मुख्यमंत्रीजी, न्यायालयाने का फटकारले?

News
Spread the love

चिंतन करण्याची गरज आहे….

प्रिय एकनाथ महाराज,
आज हे मनापासून लिहीत आहे. तुम्हाला योग्य वाटले तर वाचा, विचार करा… सध्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल थोडे चिंतनही करा. त्याची गरज आहे. तुमच्या हातातील हुकूमाचे पत्ते तुमच्या कामाला येत आहेत, असे वाटत नाही. तुमचे राजकीय सल्लागार कोण? याचाही एकदा विचार करा. प्रथम दोन निर्णयांबद्दल लिहितो… दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कची परवानगी  उच्च न्यायालयाकडून शिवसेनेला मिळाली. महापालिकेने परवानगी अडवून ठेवली.  अनेक कारणे दिली. लोकांना यातील प्रत्येक गोष्ट कळते आहे. कोण अडवते… का अडवते…. कशामुळे अडवते… तुम्ही त्यावेळी मनाचा मोठेपणा दाखवून सांगितले असते… ‘आज काही मतभेद झाले असले तरी ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर होतो आहे. शिवसेनेच्या मेळाव्यालाच परवानगी दिली पाहिजे,’ हे तुम्ही म्हटला असतात, तर तुम्ही आणखीन मोठे झाला असतात. मुख्यमंत्रीपद मोठे आहेच… त्या पदाला अिधकारही आहेत. पण, सत्तेवर बसलेल्या नेत्याच्या प्रत्येक निर्णयात त्या अिधकाराचा वापर कसा होतोय, यावर त्याची प्रतिमा बनत असते. तुम्ही मिळालेली संधी घालवलीत. राजकारणात तुम्ही कोणत्या पदावर आहात, यापेक्षा त्या पदावरचे तुमचे निर्णय राजकारणाच्या पलिकडचे आहेत, असे लोकांना वाटले पाहिजे. तुमच्या दोन्ही निर्णयांत तुम्हाला माघार घ्यावी लागली. पहिला निर्णय शिवाजीपार्कच्या मेळाव्याच्या परवानगीबद्दल. दुसरा निर्णय महापालिकेच्या आयुक्तांकडून श्रीमती ऋतुजा लटके यांचा राजीनामा जाणीवपूर्वक लटकवून ठेवण्यात आला. उच्च न्यायालयाने सालटी काढली तेव्हा महापालिकेला दु:खद अंत:करणाने राजीनामा मंजूर करावा लागला. महापालिका आयुक्तांची यापेक्षा काही ‘शोभा’ व्हायची शिल्लक राहिलेली नाही. तुम्ही स्वत:हून म्हटला असतात की, ‘एक मिनीटांत राजीनामा मंजूर होईल, मीच आदेश देतो..’ राजकारणात जेव्हा विरोध करायचा आहे तेव्हा विरोध करा. पण, हातातल्या अधिकाराचा असा गैरवापर तुम्हाला अडचणीचा ठरणार आहे. मुख्यमंत्री पदावर जे असतात ते वरच्या पायंडीवर असतात. त्यांनी छोट्या-छोट्या विषयांत खालच्या पायंडीवर उतरायचे नसते. उलट खालच्या पायंडीवर असलेल्याला वरच्या पायंडीवर घेण्याचा प्रय्ात्न करायचा. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा आहे. तुम्हाला ती कोणाकडूनतरी समजून घ्यावी लागेल.  एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही जागेवर कोणीही कायम असत नाही. बदल अपरिहार्य असतो. ज्यावेळात आपण अधिकारावर असतो, त्या वेळेत आपले निर्णय लोकशाहीला पूरक, न्यायात पक्षपात न करणारे, आणि मोकळ्या मनाचे असायला हवेत. अजून या देशातील न्यायालये निर्भिड आहेत आणि स्वतंत्रही आहेत.  न्यायालयांचा अजून ‘चहल’ झालेला नाही. या दोन्ही प्रकरणात महापालिका सोलून निघाली. ते बिचारे आयुक्त चहल तरी काय करणार? एक दिवशी ते सांगून टाकतील…. ‘मी हुकूमाचा ताबेदार आहे…’ मग कोणाची फजिती होईल? महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ करण्याला तुमच्या मनात जे निर्णय होते, ते वातावरण गढूळ करायला ते कारण ठरत आहेत. शब्दाने शब्द वाढतो. दोन पक्ष वेगळे झालेत ना… मग लोकशाहीची व्यवस्था मान्य करून निवडणूक होऊ द्या. मतदार निर्णय करतील.  