अखेर कॉन्ग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला. तब्बल २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाबाहेरील कोणी कॉन्ग्रेसचा अध्यक्ष झाला आहे. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत ८० वर्षे वयाचे ज्येष्ठ नेते कर्नाटकचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी केरळमधले खासदार शशी थरूर यांचा ६ हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. गांधी घराण्याचे उमेदवार म्हणून खर्गे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. खर्गे हे खूप लोकप्रिय नेते नाहीत. पण सांगकामे आहेत. ९ वेळा आमदार राहिले. २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकले होते. पण २०१९ ची निवडणूक हरले तेव्हा २०२० मध्ये त्यांना राज्यसभेत आणले गेले. मुळचे कामगार नेते. १९६९ मध्ये कॉन्ग्रेसमध्ये आले. तेव्हापासून म्हणजे गेली ३३ वर्षे कॉन्ग्रेसमध्ये आहेत. गांधी घराण्याशी निष्ठावंत एवढीच त्यांची पुण्याई. केवळ दलित नेते म्हणून त्यांचे मूल्यमापन करणे त्यांच्यावर अन्यायकारक होईल. तळागाळाशी नाळ जुळलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा कॉन्ग्रेसला काय फायदा होईल?, त्यांचे वय त्यांना किती साथ देते? ते पहायचे. ‘माझी भूमिका आता काय असेल ते खर्गे निश्चित करतील’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? गांधी कुटुंबांची मोनोपली संपली असे मानायचे की गांधी कुटुंबाचा रिमोट कंट्रोल चालूच राहील? कॉन्ग्रेसवाले त्यांना मोकळेपणाने काम करू देतील की चुगल्या करतील? कॉन्ग्रेसचे मूळ दुखणे राहुल गांधी आहे. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या हातात पक्ष जात नाही तोपर्यंत काही खरे नाही. तब्बल अडीच वर्षे कॉन्ग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. सोनिया गांधी पार्ट टाईम काम पहायच्या. आता खर्गे आले. म्हणजे नक्की काय बदलले? काय बदलणार? खर्गे पक्षात जोश फुंकू शकतील? कॉन्ग्रेसचा अध्यक्ष बदलला. पण मालक बदलला काय?
कॉन्ग्रेसचे सध्या वाईट दिवस सुरु आहेत. फक्त दोन राज्यात कॉन्ग्रेसची सत्ता आहे. २०२४ ची निवडणूक तोंडावर आहे. २०२४ पर्यंत म्हणजे अवघ्या दीड वर्षात १८ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा हवेत कॉन्ग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या तेव्हा गांधी कुटुंब गंभीर आहे असेच साऱ्यांना वाटले. पण हे सारे नाटक होते असे आता बाहेर येऊ लागले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आधी हायकमांडचे अध्यक्षपदाचे उमेदवार होते. गेहलोत यांना अध्यक्ष करायचे आणि त्या जागी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायचे असा राहुल गांधी यांचा गेम होता. धूर्त गेहलोत यांच्या तो लक्षात आला तेव्हा राजस्थानच्या गेहलोतसमर्थक आमदारांनी बंड पुकारले. गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सापमुंगसाचे वैर आहे. गेहलोत झुकायला तयार नाही हे लक्षात येताच सोनिया गांधींनी अचानक खर्गे यांना मैदानात आणले. कसेही करून निवडणूक झाली हे गांधी कुटुंबाला देशाला दाखवायचे होते. त्यासाठी शशी थरूर यांना उभे राहायला सांगण्यात आले. सारे फिक्सिंग होते. हजार मतं मिळणार असती तर थरूरच काय कोणीही कशाला फजिती करून घेतली असती? पण हे सारे फिक्सिंग होते. कार्यकर्तेच तशी कुजबुज करताहेत. कॉन्ग्रेसचा अध्यक्ष हा पंतप्रधानपदाचा उमेदवार असतो. मग खर्गे यांना गांधी कुटुंब तसे ‘प्रोजेक्ट’ करील का? तसे करायचे तर मग ‘युवराज’ राहुलबाबाचे काय? पक्ष आता खर्गे यांना फोकस करणार की राहुलबाबाला? पक्षाचे निर्णय आता खर्गे करणार की गांधी कुटुंब? कार्यकर्त्यांनी कोणाकडे जायचे? खर्गे, सोनिया, राहुल की प्रियांका ? अध्यक्ष ह्या नात्याने खर्गे स्वतःहून निर्णय करायला लागले तर ‘राहुल ब्रिगेड’ ची काय भूमिका असेल? हे प्रश्न यासाठी की, ह्या आधीचा इतिहास खुनशी आहे.
