“थेंबे थेंबे तळे साचे “हा विषय नेहमी लहानपणी निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धेचा असायचा. लहानपणापासून बचतीचे महत्त्व पटावे म्हणून कदाचित तो ठेवला असावा .आज त्याची आठवण झाली कारण एकतीस ऑक्टोबर हा जागतिक बचत दिन म्हणून ओळखला जातो. या जागतिक बचत दिना निमित्याने समाजातील सर्व व्यक्ती व सर्व राष्ट्रांची बचत आणि आर्थिक सुरक्षा मजबूत करून ती वाढवण्यासाठी ही प्रथा निर्माण झाली .भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो. प्रत्येक नागरिक हा आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर देशाचा नक्कीच विकास होतो व देशाची स्थिती ही सुधारते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक तर उंचावणे हेच कोणत्याही देशाचे धोरण असते . या सगळ्या गोष्टी शक्य होण्यासाठी बचतीचा सगळ्यात मोठा वाटा असतो. म्हणून 30 ऑक्टोबर 1924 ला इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय बचत बँकेची स्थापना झाली आणि बचतीचे महत्त्व आणि सवय लागण्याच्या उद्देशाने 31 ऑगस्ट बचत दिन म्हणून घोषित झाला. आर्थिक वृद्धीमुळे बचतीला दिशा मिळते .चांगला व्यवसाय ,चांगले शिक्षण, आरोग्यासाठीही पैसा लागतोच. बचत व गुंतवणूक त्यामुळे 2008 ते 2010 जागतिक मंदीचा फटका जेवढा अमेरिकेला बसला तेवढा भारताला बसला नाही.
पूर्वीपासून लोक आपली बचत ही कुठेतरी घरात चोर कप्प्यात, जुन्या रांजणात ठेवत असत. तर स्त्रिया या डाळ ,तांदुळाच्या डब्यात आपली पुंजी जमा करीत किंवा सोन्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून स्त्रीधन गोळा करीत .त्या ऐवजी लोकांनी ती रक्कम बँकेमध्ये जमा केली तर त्याचा फायदा देशालाही होतो आणि नकळत देश आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो .पण पूर्वी उत्पन्नाचे मार्ग मर्यादित होते ,क्रयशक्ती देखील कमी होती .मात्र रीतीभाती , प्रथा यामुळे काही बाबतीत अनाठाई खर्च केल्या जायचा .अजूनही जातो .कर्ज काढून सण साजरे केले जातात.
दुसऱ्या बाजूला बरेचसे लोक पूर्वी देखील काटकसर भरपूर प्रमाणात करीत असत . क्रयशक्ती कमी असली तरी जीवनशैली अतिशय साधी होती. राहणीमानाच्या कल्पना आणि गरजा माफक होत्या. आणि निगुतिने वस्तूंचा वापर करण्याकडे कल होता .संस्कार होते .म्हणूनच मोठ्या भावंडांचे कपडे छोट्या भावांना वापरले जात असत . कपड्यांचा वापर कपड्यापासून शेवटच्या धाग्यापर्यंत होत असे .परंतु त्यामुळे बचतही त्या प्रमाणात होत नव्हती आणि गुंतवणुकीचे मार्ग पण खूप मर्यादित होते . पोस्टात पैसे गुंतवणे किंवा बँकेत एखादे खाते इथपर्यंतच प्रगती होती .त्यामुळे अर्थव्यवस्थेची तितकीशी भरभराट नव्हती .
वास्तविक बघता मागणी तसा पुरवठा तशी बाजारपेठ ! त्यातून परत गुंतवणूक .या गोष्टीमुळे आर्थिक उलाढाल वाढते .त्यामुळे बचतीबरोबरच पैसा वापरणे ,खरेदी विक्री होणे हे सुद्धा आवश्यकच खूप फायद्याची ठरते असते. गुंतवणूक वाढली की उद्योगधंदे व रोजगारात वाढ होते, लोकांना पैसा मिळू लागतो आणि मग बचत ,गुंतवणूक वाढते. मुख्य उलाढाल होणे हे देखील बचत इतकेच जास्त महत्त्वाचे आहे.
आज बचतीचे मार्ग बदलल्यामुळे आर्थिक व्यवस्थेची उलाढाल वाढली आहे, तरी बचतीचे महत्त्व कमी होत नाही ,कारण ही अशी मोठी गुंतवणूक करणारे लोक काही टक्के असतात .बरेचसे लोक अजूनही बचतीचे मानसिकता नसणारेच आहेत .तसेच हातावरती पोट असणारे लोक, मजूर लोक, कष्टकरी यांचा पैसा आला की बरेचदा व्यसनांवर जाण्याची शक्यता असते किंवा खाजगी लोकांकडून उचललेले पैशांची परतफेड करण्याकडे असते. बऱ्याच धुणी भांडी करणाऱ्या स्त्रिया, लहान व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया या बचत गटातून गुंतवणूक करताना किंवा भिशी टाकताना दिसतात. या सगळ्यातून ना त्यांना स्वतःला फायदा होत, ना देशाच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडत.
पूर्वी मिन्टी किंवा बचत बँक म्हणून मुलांसाठी प्रत्येक जण वापरत असू. अजूनही लहानपणापासून खाऊ किंवा पॉकेट मनीमधून वयानुरूप दररोज पाच किंवा दहा रुपये पासून पुढे अशी छोटीशी रक्कम डब्यामध्ये जमा करून महिन्याच्या शेवटी किंवा सहा महिन्यांनी तेच पैसे बँकेत टाकायची सवय लावली तर त्यातून वाढत जाणारा पैसा पाहून मुलांचा उत्साह वाढतो आणि बचतीची सवय पण लागते. त्याचप्रमाणे दररोज पैशाचा हिशोब लिहून ठेवण्याची पण सवय सध्याच्या परिस्थितीसाठी तर खूपच आवश्यक आहे .आजकाल बाजारात दिसणाऱ्या असंख्य आकर्षक वस्तू मुलांना या याच क्षणी हव्या असतात आणि त्यातून हट्टीपणा जन्म घेतो त्याच्यामुळे ही हिशोब लिहून ठेवण्याची सवय खूप फायद्याची ठरते .
मुलांच्या लहानपणी आम्ही रेंटवर घर घेतले ,तेव्हा पूर्वीच्या घरापेक्षा ते कमी रेंटवर नवीन घर आम्हाला मिळाले .त्यातून जे काय पैसे वाचले ते मग आम्ही मुलांच्या नावाने खाते उघडून त्यांना सांगून ,बँकेत जमा करीत असू . त्यातून पुढे मग बरीच मोठी रक्कम मिळू शकली आणि मुलांना बचतीचे महत्त्व कळले ते वेगळेच
असे काही आपण करू शकलो तर हा बचत दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.
मानसी गिरिश फडके.
762 Total Likes and Views