२६ जानेवारी २०१५ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे नाव (म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी) असे पूर्ण नाव सोन्याच्या धाग्यात विणलेला एक बी-स्पोक किंवा मोनोग्राम्ड सुट परिधान केला होता. या सुटावरून त्यावेळी बरेच वादंग झाले होते. अत्यंत महागडा असा हा सुट दहा लाख रुपयांचा तरी आहे असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावेळी जाहीर केले होते व मोदींच्या सरकारला ‘सूटबूट की सरकार’ असे नामाभिधानही बहाल केले होते, हे वाचकांना आठवत असेलच.
आता हा सुट नेमका किती रुपयांचा होता?, बी-स्पोक सुट किंवा मोनोग्राम्ड सुट म्हणजे काय? हे आपण समजून घेऊ या. याचे कारण असे या सुटाबद्दल समाज माध्यमात आज जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याच्या कितीतरी खोलवर जाणारे हे प्रकरण आहे. आणि सदरहू वार्ताहराने नागपूर पासून लंडन पर्यंत काही वार्ताहर मित्रांची मदत घेऊन ते उघडकीस आणले आहे.
२२ कैरेट सोन्याचा धागा (जरी)
असे उघडकीस आले आहे की प्रत्यक्षात या सुटात २२ कॅरेट सोन्याच्या धाग्यांनी म्हणजे खऱ्याखुऱ्या जरीने ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ हे नाव विणले आहे त्यामुळे या सुटाची खरी किंमत दहा लाख रुपये नसून किमान एक कोटी रुपये आहे. एव्हढी रक्कम ‘सुवर्णाक्षरांच्या’ बी-स्पोक किंवा मोनोग्राम्ड सुटाला लागतेच लागते, त्या पेक्षा कमी किमतीत हा सुट तयार होऊ शकत नाही, असे शोध घेतला असता समोर आले आहे.
बी-स्पोक किंवा मोनोग्राम्ड सुट म्हणजे काय?
इंग्रजी मध्ये बी-स्पोकचा स्वैर अर्थ मी बोलतो असा आहे तर मोनोग्राम्ड चा अर्थ माझा मोनोग्राम म्हणजे ओळख असलेला असा आहे. याचा अर्थ बी-स्पोक म्हणजे माझ्या वतीने बोलणारा व माझा मोनोग्राम म्हणजे माझी ओळख असलेला सुट असा आहे.
बी-स्पोक/मोनोग्राम्ड सुट कसा तयार होतो?
हे सुट मुखयतः लंडनमध्ये तयार होतात व जगभरचे बी-स्पोक/ मोनोग्राम्ड सुटाचे ‘आंबटशौकिन’ ग्राहक अशा सुटासाठी लंडनमधील ‘सैव्हिल रो’ या गल्लीला भेट देतात. सैव्हिल रो ही जगभरच्या धनाढ्य लोकांचे कपडे शिवणाऱ्या टेलर्स व आउटफिटर्स दुकानांची उच्चभ्रू गल्ली आहे. सैव्हिल रो मधील कपडे सर्व सामान्य जनतेला परवडू शकत नाहीत ईतके ते महाग असतात, त्यामुळे फक्त अब्जोपतीच या गल्लीत कपडे शिवायला टाकतात. असे अनेक उच्चभ्रू टेलरिंग फर्म या गल्लीत आहेत व त्यापैकीच एक मोठे नाव आहे किंग एंड एलन. याची स्थापना जेक एलन यांनी केली आहे.
मोदींच्या बी-स्पोक/मोनोग्राम्ड सूटाची ऑर्डर २०१४ च्या ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये किंग एंड एलन या फर्मला देण्यात आल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे.
हॉलंड एंड शेरी ने विणले कापड
किंग एंड एलन या फर्मला मोदींच्या सुटाची ऑर्डर मिळताच त्या कंपनीने हे कापड तयार करण्यासाठी हॉलंड अँड शेरी नावाच्या कापड विणणाऱ्या फर्म ची मदत घेतली. चौकशीमध्ये असे लक्षात आले आहे की हॉलंड अँड शेरी ही फक्त बी स्पोक किंवा मोनोग्राम्ड सुटाचे कापड विणणारी अत्यंत निष्णात अशी कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकाचे नाव सुती धाग्यामध्ये, रेशमी धाग्यामध्ये व २२ कॅरेट सोन्याच्या धाग्यामध्ये सुटच्या कापडात विणून देऊ शकते. मोदींनी घातलेल्या सुटामध्ये २२ कॅरेट सोन्याचा (जरी) वापरलेली आहे. सोनेरी धाग्यात विणलेले हे नाव फक्त तीन फूट अंतरावरूनच वाचता येते, त्यापेक्षा जास्त अंतरावरून ते वाचता येत नाही.
