शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता दंड थोपटले आहेत. बंजारा समाजाचे आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधल्याने बंजारा समाजात खळबळ आहे. दिवाळीनंतर ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघत आहेत. या दौऱ्याची सुरुवात पोहरा देवीपासून ते करणार असल्याची चर्चा आहे.
बंजारा समाजाच्या गठ्ठा मतांच्या जोरावर राठोड निवडून येत आले. राज्यातल्या सत्तासंघर्षात राठोड शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे दुखावले आहेत. राठोड यांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी चक्क राठोड यांच्या बंजारा समाजाच्या महान्ताला हाताशी धरले आहे. राठोडांच्या गटातल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधल्याने यवतमाळ जिल्ह्यात राजकारण तापले आहे. येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत राठोड यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आव्हान देण्याची व्यूहरचना ठाकरे यांनी आखली आहे. राठोड यांच्याविरोधात लढण्यासाठी शिवसेनेची ही मोठी खेळी आहे. पुजा चव्हाण प्रकरणानंतर आणि शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बंजारा समाजात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. आता उद्धव ठाकरेंनी मास्टरस्ट्रोक खेळत महंतांनाच आपल्याकडे वळवून घेतले. महंताने बंजारा समाजाची थोडीही मतं फोडली तरी मतविभाजनात राठोड पडू शकतात. पण महंताच्या म्हणण्यानुसार समाज मतदान करेल अशी शक्यता नसल्याचा दावा एका बंजारा नेत्याने केला. हा नेता म्हणाला, महंत आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोहरादेवी गडावर आम्ही डोके टेकवू. पण गड आणि राजकारण वेगळे आहे.
158 Total Likes and Views