वादग्रस्त बॉलीवूड क्वीन कंगना रणौत ‘पंगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. सिनेमातल्या लोकांशी तर ती भांडतेच. पण राजकारण्यांशीही दोन हात करायला मागेपुढे पाहत नाही. महाआघाडी सरकारच्या राज्यात कंगनाने शिवसेनेशी पंगा घेतला होता. त्याचा फायदा तिला मिळाला. भाजपच्या ती जवळ गेली. कंगनाला आता खासदार व्हायचे डोहाळे लागले आहेत. निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत. मात्र तिने आतापासून फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली दिसते.
एक वाहिनीला मुलाखत देताना कंगना म्हणाली, २०२४मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघामधून मला निवडणूक लढवायला आवडेल. अनेक लोक आपल्याला राजकारणात येण्याविषयी विचारत असतात. मलाही लोकसेवा करायला आवडेल असे ती म्हणाली.
मोदींची ती प्रशंसक आहे. राहुल गांधीचा सामना हा राहुल गांधींशीच आहे. त्यामुळे मोदींना कणखर विरोधक नाही, असं ती म्हणाली. ती पुढे म्हणते, आमचं कुटुंब पूर्वी काँग्रेसी होतं. परंतु आता आम्ही २०१४पासून भाजपमय झालो आहेत. माझे वडील सकाळी उठून ‘जय मोदी’ म्हणतात आणि सायंकाळी ‘जय योगी’ म्हणतात. मोदी हे आमच्याच कुटुंबातील एक असल्याचा दावा आहे.
कंगना आज ३५ वर्षे वयाची आहे. हिरोईनचे रोल ह्या वयात तिला आता मिळण्याची शक्यता नाही. हल्ली राजकारणाचाही’सिनेमा’ झाला आहे. त्यामुळे कंगना राजकारणातही चमकेल. हेमामालिनी, जया बच्चन तसेच स्मृती इराणी आजही राजकारणात मजबुतीने टिकून आहेत. जया बच्चन. अमिताभ बच्चन यांची पत्नी. जया यांचे वय ७४ आहे. ह्या वयातही त्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. हेमामालिनी यांचे वय ७४ आहे. दोन तरुण मुलींची ही आई आजही फिट आहे. भाजपच्या खासदार म्हणून हेमा दोनदा मथुरेतून निवडून आल्या आहेत. ‘सास भी कभी बहु थी’ ह्या टीव्ही मालिकेतून चमकलेली स्मृती इराणी आज ४६ वर्षांच्या आहेत. अमेठीमध्ये राहुल गांधी यांना हरवून त्या एकदम हिट झाल्या. सध्या त्या केंद्रीयमंत्री आहेत. चांगले वक्तृत्व असल्याने लोकप्रिय आहेत. कंगनाही ह्या रांगेत येऊ शकते. महत्वाचे म्हणजे अजून तिने लग्न केलेले नाही.
210 Total Likes and Views