रंगीत सुती धाग्याने नाव लिहायचे असेल तर सुट साधारण ३००० पौंड म्हणजे २,७३,००० रुपयांना मिळतो. रेशमी धाग्यानी नांव विणले तर सुट ५०००पौंडात म्हणजे ४,५५,०००रुपयात पडतो. पण २२ कॅरेट सोन्या सोन्याच्या धाग्यांनी नाव लिहायचे असेल तर रेशमी सुटापेक्षा किंमत तीस पट अधिक असते म्हणजे १,५०,००० पौंड असते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम १.३६ कोटी रुपये होते. (कृपया तक्ता पहा.) मोदींना कितीही डिस्काउंट मिळाला असला तरी या सुटाची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा कमी मुळीच नाही. दहा लाख रुपये हे या सुटाची किंमत अत्यंत कमी आकणे आहे.असो.
एका सुटाच्या ऑर्डरसाठी साधारणपणे ८० ते ९० मीटर कापड विणावे लागते. एका सुटाला फक्त साडेचार ते पाच मीटरच कापड लागते, परंतु नावाचे डिझाईन व्यवस्थित व एकसारखे यावे म्हणून इतके जास्त कापड विणावे लागते. एकदा कापड विणून झाले की ते सर्व कापड टेलरिंग करणाऱ्या फॉर्म कडे येते म्हणजे किंग एंड एलन कडे. व त्यानंतर मोदींच्या शारीरिक मापाबर हुकुम हा सूट शिवण्यात येतो. आपण सूट शिवतो तेव्हा जशी एक कच्ची फिटिंग, नंतर पक्की फिटिंग, व नंतर फायनल फिटिंग असे तीन प्रकार असतात तशीच पध्दत किंग एंड एलनकडेही आहे. मोदींच्या बाबतीमध्ये किंग एंड एलन यांनी आपली माणसे कच्च्या व पक्क्या फिटिंग साठी दिल्लीला पाठवली होती अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर सुट फायनल झाला व मोदींच्या मापाप्रमाणे शिवल्या गेला.
पंतप्रधान मोदींनी हा सूट सर्वप्रथम २६ जानेवारी २०१५ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागत समारंभात घातला. (कृपया फोटो पहावे.) आणि एकच गदारोळ उडाला. भारताचा पंतप्रधान एवढा महाग सुट कसा काय घालू शकतो? एवढा महाग सूट पंतप्रधानांना कसा परवडू शकतो? याबद्दल प्रचंड वादंग उभे झाले आणि मोदींवर सर्व सगळ्या बाजूने टीका होऊ लागली.
ही टीका सुरू असतानाच रमेश कुमार भिकाभाई वीरानी नामक एक हिरा व्यापारी अचानक पुढे आले व त्यांनी लगोलग जाहीर केले की त्यांनी हा सूट मोदींना आपला मुलगा स्मित वीरानी याच्या लग्नप्रसंगी सप्रेम भेट म्हणून दिलेला आहे. विराणी यांच्या म्हणण्यानुसार हा सूट त्यांनी पंतप्रधान मोदींना ११ ते १३ जानेवारी २०१५ या दरम्यान झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेमध्ये दिला होता. मजेची बाब म्हणजे विराणीच्या चिरंजीवांचे लग्न २६ जानेवारी २०१५ रोजी होते मग दहा-पंधरा दिवस आधी सूट देण्याचे प्रयोजन काय ? शिवाय व्हाय व्हायब्रंट गुजरात सारख्या मोठ्या समारोहात समारंभपूर्वक हा सूट विराणींनी मोदीला का दिला नाही?या प्रश्नांची उत्तरे विराणी यांच्या जवळ नाहीत. असो.
विराणींनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केलेला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की या सुटाची जी दहा लाख रुपये किंमत प्रचलित झाली आहे ती फार कमी असून प्रत्यक्षात हा सूट त्यापेक्षा कितीतरी पट महाग आहे. आणि अशा प्रकारची बातमी इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या अंकात १८ फेब्रुवारी २०१५ रोजी छापली आहे. या सर्व टीकेमुळे भाजप व पंतप्रधान मोदी यांची फारच नाचक्की झाली आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये पंतप्रधानांना भेट मिळालेल्या इतर ४५० वस्तूंबरोबर या सुटाचाही लिलाव करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे २० फेब्रुवारी २०१५ ला हा लिलाव झाला व त्यामध्ये सुरतचे लालजी भाई तुलसी भाई पटेल या हिरा व्यापाऱ्याने हा सूट तब्बल ४.३१ कोटी एवढी प्रचंड रक्कम मोजून लिलावात विकत घेतला. लिलावात आलेली सर्व रक्कम नंतर समाजसेवेसाठी दान करण्यात आली व या वादावर तात्पुरता पडदा पडला.
