गांधी परिवाराची पसंती

Editorial
Spread the love

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडवत नव्हती. त्यामुळे त्यांनी श्रेष्ठींविरोधात आपल्या समर्थक आमदारांचे जयपूरमध्ये जे प्रदर्शन घडवले, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. देशातील सर्वात जुन्या एकशे पस्तीस वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद  हे अत्यंत  प्रतिष्ठेचे आहे. ‘दैवाने दिले व कर्माने नेले’ अशी एक म्हण आहे, तसेच गेहलोत यांच्याबाबत घडले. त्यांना हायकमांडने देऊ केले आणि स्वतःच्या अहंकाराने गमावले, असेच म्हणावे लागेल. त्यांचे मुख्यमंत्रीपद तूर्त तरी बचावले असले तरी त्याची शान आणि मान त्यांनी घालवली आहे. ते आता आणखी किती काळ मुख्यमंत्री राहतील ते हायकमांडच्या मर्जीवर अवलंबून राहील, त्यांच्या पाठीशी काँग्रेसचे ९२ आमदार उभे राहिलेले दिसले तरी गांधी परिवार नाराज झाल्याने ते सारे आता पाय काढून घेतील. राजकारणात जादूगार अशी प्रतिमा असलेल्या गेहलोत यांच्या जादूला ओहटी लागली आहे.
तब्बल चोवीस वर्षांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आणि गांधी परिवारातील कोणीही या पदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. या पदासाठी पक्षाचे चार-पाच ज्येष्ठ नेते उत्सुक होते व त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारीही दाखवली. पण मल्लिकार्जुन खर्गे यांचे  पारडे अधिक जड असल्याचे दिसते आहे, कारण गांधी परिवाराची पसंती त्यांच्या पाठीशी आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी पात्रता व योग्यता असलेल्या अनेक निकषांवर मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी भरण्याची अंतिम तारीख ३० जून होती, त्यापूर्वी आठ दिवस सोनिया गांधींच्या दहा जनपथ या निवासस्थानी कोणाला पसंती द्यावी यावर सतत खलबते चालू होती. खर्गे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावर सुचक-अनुमोदक म्हणून तीस दिग्गज नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यात अशोक गेहलोत, ए. के. अँटोनी, पवन बन्सल, दिग्विजय सिंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत खर्गे यांचे अगोदर कुठे नावही नव्हते. ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. पण राजस्थानमधील काँग्रेस आमदारांच्या बंडाळीनंतर अगोदर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व नंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव वेगाने पुढे आले. गांधी परिवाराशी निष्ठावान असलेला ज्येष्ठ नेता म्हणूनच काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला.
दि. २८ सप्टेंबरला जयपूरमध्ये गहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट मुख्यमंत्री नकोत म्हणून जो धिंगाणा घातला, जो सर्व देशाने टीव्हीच्या पडद्यावर बघितला.  आमदारांच्या दबावाखाली मुख्यमंत्री कोण हे ठरविण्याची पद्धत व परंपरा काँग्रेसमध्ये नाही. गेहलोत समर्थकांच्या बेशिस्त वर्तनाने सोनिया, राहुल व प्रियंका सारेच नाराज झाले. केरळमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांच्याबरोबर असलेल्या दिग्विजय सिंग यांना अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिल्लीला पाठवले. पक्षाचे सरचिटणीस
के. सी. वेणुगोपाल यांच्यासह ते दिल्लीला आले व त्यांनी काँग्रेस मुख्यालयात जाऊन उमेदवारी अर्जही दाखल केला.
दि. २९ सप्टेंबरला रात्री सोनिया व प्रियंका यांच्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली व त्यात  मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव निश्चित करण्यात आले. गेहलोतही सोनिया गांधींना भेटले व त्यांचा नाराजीचा मूड बघून त्यांनी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून टाकले. ३० सप्टेंबरला सकाळीच खर्गे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना आल्या. खर्गे यांनाच गांधी परिवाराची पसंती आहे, हे दिग्विजय सिंग यांना समजताच, त्यांनी दिल्लीतील १० राजाजी मार्ग, या खर्गे यांच्या निवासस्थानी धाव घेतली व त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या भेटीनंतर लगेचच आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, असे दिग्विजय सिंग यांनी जाहीर करून टाकले.
मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर गांधी परिवाराला ते अधिक सोयीचे आहेत हेच प्रमुख कारण आहे. खर्गे यांचे वय पाहता, ते गांधी परिवाराला आव्हान देऊ शकणार नाहीत, ते महत्त्वाकांक्षी असल्यासारखे वागणार नाहीत आणि त्यांच्याकडून राहुल गांधी यांना कोणताही धोका उत्पन्न होण्याची शक्यता नाही. आज खर्गे यांचे वय ८० आहे. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होईल, तेव्हा त्यांचे वय ८२ असेल. खर्गे यांच्या जागी दुसरा कोणी अध्यक्ष झाला, तर तो राहुल यांचे किती ऐकेल तसेच भविष्यात तो राहुल यांना स्पर्धक तर होणार नाही ना, याची खात्री देता येत नाही.
कास्ट, लोकेशन व लँग्वेज या तीनही कसोट्यांवर खर्गे यांची उमेदवारी एकदम योग्य आहे, असे श्रेष्ठींनी गणित मांडले असावे. मल्लिकार्जुन खर्गे हे दलित आहेत. दलित मतदार बँकेवर खर्गे यांच्या नावाचा प्रभाव पडू शकेल व काँग्रेसला त्याचा लाभ घेता येईल. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १३१ जागा अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव आहेत. त्यामुळे जातीच्या निकषावर खर्गे यांची उमेदवारी एकदम योग्य ठरते. खर्गे हे दक्षिण भारतातून येतात. आज उत्तर भारतात विशेषतः हिंदी भाषिक राज्यात काँग्रेस कमकुवत आहे. त्याची कसर दक्षिणेत भरून काढण्यासाठी खर्गे यांचा उपयोग होऊ शकतो. खर्गे हे दाक्षिणात्य असूनही त्यांच्या ढंगाने ते हिंदीतून बोलू शकतात व भाषणही करू शकतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर गांधी परिवाराला पाच प्रमुख फायदे मिळू शकतात. (१) पडद्यामागे राहून पक्षाचे संचालन करता येईल. (२) निवडणुकीत सातत्याने होणाऱ्या पराभवाची जबाबदारी आता थेट गांधी परिवारावर येणार नाही. (३) पक्ष वाचविण्यासाठी गांधी परिवाराने त्याग करून पक्षाचे अध्यक्षपद परिवाराबाहेरील व्यक्तीला दिले, असा संदेश सर्वत्र जाईल. (४) खर्गे जरी अध्यक्ष झाले तरी पक्षावर संपूर्ण रिमोट कंट्रोल हा गांधी परिवाराचा राहील. (५) महाराष्ट्रात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना राज्याचा रिमोट जसा मातोश्रीवर होता, तसेच खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर पक्षाचा रिमोट दहा जनपथवर राहील.
काँग्रेसमधील जी २३ या नाराज गटाने पक्षश्रेष्ठींना गेली दोन वर्षे डोकेदुखी निर्माण केली होती. जी २३ गटातील अनेक नेत्यांचे खर्गे यांच्या उमेदवारीला समर्थन मिळाले आहे. आनंद शर्मा, मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदरसिंग हुड्डा आदींनी खर्गे यांच्या उमेदवारी अर्जावर सुचक-अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. खर्गे यांच्या उमेदवारीने जी २३ मधील नाराज नेते थंडावले आहेत.
फेब्रुवारी २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या राज्यात काँग्रेस पाच वर्षे सत्तेच्या बाहेर आहे. कर्नाटकात काँग्रेस मजबूत करण्यासाठी खर्गे यांच्या नावाचा व अध्यक्ष झाल्यावर त्या पदाचा पक्षाला उपयोग होऊ शकेल, असा श्रेष्ठींनी विचार केला असावा. खर्गे गेली ५३ वर्षे राजकारणात आहेत. १९६९ मध्ये गुलबर्गा शहर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळाली. १९७२ मध्ये ते विधानसभेवर प्रथमच आमदार झाले. सन २००८ पर्यंत ते नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये ते गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार म्हणून विजयी झाले. २०१४ मध्येही ते खासदार म्हणून निवडून आले. लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहांत त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी राज्यसभा विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा दिला.

 171 Total Likes and Views

0 Comments

No Comment.