नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणतात. मात्र काल संध्याकाळी टीम इंडियाच्या सूर्याने कांगारूंना दिपवून टाकत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला. अत्यंत चुरशीच्या लढतीत सूर्यकुमार यादव आणि विराटने घणाघाती प्रहार करत कांगारूंचा बिमोड केला. काटेकोर गोलंदाजी आणि दक्ष क्षेत्ररक्षणाचे चक्रव्यूह भेदत टीम इंडियाने ही मालिका २/१ अशी आपल्या खिशात टाकली आहे.*
*झाले काय तर आशिया चषकाच्या कटू आठवणी पुसून काढण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे होते. त्यातच मोहालीच्या सामन्यात अवाढव्य धावसंख्या करूनही गोलंदाजांनी सामन्याची माती करून टाकली होती. भुवनेश्वर कुमारचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला आपली माती आपली माणसं म्हणणे योग्य ठरेल. तर नागपूरची लढत म्हणजे खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ होती. कारण एवढ्या छोटेखानी सामन्यात कोणताही संघ बाजी मारू शकला असता. परंतु रोहीतच्या बलदंड फलंदाजीने आपण तो सामना काढला. त्यातही रोहीतची फटकेबाजी मंत्रमुग्ध करणारी होती. रोहीतच्या बॅट बॉलचा मधुचंद्र कधी संपूच नये असे वाटत होते मात्र सामना केवळ आठ षटकांचा असल्याने आपला हिरमोड झाला.*
*खरेतर आयसीसीने रोहीतच्या सहजसुंदर आणि उत्तुंग षटकारांना सहा ऐवजी आठ धावा द्यायला हव्या एवढे ते फटके नयनरम्य असतात. काय ती अचाट ताकद, काय ते अचूक टायमींग सगळं कसं ओक्के मंधी असतं. हैद्राबादचा सामना गाजवला तो दोन्ही बाजूंच्या फलंदाजांनी. प्रमुख गोलंदाजांची मनसोक्त धुलाई करत त्यांनी गोलंदाजांना चाळीशी पार करायला लावली. आपल्याकडे भुवनेश्वर कुमार खरेतर ॲसेट पेक्षा लायबलीटी झाला आहे. भुवी गोलंदाजीला येताच विरोधी फलंदाज तुने मारी एंट्री और दिलमे बजी घंटी यार असे नक्कीच म्हणत असणार. भलेही भुवीने या सामन्यात खतरनाक कॅमरून ग्रीन चा बळी घेतला असेल, तरीपण त्याचे तीन षटकांत ३९ धावा देणे पचायला जड जातंय. फारतर याला घर जाळून कोळसा विकणे एवढे जरुर म्हणू शकतो.*
*कालच्या सामन्यात इतर गोलंदाजांत बुमराहला सुद्धा कांगारूंनी तडाखा देत त्याला पन्नास धावा मोजायला लावल्या. केवळ अक्षय पटेल कांगारूंना वेसण घालण्यात यशस्वी ठरला. पटेलच्या फिरकीची अक्षरं तिन्ही सामन्यात कांगारूंना कळलीच नाही. अक्षरने तिन्ही लढतीत कांगारूंना अक्षरशः छळले. उर्वरित पांड्या आणि हर्षल पटेल म्हणजे बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी सारखे काम आहे. मात्र हे दोघेही भुवीपेक्षा कमी अनुभवाचे असल्याने आंधळी पेक्षा तिरळी बरी असे म्हणावेसे वाटते. त्यातच भुवीला दुसरे षटक द्या अथवा अठरावे, एकोणिसावे षटक द्या , तो सातत्याने धावांचा रतीब घालतो आणि विरोधी संघाला सामन्यात कमबॅक करायची संधी देतो. भुवीच्या हातात चेंडू येताच भारतीय पाठीराख्यांची अवस्था भिक नको पण कुत्रा आवर अशी होते.*
*भारतीय संघाची फलंदाजी सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र गोलंदाजांचे उष्टे काढतांना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. खरेतर एकवेळ कांगारू चौदाव्या षटकांत सहा बाद ११७ वर थबकले होते परंतु भारतीय गोलंदाजांनी सढळ हाताने मदत करत धावसंख्या फुगण्यास हातभार लावला. प्रत्युत्तरादाखल आपलाही संघ सुरवातीला अडखळला. राहुल रोहीत स्वस्तात निपटताच संंघ दडपणाखाली आला. मात्र यावेळी विराट आणि सूर्यकुमार ने कांगारूंची दाळ शिजू दिली नाही. विशेषतः सूर्यकुमारने अफलातून खेळी करत सामना आपल्याकडे खेचून आणला. या जोडीने एनआयए ने पीएफआय वर टाकलेल्या धाडी पेक्षा जास्त धाडी कांगारूंवर टाकत विजय दृष्टीपथात आणला होता. मात्र कहानीत अजूनही ट्वीस्ट बाकी होते.*
*यादवचा सूर्य मावळताच चौकार षटकारांचा दुष्काळ पडला. आपल्या संघाने पांढरे निशाण तर फडकवले नाही ना, एखादा अदृश्य हात आपल्या संघाला सामना शेवटच्या षटकांत नेण्याचा आदेश तर देत नाही ना असा मनात संशयकल्लोळ निर्माण झाला. मात्र त्याला कांगारूंची कधीही हार न मानण्याची चॅम्पियन वृत्ती कारणीभूत आहे असे वाटते. सूर्यकुमार बाद होताच विराटचे टायमींग चुकू लागले होते. तर कांगारूंनी पांड्याची पुरती नाकेबंदी करून टाकली होती. पांड्या साठी ऑफला विशेषतः एक्स्ट्रा कव्हरला टाईट सिक्युरिटी, सोबतीला वाईड यॉर्कर टाकून त्याला संपूर्णतः जखडून टाकले होते. ऐनवेळी विराट बाद झाल्याने कांगारूंच्या अपेक्षा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पांड्याने वाईड यॉर्करच्या फटीतून तीर सोडत एकदाचा सामना संपवून टाकला.*
*सध्या जगभरात दहाबारा देश क्रिकेट खेळतात, तरीपण चॅम्पियन संघाचे बिरूद फक्त कांगारूंना लागले आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे. ही मालिका जरी कांगारूंनी गमावली असली तरी त्यांच्या विजिगिषू वृत्तीचे कौतुकच करावे लागेल. पहिल्या सामन्यात ज्या धडाडीने त्यांनी दोनशे धावा ओलांडल्या ते निश्चितच कौतुकास्पद आहे. तर शेवटच्या सामन्यात त्यांनी भारतीय संघाला धावांसाठी झगडत ठेवले. विशेषतः कांगारूंनी लावलेले क्षेत्ररक्षण पाहण्यासारखे होते. त्यांनी रोहीत, सूर्यकुमार आणि विराटचा नेमलेल्या जागी झेल देण्यास भाग पाडले. शिवाय अंतिम सामना शेवटपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले. भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर भुवी आपल्यासाठी गोलंदाजीतील भळभळती जखम आहे. एक अकेला देवेंद्र क्या करेगा प्रमाणे एक अकेला बुमराह क्या करेगा हे संघनिवड करतांना विचारात घ्यावे लागेल. फलंदाजीत जरी आपण मध्यमवर्गीय असलो तरी गोलंदाजीत आजही दारिद्र्य रेषेखालीलच आहोत याचेच भान टी ट्वेंटीच्या विश्वचषकासाठी जातांना ठेवावे लागेल.*
**********************************
दि. २६ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
161 Total Likes and Views