नव्वदीच्या दशकात पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी हे दोन ‘गांधी नसलेले’ अध्यक्ष कॉन्ग्रेसने पहिले. दोघेही गांधी घराण्याचे निष्ठावंत होते. राजीव गांधी यांच्या हत्येनन्तर जवळचे म्हणून नरसिंहराव यांचे नाव ओक्के झाले. पण पुढे रावसाहेबांनी स्वतःच्या मताने देश आणि पक्ष चालवू पाहिला तेव्हा पक्षातूनच त्यांना घेरले गेले. नरसिंहराव यांचे निधन दिल्लीत झाले. पण त्यांचे पार्थिव पक्ष मुख्यालयात येऊ दिले गेले नाही. त्यांच्या जागी आलेले सीताराम केसरी यांना तर अतिशय अपमानास्पद पद्धतीने घालवण्यात आले. राव म्हणा किंवा केसरी म्हणा, ह्या दोघांचा एकच गुन्हा होता? त्यांच्यात महत्वाकांक्षा उसळी मारू लागली होती. प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. सारेच ‘मनमोहन सिंग’ नसतात. खर्गे सोनियांचे ‘हनुमान’ आहेत तो पर्यंत ठीक आहे. उद्या त्यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्नं पडू लागली तर? सोनियांना हीच भीती आहे. त्यांना मुलाला दिल्लीच्या तख्तावर बसलेले पहायचे आहे. पक्षाचे अध्यक्षपद फार काळ घराबाहेर ठेवले तर पुन्हा एखादा ‘नरसिंहराव’ जन्माला येणारच नाही याचा भरवसा? त्यामुळे सोनियाजी २०२४ च्या आधी राहुलबाबाला अध्यक्षपद घ्यायला लावतील अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण गांधी घराणे सत्तेशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला आठवत असेल. मनमोहन सिंग सरकारने काढलेला एक अध्यादेश राहुल गांधींनी सर्वांसमोर फाडून टाकला होता. कुठलाही अधिकार नसताना राहुलबाबा ही हिंमत करू शकले. कारण त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल होता. गेल्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानन्तर राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडले. पण पडद्याआडून सारे निर्णय तेच करीत होते. गेहलोत किंवा खर्गे यांच्याकडे पक्ष द्यायचा होता तर राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा कशासाठी करताहेत? सारे मार्केटिंग राहुलबाबाचे सुरु आहे तर नवा अध्यक्ष निवडणुकीचे नाटक कशासाठी? केवळ कागदोपत्री, रेकोर्ड्साठी? सारा फोकस राहुलबाबावर आहे. कॉन्ग्रेस हा रस्त्यावर लढणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा. ती ओळख पुसली गेली, दरबारी राजकारण आले आणि कॉन्ग्रेस संपली.
खर्गे आले. त्यांचे स्वागत आहे. पण ते काही बदल करू शकतील का? कॉन्ग्रेसचे दुखणे त्यांना माहित आहे का? माहित असेल तर त्यावर औषध देण्याची इच्छाशक्ती ते दाखवू शकतील? खरी गंमत तर पुढे आहे. अध्यक्ष म्हणून सारे अधिकार आता खर्गे यांच्याकडे येतील. मग गर्दी कोणाकडे होणार? सोनिया, राहुल, प्रियांका… तीन-तीन दरबार आहेत. कोणत्या दरबारात डोके टेकवायला जायचे? कोणत्या घरी जायचे? कार्यकर्त्यांना आता प्रश्न पडला आहे.
-मोरेश्वर बडगे
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
566 Total Likes and Views