‘ब्राह्मणांनी पापक्षालन करावं’ असं सरसंघचालक भागवत का म्हणाले?

Editorial
Spread the love

सरसंघचालक मोहन भागवत  यांनी केलेल्या एक वक्तव्यावर  समाजात उलटसुलट चर्चा पेटली आहे. “ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टींचं समूळ उच्चाटन आता करायला हवं,” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.  विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नागपुरात नुकताच पार पडला त्या वेळी भागवत बोलत होते.

              मोहन भागवत म्हणाले, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली.” मात्र “वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असे  ते म्हणाले.

           कधीकाळी भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली सामाजिक एकता काळाच्या ओघात मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भागवत पुढे म्हणाले, सामाजिक एकता हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. पण नंतर त्याचा विसर पडला आणि त्यामुळे समाजाला गंभीर परिणाम भोगावे लागले. जर आज कुणी जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्थेविषयी विचारणा केली, तर ‘तो आता भूतकाळ आहे, तो आपण विसरायला हवा’, असंच उत्तर येईल. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असंही ते म्हणाले.

              मोहन भागवतांच्या या विधानावरून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी  टीका केली  आहे. दवे म्हणाले, “त्यांचं वक्तव्य चुकीचं आणि अभ्यासाशिवाय केलेलं आहे. त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील, तर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. पण असं न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान त्यांनी केलं. मोहन भागवतांनीच पापक्षालन करण्याची गरज आहे. इथला हिंदू नराधमांच्या हातात देण्याचं पाप तुम्ही करण्याचा विचार करत आहात. तुम्ही पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही देशात जातीयवाद वाढवत आहात.”

       राष्ट्रवादीचे सुप्रीमो  शरद पवार म्हणाले, “मोहन भागवतांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलं आहे, ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून, हा योग्य बदल आहे. पण, नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाबाबत भूमिका कशी घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे.

         राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले,  “निवडणुका जवळ आल्या, की अशी काही विधानं करणं आणि त्या वर्गाला चुचकारणं असं धोरण काही लोकांचं असू शकतं. या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री आहे की मोहन भागवत भाजपाच्या नेत्यांना यासंदर्भात लोकांना विश्वास वाटेल, अशी काही पावलं टाकायला सुचवतील. यातून ते जे भाष्य करतायत, त्याची अंमलबजावणी होऊ शकेल.”

            अर्थात भागवत म्हणतात म्हणून  जाती व्यवस्था  संपेल अशातला भाग नाही.  ‘जात नाही ती  जात’ असे म्हणतात ते  उगाच नव्हे.   राजकारण्यांची निवडणुकीची गणितेच जिथे  जातीवर ठरतात तर मग जात जाणार कशी? घालवणार कोण?लोकांनी मनावर घेतले तरच ती  जाऊ शकते.

 145 Total Likes and Views

0 Comments

No Comment.