मतांच्या गणितात तत्वांना तिलांजली

Analysis
Spread the love

केजरीवाल सरकारमधील सर्जनशील मंत्री अ‍‍ॅड. राजेंद्र पाल गौतम यांनी राजीनामा दिला. नव्हे, त्यांचा राजीनामा घेण्यात आला. गौतम यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाचा सन्मान करीत कोणत्याही तक्रारीविना पदमुक्त होणे पसंद केले.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञांचे वाचन केल्यावरून त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.  गेल्या सात वर्षांत मिळालेल्या जबाबदारीला उत्तम न्याय देणाऱ्या अ‍‍ॅड. गौतम यांच्यानिमित्ताने एक चांगला मंत्री दिल्लीकरांनी घरी बसवला. केजरीवालांच्या भूमिकेमुळे गौतम यांचे मंत्रिपद गेले असले तरी सामंजस्याची भूमिका घेतल्याने जनमानसात त्यांची उंची प्रचंड वाढली आहे. सोबतच खुजेपणा दाखवत महापुरुषाच्या नावाचा वापर केल्यामुळे केजरीवालांचा ढोंगीपणाही उघड झाला आहे.

अण्णा हजारेंच्या जनआंदोलनात गांधीगिरी करीत राजकारणात प्रवेश करणाऱ्या केजरीवालांमधील सुज्ञ सामाजिक कार्यकर्ता  हा दिल्ली, पंजाब काबीज केल्यानंतर हरवला गेला आहे. आता ते संपूर्ण वेळ राजकारणाच्या नशेत असतात. जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान असलेल्या महापुरुषांचा वापर सत्ताप्राप्तीसाठी करून त्यांना एका जातीत बंदिस्त करण्याची हीन मानसिकता केजरीवालांमध्ये दिसून येते. आठ वर्षांपूर्वी महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या केजरीवालांच्या कोषात गेल्या दोन वर्षांपासून डॉ. आंबेडकर आणि भगतसिंग या दोन महापुरुषांची नोंद झाली आहे. अण्णा हजारेंना ज्याप्रमाणे त्यांनी खड्यासारखे उचलून फेकले तसेच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केले. सरकारी दप्तरातील गांधीजी, राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो काढून तिथे  डॉ. आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावले.  हे फोटो लावल्याने केजरीवाल हे महापुरुषांचा सन्मान करतात म्हणून त्यांचे कौतुकही झाले. परंतु ही बाब केवळ दलित आणि शिखांच्या मतांपुरतीच मर्यादित होती. केजरीवालांमध्ये भगतसिंगांसारखे धाडस कधी दिसले का? डॉ. आंबेडकरांचा फोटो लावला; परंतु त्यांचे किती विचार त्यांनी आत्मसात केलेत. त्यांना फोटो हवा परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञा नकोत. या प्रतिज्ञांचे  पालन आणि वाचन करणाऱ्या मंत्र्याचा बळी घेणारे केजरीवाल हे दलित समुदायासाठी घातक ठरू शकतात हे त्यांच्या कृतीतून दिसून आले.

अ‍‍ॅड. गौतम हे गेल्या २५ वर्षांपासून डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या २२  प्रतिज्ञांचे पालन करतात. वाचन करतात. ज्ञान, शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांनुसार ते जीवन जगतात. नागपूरची दीक्षाभूमी असो की मुंबईची चैत्यभूमी तिथे नित्यनेमाने  जाऊन बाबासाहेबांचे स्मरण करतात; परंतु ते अन्य धर्मीयांचा द्वेष करतात असे नाही. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा आज्ञा नाहीत. त्या आवाहन स्वरूपातील सूचनांसारख्या आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची यातून कठोर ताकीद दिली जात नाही. मात्र, यावेळी गौतम यांचे प्रतिज्ञा वाचन भाजपवाल्यांना आवडले नाही. हिंदुद्वेष आणि त्यांच्या देवदेवतांना अपमान करण्याच्या बाबी प्रतिज्ञेत असल्याचे भाजपला गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. हिंदू धर्माचा त्याग करताना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीत डॉ. आंबेडकरांनी बौद्धांना २२ प्रतिज्ञा सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने  ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.  गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.  श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.  समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन आदींचा त्यात समावेश आहे. केजरीवालांनी  डॉ. आंबेडकर  स्वीकारले; मात्र मतांवर परिणाम होईल म्हणून त्यांना बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा नकोत. याला विरोधाभास म्हणजे ते हनुमानाच्या मंदिरात जातात आणि हनुमान चालिसाचे पठण करतात. दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्ताने लाखो बौद्ध  एकत्रित येतात. दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारावरच २२ प्रतिज्ञा ठळकपणे लिहिल्या आहेत. तिथे  प्रतिज्ञांचे  वाचन होते. अ‍‍ॅड. गौतम यांनी  प्रतिज्ञा वाचल्या म्हणून हिंदू देवतांचा अपमान झाला, असे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तांडव केले.  राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्या घरापुढे शक्तिप्रदर्शन केले. शेवटी केजरीवालही भाजपपुढे नतमस्तक झालेत. विशेष असे की, दरवर्षी नागपूरला होणाऱ्या या कार्यक्रमात भाजपचे दिग्गज नेते हजेरी लावतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असोत की देवेंद्र फडणवीस, हे प्रामुख्याने दिसतात. तेव्हा भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला या नेत्यांचा निषेध करावासा वाटला नाही. त्यांचा राजीनामा मागावासा वाटला नाही.

