एकोणवीसावं षटक धोक्याचं

Analysis Sports
Spread the love

१९६४ सालची सोळावं वरीस धोक्याचं ही लावणी आपल्या चांगल्या परिचयाची आहे. अर्थातच हार्मोन्सच्या केमीकल लोच्या ने शारीरिक मानसिक बदल, विकास होतो आणि याच वयात नवतरुणांना जास्त जोपायचं असतं. अगदी असंच काहीसं टीम इंडियाचं एकोणवीसावे षटक धोक्याचं झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला विजय विरोध संघ १९ व्या षटकांत पळवत असल्याने आपला संघ हतबल झाला आहे. निश्चितच केवळ शेवटच्या षटकातच चांगले खेळून सामना जिंकला जातो असे नसले तरी जिंकायची शेवटची लाईफ लाईन तिथेच असते आणि नेमके याच क्षणी आपले गोलंदाज गळपटू लागले आहे. पाक, लंका आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण १९ व्या षटकांत सामना गमावून बसलो आहोत.*

*झाले काय तर आशिया चषकाच्या नामुष्की नंतर कांगारू विरूद्ध लढतीत भारतीय गोलंदाज काही शिकले असतील असे वाटले होते. मात्र कालचा सामना पाहता आपले गोलंदाज हम नहीं सुधरेंगेची प्रतिज्ञा केलेले दिसताहेत. दोनशेहून जास्त धावा करूनही आपण हरत असेल तर काय म्हणावे अशा गोलंदाजीला. त्यातही भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि चहल सारखे अनुभवी गोलंदात धावांच्या खिरापती वाटत असेल तर सामना कोण जिंकून देणार? खरेतर विरोधी संघांनी भारतीय गोलंदाजीचा चावून चोथा केलेला आहे. पुर्वीचा आपल्या स्वींगने बळी टिपणारा भुवी आता फारतर वासरात लंगडी गाय शहाणी एवढा राहीला आहे.*

*भुवीचे सध्याचे प्रदर्शन पाहता त्याला डेथ ओव्हर स्पेशलीस्ट म्हणणे धाडसाचे ठरेल. एखादी जलवाहिनी फुटून कारंजी उडावी तशी त्याची धावावाहीनी फुटून संघाची नाव एकोणवीसाव्या षटकांत डुंबून जाते. कधी कधी तर संशय येतो की ज्याप्रमाणे राहुल मोदींचा स्टार प्रचारक आहे, त्याचप्रमाणे भुवी विरोधी संघाचा स्टार खेळाडू तर नाही ना. त्यामुळे यापुढे भुवी १९ व्या षटकांत सामना काढून देईल ही एकप्रकारची अंधश्रद्धा वाटते. तसेही आपल्याकडे बहुमजली इमारतीत तेरावा मजला केवळ अंधश्रद्धेमुळे नसतो. मग १९ वे षटक टाकतांना आपले गोलंदाज वरचा मजला का बरे वापरत नसणार हा प्रश्नच आहे.*

*केवळ भुवी कशाला, उमेश यादवने सुद्धा कालच्या सामन्यात निराशा केली. खरेतर उमेश यादवचा या संघात समावेश नक्कीच धक्कादायक होता. त्याच्या पहिल्याच षटकात कांगारूंनी धडाकेबाज फलंदाजी करून त्याची हवा काढून टाकली. दुसऱ्या षटकांत उमेशने दोन बळी जरूर टिपले परंतु त्यात फलंदाजांचा सिंहाचा वाटा होता. तो प्रमुख गोलंदाज म्हणून खेळवला गेला असला तरी तो आपली चार षटके सुद्धा पुर्ण टाकू शकला नाही. सोबतच चहलच्या फिरकीची जादू फिकी पडल्याचे जाणवते आहे. आयपीएल स्टार हर्षल पटेलची कामगिरी त्याला स्वतः ला सुद्धा पटणार नाही एवढी सुमार होती. फक्त अक्षर पटेलने थोडीफार लाज राखली पण इतरांचे काय हा यक्षप्रश्नच आहे.*

*प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर केवळ जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सामी हेच सध्या आपल्याकडे जागतिक स्तराचे गोलंदाज आहे. इतर वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर ज्यांच्या कडे वेग असतो त्यांच्या कडे अचूकता नसते, अचूकता असली तर वेग नसतो. तरीपण दिपक चहर, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांचा मुरब्बा होऊ नये याची बीसीसीआयने दक्षता घेतली पाहिजे अन्यथा या गोलंदाजांच्या भरवशावर आगामी टी ट्वेंटीचा वर्ल्डकप जिंकणे आपल्यासाठी दिवास्वप्न ठरेल.*

*मोहालीच्या सामन्यात कांगारूंनी ज्याप्रकारे माहौल केला ते पाहता आपल्या गोलंदाजांना संपूर्ण विस षटके सामन्यावर पकड ठेवणे गरजेचे आहे. सोबतच कॅमरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडला जीवदान देऊन आपल्या क्षेत्ररक्षकांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. खरेतर भारतीय क्षेत्ररक्षक परोपकाराच्या बाबतीत हिशोब एकदम चोख ठेवतात. तुम्ही आमचे दोन झेल सोडले काय, आम्ही तुमचे तीन झेल सोडतो. निश्चितच याबाबत तरी आपल्याला फेअर प्ले अवार्ड जरुर मिळू शकतो. कालच्या सामन्यात आपल्या फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत गोलंदाजांना चांगली संधी दिली होती. मात्र कांगारूंनी प्रारंभ ते शेवटपर्यंत टॉप गिअरमध्ये फलंदाजी करत टीम इंडियाचे मनसुबे उधळून लावले.*

*तीन सामन्यांच्या मालिकेत आपला संघ माघारला असला तरी आपल्याकडे सुधारण्याची संधी नक्कीच आहे. मात्र यात प्रामुख्याने जबाबदारी गोलंदाजांची आहे. नाही तर आपल्याला एकतर बुमराहचे क्लोनींग करून दोनतीन बुमराह तयार करावे लागतील किंवा मोदीजींना सांगून आफ्रिकेतून चीत्यांसोबत दोन चार वेगवान गोलंदाज मागवावे लागतील. अथवा रोहीत शर्माला भारत जोडो यात्रेसारखी अच्छे बॉलर खोजो यात्रा काढावी लागेल. यातील गंमतीचा भाग जरी सोडला तरी टीम इंडिया आयसीसीच्या चषकापासून चार हात दूर का आहे याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. जागतिक स्तरावरचे फलंदाज, गोलंदाज संघात नसतील तर आयपीएलच्या काजव्यांकडून सूर्यप्रकाशाची अपेक्षा का म्हणून बाळगावी.*
**********************************
दि. २१ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

 1,167 Total Likes and Views

0 Comments

No Comment.