यथा राजा तथा प्रजा की पीपल गेट रूलर्स दे डिझर्व…यापैकी खरे काय, असा प्रश्न मनात आला. हा प्रश्न आज मनात यायचं काय कारण, असं तुम्हाला वाटेल. पण हा प्रश्न मनात यायला वृत्तपत्रात आणि काही वेबसाईट्सवर प्रसारित झालेल्या दोन-तीन बातम्या कारणीभूत आहेत.
जगप्रसिद्ध जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा (Akira Kurosawa) यांच्या राशोमान या चित्रपटाने जगभरच्या चित्रपट रसिकांच्या मनाला मोहिनी घातली. आपल्या देशातच नव्हे तर जगभरच्या अनेक कलाकृतींमधे राशोमानचा काही ना काही प्रभाव असल्याचे विविध प्रकारे दिसून येते. आपल्याकडे तर ओटीटी प्लँटफॉर्मवर आलेल्या काही सीरिजमधेही हा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. राशोमानमधे प्रतिभावंत कुरोसावा यांनी एकाच घटनेचे चक्रधरस्वामींच्या आंधळ्यांना हत्तीचे दिसले तसे वेगवेगळे सत्य रसिकांसमोर मांडले होते.
राशोमानचा मुद्दा, यथा राजा तथा प्रजा की पीपल गेट…हे सारे प्रश्न एका विषयाशी संबंधित आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक(Rishi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी झालेली निवड, भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग नवव्या वर्षी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांसमवेत साजरी केलेली दिवाळी आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेलं आश्वासन, याबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे (Eknath Shinde) यांनी गडचिरोली जिल्ह्यात भामरागडमधल्या अतिदर्गम भागात नक्षलवादाशी लढण्यासाठी तैनात पोलिसांबरोबर साजरी केलेली दिवाळी….अशा वेगवेगळ्या बातम्या वाचण्यात आल्या. त्यातून काही प्रश्न मनात आले.
दोन शब्दात दोन संस्कृती, अशा शीर्षकाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लेख आमच्या शालेय जीवनात अभ्यासक्रमात समाविष्ट होता. या लेखात बाबा वाक्यम् प्रमाणम्…या परंपरागत दृष्टिकोनाऐवजी अपटुडेट म्हणजेच अद्ययावत् राहण्याची गरज सावरकर यांनी अधोरेखित केली होती. पौर्वात्त्य संस्कृतीत आणि त्यातल्या महानतेत अडकून राहण्यापेक्षा जगाबरोबर जुळवून घ्या, औद्योगिक वैज्ञानिक प्रगतीच्या साथीने प्रगती साधून घ्या, हे सांगण्याचा सावरकर यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगात भिनवण्याची गरजही त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे.
त्यामुळे भारतातल्या यथा राजा तथा प्रजा, या वचनानुसार पंतप्रधानांचा परिणाम महारा,ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरही झालेला दिसतो. पंतप्रधान सीमाभागात दिवाळी साजरी करायला गेले तशाच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी नक्षलग्रस्त भागातल्या पोलिसांबरोबर दिवाळी साजरी केलीय. याआधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनामुळे आणइ त्यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे फारसे फिरू शकले नव्हते पण त्यांनीही करोना काळात पंतप्रधानांनी फेसबुक लाइव्ह केले की त्याच रात्री किंवा त्यांच्यानंतर फेसबुक लाइव्ह करून त्यांचे अनुकरण केले होतेच.
ब्रिटनमधे परिस्थिती विशेषतः आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे. या देशाने सहा वर्षात चार पंतप्रधान बघितले आहेत तर भारतात २०१४ पासून एकच पंतप्रधान जनतेने निवडून दिले आहेत. एकेकाळी भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या आणि ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही, अशी ख्याती जगभर असलेल्या ब्रिटनला संकटाच्या गर्तेतून बाहेर काढायला संकटमोचक म्हणून भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधानपदी निवडावी लागतेय, याला नियतीचा न्याय नाही तर दुसरे काय म्हणणार…
ब्रिटनच्या बाबतीत पीपल गेट रूलर दे डिझर्व, हे लागू होते की ऋषी सुनक मूळ भारतीय वंशाचे असल्याने यथा राजा तथा प्रजा, हे प्रत्यक्षात आणून देशाचीही भरभराट होण्यासाठी कारणीभूत ठरतात, हा केवळ ब्रिटनसाठी किंवा भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. अमेरिकेत जाऊन म्हणजे संधींच्या देशात जाऊन सिलिकॉन व्हँली म्हणजेच माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर अधिराज्य निर्माण करणारे भारतीय तरुण प्रज्ञावंत हा कौतुकाचा विषय होता. देश बदल रहा है…हे केवळ भारतात जाणवणारं सत्य नाही तर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच आता विविध देशात सत्तास्थानांवर भारतीय वंशाचे लोक येऊ लागलेत….कुणी सांगावं, भारतीय वंशाच्या देशप्रमुखांची लॉबीही जागतिक परिषदांमधे दिसू लागेल, तो दिवस दूर नसेल….देशही बदलतोय आणि जगही….
137 Total Likes and Views