*गेल्या रविवारी पर्थच्या ऑप्टस मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना झाला आणि अचानक ऑस्कर पुरस्काराची तीव्र आठवण झाली. दरवर्षी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. मात्र या सामन्यात टीम इंडियाचे प्रदर्शन, देहबोली पाहता यावर्षी आपली ऑस्कर पुरस्काराने झोळी भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्थातच मैदानातील गणिते मैदानातच सोडवली जातात तरीपण टीम इंडियाने या सामन्यात जे घालीन लोटांगण केले ते पाहता ये बात कुछ हजम नहीं हुई असेच म्हणावेसे वाटते.*
*झाले काय तर या विश्वचषकात बोहणीलाच परंपरागत प्रतिद्वंदी पाकला चारी मुंड्या चीत करत टीम इंडियाने आपले मिशनचा श्रीगणेशा केला होता. दुसरी लढत द.आफ्रिकेसोबत होती. याच प्रोटीयाज संघाला एकदोन महिन्याआधी आपल्या दुय्यम संघाने उठता लाथ बसता बुक्की मारली होती. मग असे कोणते आभाळ कोसळले की ज्यात आपल्या शेर संघाची शेळी झाली? मेलबोर्न आणि पर्थच्या बाऊंन्स मध्ये फारतर उन्नीस बीस चा फरक आहे. असे असताना आपले फलंदाज दहा गेले पाच राहिले सारखे का करत होते? एवढ्या लवकर आपल्या दिग्गज फलंदाजांचे हातपाय का लटपटले असावे? ऑप्टस मैदानावर असा कोणता सैतान आला होता ज्याला पाहून आपले पाच रथी महारथी फलंदाज सातच्या आंत (एकोणपन्नास धावांत पाच गडी बाद) घरात पोहचले?*
*खरेतर ‘वेल बिगन इज हाफ डन’ असे म्हणतात. मात्र राहुल रोहीत जोडीचे प्रदर्शन पाहता पहिले दोन बळी नवसाला दिल्यासारखे असतात. त्यातही कर्णधार रोहीत शर्मा कसाबसा पासींग मार्क कमावतो. मात्र के. एल. राहुलचे काय? प्रत्येक सामन्यानंतर त्याला एटीकेटी करून पुढे ढकलले जाते. इतके भिक्कार प्रदर्शन करूनही त्याचे संघातील अढळस्थान पाहता यापुढे ध्रुवताऱ्याला राहुलतारा असे नामकरण करण्याची मागणी पुढे येऊ शकते. एकवेळ निद्रिस्त ज्वालामुखी धडधडून पेटेल मात्र राहुलबाबाच्या बॅटला जाग कधी येईल ते सांगता येणार नाही. निश्चितच नशीब असावे तर राहुलसारखे. ना धावांची चिंता ना संघातल्या स्थानाची चिंता, वरून संघाचे उपकर्णधारपद. काहीही असो के एल राहुल खेळपट्टीवर धावा करायला जातो की भुमीपुजनाला जातो हे त्याने एकदा स्पष्ट करायला हवे.*
*प्रथम फलंदाजी करुन फळ्यावर एकशे तेहत्तीस धावा म्हणजे ऊंट के मुंहमे जीरा सारखे होते. एकूण नऊ गडी बाद झालेत आणि मुख्य म्हणजे त्यात आपले आठ फलंदाज झेलबाद झाले. बहुतेक सर्वांनाच उंच उंच उडण्याचे वेध लागले असावे. द.आफ्रिकेची गोलंदाजी निश्चितच दर्जेदार आहे यात वादच नाही. तरीपण लुंगी एनगीडीच्या चेंडूवर आपल्या फलंदाजांना लुंगी डान्स करायची काय गरज होती? सुपरफास्ट रबाडा, ॲनरीच नॉर्जेला पचवून एनगीडी,वेन पार्नेला शरण जाण्यात कोणता शहाणपणा आहे?*
*तसेही फलंदाजीच्या बळकटीसाठी दिपक हुड्डाची संघात वर्णी लागली. परंतु ना त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली ना त्याच्या हातात चेंडू सोपवला गेला. दिपक हुड्डा अष्टपैलू खेळाडू असून तो फिरकी गोलंदाजी करतो असे ऐकले आहे. मात्र तो कधी गोलंदाजी करताना दिसला नाही, जंगलमे मोर नाचा लेकिन किसने देखा हा प्रश्नच आहे. एकवेळ बर्म्युडा ट्रॅंगलचे रहस्य कळेल परंतु दिपक हुड्डाच्या गोलंदाजीचे रहस्य कळणे कठीण आहे.राहिला प्रश्न सूर्य कुमारचा तर अकेला चना भाड नहीं फोड सकता हे ही तितकेच खरे आहे. इतर सहकाऱ्यांनी तू चल मै आया केल्याने आपल्या संघाची घागर पुर्णपणे भरलीच नाही.*