त्यांना कोणी गृहित धरू नये.  अंधेरी पोटनिवडणुकीत अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. उच्च न्यायालयाचे ताशेरे असे झणझणीत आहेत की, ते महापालिकेकरिता नाहीत. विद्यमान राज्यकर्त्यांसाठीच आहेत. तुम्ही अशावेळी चर्चा करता की नाही? ही वेळ का आली, याचे चिंतन करा. मग तुमच्या लक्षात येईल, कोणाचातरी चुकीचा सल्ला तुम्ही ऐकला म्हणा, किंवा तुमचे निर्णय चुकताहेत असे म्हणा… जे काही चालले आहे ते महाराष्ट्राचे सरकार म्हणून शोभादायक नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. मूळ शिवसेनेशी तुमचे मतभेद झाले… पण, तुमचे व्यक्तीमत्त्व त्या मूळ शिवसेनेमुळेच प्रस्थापित झाले, हे तुम्ही अमान्य कसे करू शकाल? वाई तालुक्यातून जीवनसंघर्ष करण्यासाठी तुम्ही कुटुंबासह ठाण्यात आलात. ठाणे महापालिकेचे नगरसेवक झालात… १९९७ साली झालात… २००२ झालात… दोनदा नगरसेवक झालात ते शिवसेनेमुळेच. २००१ ला महापालिका सभागृहाचे नेते झालात. २००४ ते २०१९ ठाण्यातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलात. ज्याला ‘राजकीय करिअर’ म्हणतात ती ठाण्यात घडली.  शिवसेनेचे म्हणून घडली. आता तुम्ही वेगळे झालात…. हा विषय काही वेळ बाजूला ठेवा. पण ज्या शिडीने चढून आलात, ती शिडी शिवसेनेचीच होती. हे मान्य करा… न करा…. लोक याच भावनेने तुमच्याकडे पाहत आहेत. त्यामुळे राजकारण एकेरिवर न आणता, लोकशाहीचे संदर्भ आणि लोकशाहीचे मार्ग याला शोभेल असेच निर्णय व्हायला पाहिजेत. तुमच्या निर्णयात भाजपावाल्यांचा हस्तक्षेप असेल तर, तो तुम्ही सहन करतात, असाही त्याचा अर्थ होईल आणि म्हणून महाराष्ट्र कसा होता, हे समजून घ्या.
एवढा मोठा संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष झाला… सगळा विरोध झेलून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला कुठेही कमीपणा येईल, असे त्यांच्या हातून कधी झाले नाही. त्यावेळच्या विरोधी पक्षाने काँग्रेस नेत्यांना िफरणे मुश्कील केले होते. पण, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर या महान लढाईत हुतात्मा झालेल्यांचे स्मारक करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी पुढाकार घेतला. स्मारक समितीला मदत केली. एक लाख रुपये त्या काळात जमा करून दिले. स्वत:ची ५०० रुपयांची देणगी हुतात्मा स्मारकासाठी देवून त्याची पावती घेतली. विरोधी पक्ष सभागृहात विरोधात असतो. सभागृहाची बैठक संपली की तो लोकशाहीचा मित्र असतो. असे पूर्वीचे महाराष्ट्राचे वातावरण कोणत्याही परिस्थितीत बिघडू देवू नका.  निवडणुका येतील, जातील… मतभेद आज आहेत… ते उद्या राहणार नाहीत…. तुम्ही ढीग म्हणालात की, आघाडीचे सरकार मला मान्य नव्हते…. पण मंत्रीपद नाकारून पहिल्याच दिवशी तुम्ही ते बोलला असतात तर तुमची भूमिका तात्विक आहे, असे म्हणता आले असते. सगळ्या गोष्टी मनात ठेवून तुम्ही वेळ शोधत राहिलात… तुमचे नशिब तुमच्या बरोबर आहे… तुम्हाला संधी मिळाली. ठीक आहे…. त्या संधीनंतर असे चुकीचे निर्णय का होत आहेत?