संविधानाने प्रत्येकाला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धेचे स्वातंत्र्य दिले आहे. संविधानाचा मूलभूत अधिकार हा धर्म स्वातंत्र्याचा आहे. त्यामुळे ज्याला योग्य वाटतो तो धर्म स्वीकारण्याचा आणि त्याची उपासना करण्याचा अधिकार आहे. संविधानाची शपथ घेऊनच मंत्र्यांना काम करावे लागते.  मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे सत्तेत असलेल्या लोकांचे काम आहे. त्यांना त्याचे उल्लंघन करता येत नाही. केजरीवालांनी मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी  अ‍‍ॅड. गौतम यांचे रक्षण करणे अभिप्रेत होते; परंतु तसे झाले नाही.  प्रत्येक धर्माचे लोक त्यांचा विचार मांडतात. हरिद्वारात साधू काय बरळलेत ते सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांच्या विषाक्त वक्तव्यावर मात्र भाष्य करायचे नाही !  लोकांना अद्याप संविधानाची ताकद माहिती झालेली नाही. दलित नेत्यांनीही बाबासाहेबांचा केवळ राजकारणासाठीच वापर केला. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काय झाले? प्रतिज्ञा वाचली म्हणून गौतम यांना पद गमवावे लागले.  तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. अ‍‍ॅड. प्रकाश आंबेडकर असो की प्रा. जोगेंद्र कवाडे या नेत्यांचा स्वाभिमान कुठे जातो? सत्तेत येण्यासाठी समुदायाचा वापर करीत लाचारी पत्करणारे हे नेते आहेत. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जगन्नाथ पुरीच्या मंदिरात प्रवेश दिला नाही. तेव्हा सगळ्यांच्याच तोंडावर बोट होते.

केंद्रात मोदींचा उदय झाल्यापासून निवडणूक कशी जिंकायची हीच भूमिका भाजपची राहिली आहे. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत अशी भूमिका ते रोखठोकपणे मांडतात. त्यामुळे हिंदूंचा  मोठा वर्ग भाजपसोबत आहे; परंतु अन्य पक्षांना स्वत:ला दलित, पीडित, कष्टकरी या मोठ्या समुदायाचे आश्रयदाते आहोत असे सांगून शेवटी हिंदुत्वाकडेच वळावे लागते; याशिवाय आपण राजकारणात तरणार नाही याची त्यांना खात्री असते. मध्यंतरी काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा प्रयोग केला; परंतु राहुल गांधी यांना गळ्यातील जानवे दाखवावे लागले. सोनिया आणि प्रियंका गांधी यांना यज्ञ करावा लागतो. ममता बॅनर्जी यांना चंडीपाठ म्हणावा लागतो, लालूप्रसाद यादव संघाला कितीही शिव्या देत असले तरी त्यांना छटपूजेमध्ये ५० वेळा डुबकी मारावी लागते. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, असे म्हणून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वच सांगावे लागते. बाबासाहेबांचे नाव घेत कांशीराम यांच्या नेतृत्वात दलितांच्या मतांवर मायावती चार वेळा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्यात; परंतु या दोघांनीही बौद्ध धर्माचा स्वीकार केला नाही. त्यांचे धर्मांतर केवळ घोषणेतच बंदिस्त होते. पंजाबमध्ये सर्वाधिक ३२ टक्के दलित आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आहेत. या राज्यांत दूरपर्यंत आंबेडकरांचा पुतळा दिसत नाही. इथे ‘जय-भीम’ने नमस्कार-चमत्कारही होत नाहीत. केजरीवालांच्या कृतीने देशातील लोकांना मान्य करावे लागेल की, ह्या सगळ्या घडामोडी केवळ राजकीय नफ्या-तोट्याच्या ठरतात. आम्हीही हिंदू आहोत; परंतु तुमच्यासारखे हिंदू नाहीत हा नवीनच प्रकार अलीकडे उदयास आला आहे. संघ-भाजपच्या हिंदुत्वाच्या नीतीपुढे सर्वच पक्ष एकाच सुरात गाऊ लागले आहेत. आम्ही तुमचेच आहोत हे सांगण्याचे सोंग करून लाजतबुजत का होईना हिंदुत्वाचा खरा चेहरा दाखवावा लागतो. केजरीवालही त्यातले एक. सब घोडे बारा टक्के ! बळी मात्र निष्ठेने काम करणाऱ्या अ‍‍ॅड. राजेंद्र पाल गौतम यांच्यासारख्या मंत्र्याचा जातो. जात राहील.

©️विकास झाडे

 414 Total Likes and Views

0 Comments

No Comment.