदानामुळे. आपल्या अंगभूत कौशल्य व कलागुणांचा उपयोग करून करोडपती होऊ शकले असते असे काही महान लोकं संघाच्या संपर्कात आले व आपले सर्वस्व संघाला अर्पण केले. त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे श्री यादवराव जोशी.

यादवरावांचा जन्म ३ सप्टेंबर १९१४ रोजी नागपुरात झाला. आई-वडिलांचे ते एकमेव पुत्र होते. लहानपणापासूनच त्यांना गायनाची प्रचंड आवड होती. गळ्यात साक्षात गंधर्वांचे वास्तव्य असावे असा त्यांचा आवाज होता.

ते नऊ वर्षांचे असतांना चिटणीस पार्कच्या मैदानात गायनाचा कार्यक्रम होता. त्याकाळी आजच्यासारखी मनोरंजनाची साधने नव्हती. गायनाचा कार्यक्रम म्हटला की खूप गर्दी व्हायची. अनेक दिग्गज गायकांनी आपली सेवा दिली. या भरगच्च गर्दी असलेल्या गायनाच्या कार्यक्रमात आयोजकांनी यादवला गाण्याची संधी दिली व यादवने या संधीचे सोने केले. अप्रतिम गायला. गायन आटोपल्यानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. संगीत सम्राट सवाई गंधर्वांनी यादवची खूपच प्रशंसा केली.

सर्व दिग्गज गायकांनी सर्वसंमतीने त्यांना  “बालभास्कर” हा खिताब याच कार्यक्रमात बहाल केला.

मित्रांच्या व यादवच्या संगीत शिक्षकाच्या आग्रहास्तव प.पू. डाॅक्टर हेडगेवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.  त्यांनी यादवाचे मंत्रमुग्ध करणारे गायन ऐकले आणि त्यांच्या डोक्यात विचार आला की यादवाच्या आवाजाचा संघासाठी उपयोग करून घेतला तर?

बाजूलाच यादवचे संगीत क्षेत्रातील गुरू शंकरराव प्रवर्तक बसलेले होते. त्यांनी यादवची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून मिळविली व मला संघकार्यासाठी हा मुलगा देता का ही विचारणा केली. तुम्हाला नाही कसे म्हणणार असे म्हणत ठीक आहे, आजपासून यादव तुमचाच म्हणाले व यादवला डाॅक्टरांच्या स्वाधीन केले व यादव पुर्णतः संघमय झाला. बहुसंख्य संघगीतांना यादवरावांनीच चाली लावल्या आहेत. नरहरी नारायण भिडे रचित “नमस्ते सदा वत्सले मात्रूभुमे” या वर्तमान प्रार्थनेला यादवरावांनीच चाल लावली व पहिल्यांदा त्यांनीच संघाच्या कार्यक्रमात गायली.

त्यांची ही विलक्षण प्रतीभा व संगीत साधना पाहून पंडित भीमसेन जोशी देखील थक्क झाले होते व त्यांनी ,जर यादवराव संगीत क्षेत्रात रमला असता तर या भीमसेन जोशीला संगीत क्षेत्रात वाव मिळालाच नसता असे गौरवोद्गार काढले. ज्यांना भारत रत्न या सर्वोच्च उपाधीने गौरवण्यात आले त्या भीमसेन जोशींनी यादवरावांबद्दल हे उद्गार काढणे हेच यादवरावांच्या संगीत क्षेत्रातील तयारीचे दिग्दर्शन करतात.

एम्. ए. व कायद्याची परिक्षा पास करून यादवराव संघाचे प्रचारक म्हणून निघाले. सुरवातीला झांशी हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. काही महिन्यानंतर प.पू. डाॅक्टर हेडगेवारांची प्रकृती ढासळली त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी यादवरावांना नागपुरात बोलावून घेतले. १९४१ मध्ये त्यांना कर्नाटकात प्रांत प्रचारक म्हणून दायित्व दिल्या गेले. त्यानंतर दक्षिण क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अ.भा. प्रचार प्रमुख, सेवा प्रमुख, आणि १९७७ ते १९८४ याकाळात सह सरकार्यवाह होते. दक्षिणेतील विविध भाषांमध्ये पुस्तक प्रकाशन, सेवा व संस्कृत प्रचार यामध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. भारत भारतीद्वारा लहान मुलांसाठी जवळपास ५०० लघुपुस्तकांचे प्रकाशन यादवरावांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते.

१९६२ ला त्यांनी बेंगलोरमध्ये दहा हजार गणवेषधारी स्वयंसेवकांचे शिबीर घेतले होते. १९८३ मध्ये विहिप द्वारा आयोजित शिबीर ज्यात ७०,००० प्रतिनिधी व एक लाखावरील पर्यवेक्षक उपस्थित होते. हे संपूर्ण शिबीर यादवरावांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. त्यांची नियोजन व त्याचे कार्यान्विकरण करण्याची क्षमता विलक्षण होती. 

आयुष्याचा प्रत्येक क्षण संघासाठी जगणाऱ्या यादवरावांची जीवनज्योत २० ऑगस्ट १९९२ ला मावळली. त्यांचे जीवन हे आपल्यासाठी मार्गदर्शक तत्व बनलेले आहे.

आपले सर्वस्व संघासाठी पर्यायाने राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या अशा महान लोकांमुळेच आज संघ उत्तरोत्तर वाढत आहे व जगातील सर्वात मोठे सामाजिक संघटन ठरले आहे.

श्री यादवरावांना विनम्र अभिवादन!

 346 Total Likes and Views

0 Comments

No Comment.