*तरीपण १३३ धावांची खिंड प्राणपणाने लढली असती तर तेवढेच मनाला समाधान लाभले असते. सुरुवातीचे तीन बळी वगळता आपला संघ ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ सारखा दिसला. आपला संघ निर्गुण निराकार भावाने जो जे वांछील ते तो लाहो करत राहिल्याने अखेर व्हायचे तेच झाले. त्यातही आपले क्षेत्ररक्षक नक्की कोणत्या संघाकडून खेळत आहे तेच समजत नव्हते. विराटच्या हाताला तर जणुकाही लोणी चोपडले असावे इतक्या सहजतेने चेंडू त्याच्याकडून सुटला. तर रोहीत शर्माने धावबाद करतांना अहिंसा परमो धर्मचा राग आवळला. अर्थातच जिथे रोहीत विराट दर्यादिली दाखवत होते तिथे इतरांनी झेल सोडले तर त्यात वावगे ते काय? निव्वळ पाच गोलंदाज घेऊन खेळणे आणि त्यातही १३३ धावांचे रक्षण, तुमच्या वस्त्रहरणासाठी अच्छे दिन होते आणि झालेही तसेच.*
*वास्तविकत: ही बाजी जिंकून टीम इंडिया सेमीफायनला बाजीगर ठरली असती. परंतु यामागे पाकला अडवा, पाकला जिरवा ही रणनीती तर नसावी अशी शंका येते. तसेही पाकसमर्थकांनी भारताचा पराभव होताच प्रचंड आदळआपट केली. मात्र पाकला सेमीफायनलची तिकिट देण्याचे काम बाबर आझमचे आहे. त्याने कुटूंब प्रमुख या नात्याने माझा संघ माझी जबाबदारी घ्यायला हवी. एखाद्या संघाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी अशा चाली बरेच संघ खेळतात. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी ही मानसिकता असते. यापुर्वी याचा फटका टीम इंडियाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे उगाचच तेरी कमीज मेरी कमीजसे सफेद कैसी म्हणून फायदा नाही.*
*गेल्या आशिया चषकांत आपला संघही असाच उधारका सिंदूरच्या प्रतिक्षेत होता. मात्र जर तरच्या तमाशात कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही. आपल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. पाकचा झिंबाब्वे विरूद्धचा पराभव आणि भारताचा द.आफ्रिकेविरूद्ध पराभव पाकला विश्वचषकाबाहेर काढण्यास पुरेसा ठरू शकतो. तरीपण भारताने जाणूनबुजून द.आफ्रिकेविरूद्ध लढत सोडली असा एक मतप्रवाह आहे. विशेषतः फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपल्या खेळाडूंचे प्रदर्शन पाहता ते ऑस्कर सहज मिळवू शकतात असा टीम इंडियावर आरोप होत आहे.*
*याच मैदानावर लिंबूटिंबू झिंबाब्वे ने बलाढ्य पाकला १३० धावांत रोखलेले होते. त्यामुळे टीम इंडिया सुद्धा असा करिष्मा करू शकेल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र लढतीचा अंतिम परिणाम टीम इंडियाच्या लौकिकासारखा नव्हता. मारक्रम मिलर जोडीने मिले सुर मेरा तुम्हारा करत भारतीयांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. अशा पार्श्वभूमीवर द.आफ्रिका,,तू जीता नहीं, तुझे जीतवाया गया है अशा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र आता रात गई बात गई हे ध्यानात ठेवावे लागेल. सुदैवाने भारताचे यापुढील सामने ॲडीलेड, मेलबोर्नला आहे. त्यामुळे तिथे पर्थची वेगवान भुताटकी निश्चितच नसेल. भरीस भर म्हणून उर्वरित लढती बांग्लादेश , झिंबाब्वे विरूद्ध आहेत. त्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनला जाण्यासाठी फारसे कष्ट उपसावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे.
***********************************
दि. ०१ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
डॉ अनिल पावशेकर
176 Total Likes and Views