लग्न करायचंय? जोडीदार शोधताना सावधान…

Analysis
Spread the love

लग्नाच्या गाठी वर देवाने आधीच  बांधलेल्या असतात.  योग यावा  लागतो असे आपण ऐकतो. पूर्वी घरची मोठी माणसे लग्नं जुळवायची.  शक्यतो नात्यातल्या किंवा ओळखीतल्या घरात  पक्के व्हायचे.   अनेक मुलांना तर मुलीचा चेहरा लग्नात हार टाकतानाच दिसायचा. हल्ली जमाना बदलला. मुलामुलींच्या अपेक्षा वाढल्या. हल्ली मुलं-मुलीच वेबसाईट घेऊन  शोधत बसतात. मोबाईलने जग मुठीत आले. पण माणसे दूर गेली. त्यामुळे   लग्नाला मुलगा किंवा मुलगी शोधताना मुलांप्रमाणे वडिलधाऱ्यांचीही दमछाक  होत आहे.  रोजच्या धावपळीमुळे जनसंपर्क कमी झाला.  त्यामुळे की काय,  विवाह मंडळे आले, मेट्रीमोनी साईटस आल्या.   अनेक लबाड लोक याचा  गैरफायदा घेताना  दिसत आहेत. नोकरी करणाऱ्या मुलींना तर लाखो रुपयाने लुबाडल्याची असंख्य प्रकरणे  झाली आहेत. काहींनी तर  नववधू म्हणून चक्क तृतीयपंथी घरी आणल्याचे लक्षात आले. त्याचा  पिच्छा सोडवण्यासाठी त्या   तरुणाला चक्क  लाख रुपये मोजावे लागले.  अनेकांना तर पोलिसांकडून पकडून द्यावे लागले. मोजकीच प्रकरणे  उजेडात येतात. समाजात फजिती नको म्हणून लोक गप्प बसणे पसंत करतात. त्यामुळे वेबसाईट  पाहताना  खूप सावध राहा. ताकही फुंकून प्या.

            अनेक विवाहोच्छुक तरुण-तरुणी लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर मोठे शुल्क मोजून आपले प्रोफाईल टाकतात. मात्र, याचाच काही महाठग गैरफायदा घेऊन स्वत:ला विवाहोच्छुक असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करण्यासाठी जाळे टाकतात. अशा दोन घटना नागपुरात उघडकीस आल्या असून दोघांनीही शेकडो तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून लाखोंनी फसविल्याचे समोर आले आहे. लग्न करण्याच्या नावावर महिलांची फसवणूक करणाऱ्या धुळ्याच्या ४२ वर्षे वयाच्या एका इसमाला नागपूर पोलिसांनी अटक केली. नागपुरातील एका ३४ वर्षीय पीडितेने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. भिकन नावाच्या ह्या इसमाला  जुगार आणि सट्ट्याचे व्यसन आहे. पैशांसाठी तो विवाह संकेतस्थळावर महिलांशी ओळख वाढवतो. वेगवेगळे कारण सांगून त्यांच्याकडून पैसे घेतो आणि फरार होतो, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.  आतापर्यंत त्याने १५ महिलांना फसवल्याची माहिती समोर आली.

             सायबर क्राईमच्या मदतीने लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तरुणींच्या टोळीला नागपूर पोलिसांनी  अटक केली होती. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर १५ ते २० तरुणी विवाह संकेतस्थळावरील युवकांना कॉल करून लग्नाबाबत विचारपूस करून सुंदर मुलींचे छायाचित्र पाठवून आर्थिक फसवणूक करीत होत्या. त्यामुळे  सावध असा. लग्न हे आता केवळ दोन जीवांचे मिलन राहिलेले नाही. अनेकांसाठी  तो एक शुद्ध व्यवसाय  आणि काही लोकांसाठी तर फसवणुकीचा धंदा झाला आहे.

 594 Total Likes and Views

0 Comments

No Comment.