केंद्र सरकार अशा अनेक मुद्यांवर चुकीचे निर्णय करून त्यांच्या प्रतिमेलाही गेल्या दोन वर्षांत किती तडे गेले…. पंजाबमध्ये भाजपाचा का पराभव झाला? त्या पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला चिरडण्याकरिता लोखंडाचे खिळे ठोकून पत्रे रस्त्यावर अंथरले. शेवटी काय झाले… ? दोन्ही विधेयके मागे घ्यावीच लागली.  काय शोभा राहीली? स्वत: पंतप्रधान आणि गृहमंत्री पंजाबमध्ये निवडणुकीत उतरले होते. काँग्रेस नेत्यांच्या मूर्ख निर्णयामुळे विदुषकाला  (सिद्धू) त्यांनी जवळ केले आणि राज्यातील सत्ता घालवली. पण तरीही भाजपाला यश मिळाले नाही. बंगालमध्ये किती ताकद लावली होती… पण त्या वाघिणीने पंजेफाड केली. आजही मोदींचा म्हणवणारा गुजरात १०० टक्के भाजपाबरोबर आहे का? एक चुकीचा निर्णय त्या त्या राजकीय पक्षाला मागे घेवून जातो. एक विचारी निर्णय प्रतिमा आणि वातावरण बदलत असतो. २०१९ च्या निवडणुकीत साताऱ्यात पवारसाहेबांच्या सभेत जोरदार पाऊस झाला… पाऊस अंगावर झेलून या वयात पवारसाहेब हिंमतीने बोलत राहिले. एका कृतीने काय फरक झाला पहा…. राजकारण हे निसरडे आहे…. सत्तेचे दोन्ही खांब हातात धरल्यानंतरसुद्धा घसरून पडायला होते, हे लक्षात ठेवा.
आणखीन एक गोष्टी आपल्याला सांगितली पाहिजे… राजकारणात रेटून बोलावे लागते हे मान्य आहे… पण, सत्ताधाऱ्यांनी कुठपर्यंत बोलायचे… लोकशाही आणि घटना मान्य केलेला हा देश आहे. सत्ताधाऱ्यांचाच अध्यक्ष जाहीरपणे सांगतो की, या देशात औषधाला विरोधीपक्ष राहणार नाही. अमित शहा सांगतात, शिवसेनेला भुईसपाट करू… करा… पण मतदारांनी केल्यांनतर ते बोला… आधी कशाला बोलता… शिवाय हे ठरवणारे मतदार आहेत. तुम्ही नाही. मतदाराला गृहित धरून बोलू नका. सर्व वेळी सत्ता कामाला येत नाही.
अाज भाजपाच्या हातात दक्षिणेतील किती राज्ये आहेत? कर्नाटक राज्य आमदार फोडूनच मिळवले ना….  मध्य प्रदेशचे राज्य आमदार फोडून मिळवले. महाराष्ट्रात तुमचे जे राज्य आले, त्याला अजून लोकमान्यता मिळायची आहे. आमदारांची फोडाफोड करून अशी सरकारे टिकावू नसतात, असे अनेक दाखले देता येतील. जिथं भाजपाला बहुमत मिळत नाही तिथं भाजपाचे राजकारण फोडाफोडीवर अवलंबून आहे. अाजची फोडाफोडी मोठ्या काही तात्विक भूमिकेने होतेय, असे समजू नका. ती कशी होतेय लोकांना माहिती आहे. त्यासाठी ‘महात्मा गांधींचे फोटो’ किती कामाला येतात हे ही लोकांना माहिती आहे. भाजपामध्येसुद्धा एक दिवस याचा स्फोट होईल.  भाजपाचे जे निष्ठावंत पक्षाला शून्यातून उभा करण्याकरिता जिवाचे रान करून झिजलेले आहेत, त्यांना विचारतो कोण? मग विखे-पाटील यांच्यासारख्यांचे फावते. १९९५च्या युतीमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री…. मग परत काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते…. नंतर भाजपा…. आता महसूलमंत्री…. भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्ते हे फार दिवस सहन करतील, असे समजू नका. आजही ठाण्याचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांना बाजूला फेकलेच ना… त्यांना सत्तेची संधी मिळणारच नाही. असे का? कारण फडणवीस म्हणतात, ते घरचेच आहेत. जाणार कुठं? फडणवीसांचे राजकारण फोडाफोडीचे राजकार आहे. ते दिखावू आहे…. टिकावू तर अिजबात नाही…. आमचा माधव भंडारी