मजेदार प्रश्न असा कि हा सुट १० लाखाचा होता तर तो लालजीभाई पटेल यांनी तो ४.३१ कोटीत विकत कां घेतला? याचा अर्थच हा सुट १० लाखापेक्षा कितीतरी महाग आहे म्हणून लिलावात तो ४.३१ कोटीत विकला गेला. खरेतर सुटाच्या महाग किंमतीबाबत तशी कबुली रमेशभाई विराणी यांनी आधीच दिली आहे. सध्या हा सुट आणि त्यासोबत उरलेले ७०-८० मीटर कापड कुठे आहे याचा मात्र मागमूस लागू शकला नाही.
मोदींचा सूट आणि व्हेंटीलेटर्स
२०१५ साली मोदींच्या सुटाच्या किमतीचा वाद लालजीभाई पटेल यांनी मिटवला असला तरी २०२० आली हा वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला. यावेळी पंतप्रधान मोदींच्या ‘पीएम केअर फंडाने’ राजकोटच्या ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड नावाच्या कंपनीला ५०,००० कोरोना व्हेंटिलेटर पुरवण्याचा आदेश दिला. हा संपूर्ण ऑर्डर २००० कोटी रुपयांचा होता. खरे तर या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून व्हेंटिलेटर बनवण्याबद्दलचा कुठलाही परवाना जारी केला गेलेला नव्हता तरी हा ऑर्डर दिला गेला होता. असो.
यापेक्षा गंभीर बाब म्हणजे ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जरी पराक्रमसिंह जाडेजा यांची कंपनी असली तरी त्यामध्ये मोदींना सुट भेट देणाऱ्या रमेश कुमार विराणींचे दोन चिरंजीव अनिल आणि किशोर विराणी हे ४७ टक्के भागीदार होते. २०१५ सारखाच पुन्हा विवाद उत्पन्न होऊ नये म्हणून अनिल आणि किशोर विराणी यांनी नंतर आपला समभागांचा हिस्सा दुसऱ्या कुठल्यातरी कंपनीला विकून टाकला होता, असेही चौकशीत समोर आले आहे.
म्हणजे रमेश कुमार विराणी मोदींना सूट भेट देणार आणि त्यानंतर पाच वर्षांनी त्यांचीच मुले प्रमुख भागीदार असलेल्या कंपनीला ५०,००० व्हेंटिलेटर चा २००० कोटींचा ऑर्डर मिळणार, हे काय गौडबंगाल आहे ते मोदी आणि विराणी हेच जाणोत. असो.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा सुट मोदी यांना रमेश कुमार विराणी यांनी स्वेच्छेने भेट दिलेला नव्हता तर २०१४ साली सत्तेमध्ये आल्यानंतर मोदी यांनीच विराणी यांच्याकडे अशा प्रकारच्या सोन्याच्या धागयांनी विणलेल्या नावाच्या बी-स्पोक/ मोनोग्राम्ड सुटा बद्दल मागणी केली होती, असेही उघडकिस आले आहे.
विकृत लोक घालतात बीस्पोक/मोनोग्राम्ड सुट
सर्वात शेवटी बी-स्पोक/ मोनोग्राम्ड सुट आजवर कोणी वापरले आहेत याबद्दल चौकशी केली असता असे कळले की स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास असलेले व स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणारी व हुकूमशाही प्रवृत्ती असलेली विकृत मंडळी अशा प्रकारचे सुट स्वतःच्या खोट्या मोठेपणाकरता वापरत असतात. आजवर इजिप्तचे हुकूमशहा पंतप्रधान होस्नी मुबारक, अर्जेंटिनाचे हुकूमशहा पंतप्रधान कार्लोस मेनेम, आणि बॉक्सर इव्हानडोर हॉलिफिल्ड यांनी असे सुट वापरलेले आहेत. या विकृत लोकांच्या यादीमध्ये २६ जानेवारी २०१५ पासून भारताच्या पंतप्रधानांचे नाव सुद्धा जोडल्या गेले आहे, हे भारतीय नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
सोपान पांढरीपांडे
(C)sopanppande@gmail.com
(लेखक जेष्ठ पत्रकार असून रामनाथ गोयनका राष्ट्रीय शोध पत्रकारिता पुरस्कार विजेते आहेत.)
फोन९१-९८५०३०४००५
228 Total Likes and Views