११ ऑक्टोबर. बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन याचा ८० वा वाढदिवस. ह्या वयात बहुतेक लोक खाट पकडतात. सारे संपले म्हणत अस्वस्थ होतात. पण अमिताभ ह्या वयातही सक्रीय आहे, फिट आहे आणि हेल्दी आहे. त्याला हे कसे जमते? काय खातो तो? अमिताभ काही वेगळे खात नाही. म्हातारपणी येणारे बहुतेक आजार त्यालाही आहेत. मध्यंतरी त्याला टीबी, लिव्हर सिरोसीस झाला होता. आपलं लिव्हर फक्त २५ टक्के काम करतंय असे खुद्द त्यानेच मागे सांगितले होते. साऱ्या आजारांवर त्याने मात केली. कसे जमले? त्याने काही वेगळे केले नाही. तुम्ही करता तेच त्याने केले. फक्त सांभाळून केले. त्यामुळे त्याला रिझल्ट मिळाले.
अमिताभ सकाळी ५ च्या ठोक्याला उठतो. २० मिनिटे वॉक करतो. तो चहा-कॉफी काहीही घेत नाही. नाश्त्याला अंडाभुर्जी आणि दूध घेतो. मध्ये भूक लागली तर नारळपाणी, आवळा रस घेतो. तुळशीची पाने खातो. खजूर, अक्रोड त्याला आवडतो. २२ वर्षापूर्वी त्याने मांसाहार सोडला. आता पूर्ण शाकाहारी आहे. आपण खातो तसे पोळीभाजी-वरण तोही खातो. रात्री सूप घेतो. हलकं जेवतो.
‘हम जहा खडे होते है, लाईन वही से सुरु होती है’ असा अमिताभचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. पण त्याने यश सहजासहजी कमावलेले नाही. मेहनत आहे. तो अलाहाबादहून मुंबईत हिरो व्हायला आला. पण लंबू म्हणून त्याला कोणी काम देईना. शेवटी त्याने रेडीयोमध्ये काम करायचे ठरवले. पण तिथेही तुमचा आवाज जड आहे असे सांगण्यात आले. गंमत पहा. रेडियोने नापास ठरवला त्याच आवाजाच्या जोरावर अमिताभने पुढे कोट्यवधी रुपये छापले. सुरुवातीला त्याला सिनेमात लहानसहान रोल मिळाले. ‘जंजीर’ सिनेमाने त्याला मोठा ब्रेक दिला आणि मग अमिताभने मागे वळून पाहिले नाही. १९८०-१९९० ह्या दशकात तो राजा होता. ४० वर्षात १८० सिनेमे केले. त्याचे सिनेमे हाउसफुल चालत. पण तुम्हाला सांगतो. अमिताभने जेवढा संघर्ष केला तेवढा क्वचितच कोणी केला असेल. सारे सुरळीत चालू असताना १९९९ मध्ये त्याचे दिवाळे निघाले. पैसे नसल्याने मुलाला म्हणजे अभिषेकला कॉलेजचे शिक्षण सोडावे लागले. संकट येतात तशी संधीही येते. ती साधावी लागते. ह्याच सुमाराला अमिताभला ‘कौन बनेगा करोडपती’चे काम मिळाले. अमिताभचे अच्छे दिन पुन्हा परतले. आज त्याची साडे तीन हजार कोटी रुपयाची प्रॉंपर्टी आहे. वर्षाला ६० कोटी रुपये कमावतो. ह्या वयातही त्याच्या हातात चार सिनेमे आहेत. मुंबईत त्याचे चार बंगले आहेत. त्याच्याकडे ११ लक्झरी कार आहेत. त्याचे स्वतःचे जेट विमान आहे. टीव्हीवर जाहिरातीत काम करतो. त्याचेही त्याला रग्गड पैसे मिळतात. एक जाहिरात मोहिमेचे तो ५ ते ६ कोटी रुपये घेतो.
हिरो म्हटला म्हणजे लफडी आलीच. रेखासोबत अमिताभच्या भानगडीची त्या ज्कालात जोरदार चर्चा चालली. पण त्याची बायको जयाने दम दिला. रेखासोबत सिनेमा करायचा नाही असे बजावले तेव्हा अमिताभनेही नाद सोडला आणि संसारात लक्ष घातले. त्याला मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता आहे. ऐश्वर्या राय ह्या सारखी देखणी सून आहे. मुख्य म्हणजे करोडो चाहते-भक्त आहेत. कोलकात्यात अमिताभचे मंदिर आहे. तिथे रोज अमिताभच्या मूर्तीची पूजा, आरती होते. अमिताभ लोकसभेवर निवडून गेला होता. पण हे किती लोकांना आठवते? ‘खाय के पान बनारसवाला’ अमिताभच आठवतो. अमिताभ हा अमिताभ आहे. आचार्य अत्र्यांच्या भाषेत सांगायचे हजार वर्षे असा अमिताभ होणार नाही. तुम्हाला काय वाटते?
158 Total Likes and Views