राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकरणात देशमुख ११ महिन्यापासून तर राऊत अडीच महिन्यापासून तुरुंगात आहेत. १०० कोटी रुपयाच्या खंडणी वसुली प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात हायकोर्टाने गेल्या आठवड्यात देशमुखांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे देशमुख यंदाची दिवाळी आपल्या घरी साजरी करतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. पण याच प्रकरणात सीबीआय कोर्टाने देशमुखांना जामीन देण्यास नकार देताना त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. खासगी रुग्णालयात उपचार करायला मिळावेत, अशी मागणी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १५ दिवसांनी वाढला आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तिवाद करायचा आहे, असं कोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत कोर्टाने २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. मुंबईतला पत्रा चाळ घोटाळा १०३९ कोटी रुपयाचा असल्याचा आरोप आहे. सुरुवातीपासूनच राऊतांचा या घोटाळ्याशी कसलाही संबंध नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला आहे. मात्र राऊत हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कसे आहेत, हे ईडीचे वकिल कोर्टाला पटवून देऊ पाहत आहेत. ७ सप्टेंबर रोजी राऊतांनी विशेष पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज केला तेव्हापासून कोर्टाची तारीख पे तारीख सुरु आहे.
124 Total Likes and Views