पक्षासाठी मर-मर मरतो. कोण विचारतोय त्यांना? धुळ्याचा भाजपाचा लखन भतवाल खूप चांगला मित्र. भाजपामध्येही खूप चांगले लोक होते… काही अजून आहेत…  वाजपेयींची  तर गोष्टच सोडा…. जे भाजपाचे नाहीत त्यांचेही अत्यंत प्रिय नेते वाजपेयीजी होते. मनाने मोकळे होते. विरोधकांबद्दल कठोर टीका करायचे…. पण, दृष्टपणा नव्हता. बघून घेऊ…. संपवून टाकू…. ही भाषा नव्हती.. अवघ्या एका मताने त्यांचे सरकार पडले… ते पडू नये म्हणून प्रमोद महाजन त्यावेळी शे. का. प.क्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या (पण शे. का. पक्षाला मान्यता नसल्यामुळे) ‘अपक्ष’ ठरलेल्या, रामशेठ ठाकूर या खासदारांना घेवून वाजपेयी यांच्याकडे गेले. प्रमोद महाजन यांनी त्यांना मंत्रीपद कबूल केले होते. पुढच्या निवडणुकीत भाजपा तुम्हालाच उमेदवारी देईल, हे ही कबूल केले होते. वाजपेयींच्या भेटीला रामशेठ ठाकूर गेल्यावर मोकळ्या मनाने वाजपेयी म्हणाले, ‘आईए, ठाकूरसाब…. मेरी सरकार रामभरोसे है…’ रामशेठ ठाकूर यांनी आपले मत सरकारच्या बाजूने देण्याची असमर्थता व्यक्त केली. काय म्हणावेत वाजपेयी…. ‘मैं आपकी कदर करता हूँ…’ राजकारणात अशा उंचीची माणसं होती. अशी अनेक उदाहरणे आहेत. हातातील सत्तेचा बेगुमान वापर करून जे राज्यकर्ते ‘आपण हवं ते करू शकतो’ असे मानतात ते तोंडावर आपटतात. काय पत्करायचे…. काय स्वीकारायचे… काय अंमलात आणायचे…. हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर आहे.
तुम्हाला मनापासून सांगतो. पटलं तर बघा…. सध्या तुम्ही सत्तेवर असल्यामुळे तुम्हाला पटणार नाही… पण, ६३ वर्षे राजकारण पाहतोय…. लिहितोय…. अनेक विषयांत जे लिहिलं तसंच घडलंय… उद्धवसाहेबांचे सरकार पडण्यापूर्वी मी याच जागेवर लिहिले होते…. ते परत सांगत बसत नाही… पण, तुमच्याकरिता हे लक्षात ठेवा… २०२४ च्या निवडणुकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्री करण्याकरिता देवेंद्र फडणवीस दुय्यम भूमिका घेवून आता उपमुख्यमंत्री झालेले नाहीत. पुढचा सगळा आराखडा भाजपाच्या कोअर कमिटीत ठरलेला आहे. मुंबई महापािलका निवडणुकीपुरते तुम्हाला वापरायचे आहे. शिवसेनेच्या हातून महापालिका काढून घ्यायची आहे. जर तुमचा असा समज असेल की, २०२४ लाही तुमचा राज्याभिषेक होईल, तर राजकारण तुम्हाला समजलेच नाही, असे म्हणावे लागेल. तुमचे निर्णय तुम्ही करा… या घाणेरड्या राजकारणात तुम्हाला भलेपणा मिळणार आहे का? याचाही थोडा हिशेब करा… पदं येतील आणि जातील…. सरकारे येतात आणि जातात. लोक चर्चा करतात आणि लक्षात ठेवतात ते त्या त्या राजकीय नेत्याची सत्तेत असतानाची प्रतिमा. मला असे वाटते की, सर्वांना वाजपेंयीसारखी प्रतिभा असेलच असे नाही. पण प्रतिमा तयार करता येते.  सध्या तुम्ही या सगळ्या विषयांत कमी पडत आहात आणि म्हणून दोन्ही निर्णयांत हायकोर्टाने सणसणीत फटकारून सरकारचे कपडे फाडलेले आहेत. न्यायालये रामशास्त्रीबाणा अजून टिकवून आहेत, हा ही लोकशाहीचा मोठा आधार आहे.
सध्या एवढेच…
                                                                                                                                                                                     – मधुकर भावे

 208 Total Likes and Views

0 Comments

No Comment.