भविष्यात म्हणजे ५-२५ वर्षानंतर लग्न नावाची गोष्ट अस्तित्वात असेल काय? लग्नानंतरचे संसार कसे असतील?, लग्नं किती टिकतील?, मुलंमुली लग्न करायच्या फंदात पडतील की लग्नाशिवाय मुलं जन्माला घालतील?, विवाह संस्था मोडीत निघेल? आजच्या आईवडिलांना पडणारे हे प्रश्नं आहेत. कारण सध्या सभोवताल जे घडतंय ते अस्वस्थ करणारे आहे. ४० वर्षापूर्वी लग्नाची बायको असताना धर्मेंद्रने हेमामालिनीशी लग्न केले तेव्हा एकच खळबळ उडाली होती. आज हे सर्रास झाले आहे. कोणाला त्यात काही अनैतिक वाटत नाही. आता लग्नच काय, लग्नाशिवाय मूल जन्माला घालण्यात काही चूक नाही अशी भाषा सुरु झाली आहे. एकेकाळची ज्येष्ठ अभिनेत्री, अमिताभ बच्चनची पत्नी आणि समाजवादी पक्षाची खासदार जया बच्चन यांचे बोल ऐकून तर मी उडालोच. एकेकाळची ही ‘गुड्डी’ आज ७४ वर्षांची आहे. एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाल्या, “लग्नाशिवाय मुलं होणार असतील तर काय हरकत आहे. ही वेळ माझी नात नव्या हिच्यावर आली तरी मला चालेल.”
जया बोलायला तशाही फटकळ आहे. सध्या त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत त्या त्यांची नात नव्याबाबतच्या वक्तव्याने. रिलेशनशीप आणि लग्न याविषयावर मांडलेल्या मतांमुळे त्या नव्याने चर्चेत आहेत. त्या म्हणाल्या की, जर रिलेशनशीप दीर्घकाळासाठी टिकवायची असेल तर त्यात शारीरिक आकर्षण असलं पाहिजे. आमच्या काळात असे प्रयोग करण्याची संधी नव्हती, मात्र आजच्या पिढीला ती संधी आहे. नातं हे फक्त प्रेम, हवा आणि तडजोडीवर टिकत नाही तर त्यात शारीरिक आकर्षण असलं पाहिजे. माझी नात नव्या नंदा ही जर भविष्यात लग्नाआधीच आई झाली तर मला काहीच फरक पडणार नाही. माझा तिला पाठिंबाच असेल.
त्या पुढे म्हणतात, माझं बोलणं ऐकून लोकांना धक्का बसू शकतो. पण हे खरं आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील रिलेशनशीपमध्ये शारीरिक संबंध असले तरच ते टिकेल. आजच्या पिढीने हे स्वीकारले आहे तर मागच्या पिढीनेही स्वीकारलं पाहिजे.
लग्न करण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या मित्र किंवा मैत्रीणीची निवड करा. दोस्तच तुमचा जोडीदार असेल तर वैवाहिक आयुष्य खूप छान बनतं. लग्न आणि रिलेशनशीप यांचा संबंध असू नये, जर लग्नाशिवाय मुलं होणार असतील तर काय हरकत आहे? ही वेळ माझी नात नव्यावर आली तरी मला चालेल. सध्या नव्या कुणाच्या प्रेमात आहे की नाही हे माहिती नाही. पण नातीविषयी ह्या जयाआजीने उधळलेल्या मुक्ताफळांनी खळबळ आहे. महिन्याला कोटी कोटी रुपये कमावणाऱ्या समाजाची मानसिकता जया बच्चन यांनी बोलून दाखवली असेल तर उद्याचे जग कसे असेल याचे हे ट्रेलर म्हणायचे. मग आजही घरच्या अब्रूसाठी प्रसंगी प्राण देणाऱ्या गरीब लोकांचे काय?
781 Total Likes and Views